मंत्रीपुत्रानं घेतल्या हायवे ठेकेदाराकडून दोन सेकंड हॅण्ड अलिशान कार

ठेकेदाराला मंत्री जाब का विचारत नाहीत- प्रविण आर्लेकर

किशोर नाईक गावकर, संपादक | प्रतिनिधी

पणजी : राज्याचे उपमुख्यमंत्री, पेडणेचे आमदार मनोहर उर्फ बाबू आजगांवकर यांचे पुत्र त्रिवेश आजगांवकर यांनी दोन अलिशान कार एका ठेकेदाराकडून सेकंड हॅण्ड खरेदी केल्याचे प्रकरण आता नव्यानेच चर्चेत आलंय. पत्रादेवी ते बांबोळीपर्यंतच्या नॅशनल हायवेचे काम मेसर्स एमव्हीआर इन्फ्रा प्रा. लिमिटेड ही ठेकेदार कंपनी करतेय. हे काम अत्यंत निकृष्ट पद्धतीनं सुरू आहे. लोकांचे बळी जाताहेत आणि लोकांना जीव मुठीत ठेवून प्रवास करावा लागतोय. संपूर्ण पेडणेची जनता या हायवेच्या ठेकेदाराविरोधात पेटून उठलीए, पण पेडणेचे आमदार बाबू आजगांवकर हे मात्र या विषयावर मूग गिळून गप्प आहेत. या ठेकेदाराची मुजोरी सुरू असताना स्वतःला जनतेचा सेवक म्हणणारे उपमुख्यमंत्री गप्प का, असा सवाल मगोचे नेते प्रविण आर्लेकर यांनी करून थेट बाबू आजगांवकर यांनी डिवचलंय.

पेडणेकरांना हवं स्पष्टीकरण

गोव्यातल्या मंत्र्याच्या पुत्रानं सेकंड हॅण्ड कार घेतलीय,असं म्हटलं तर कुणीच हे मान्य करणार नाही. पण हे खरंए. उपमुख्यमंत्री बाबू आजगांवकर यांचे पुत्र त्रिवेश आजगांवकर यांनी एमव्हीआर कंपनीकडूनच दोन अलिशान कार सेकंड हॅण्ड खरेदी केल्यायत. एक कॉपांस जीप आणि दुसरी ऑडी. आता त्यांनी सेकंड हॅण्ड घेतल्याचं कागदोपत्रावरून दिसून येत असलं तरी या कार नव्या कोऱ्या आहेत पण एमव्हीआर कंपनीच्या नावावरून त्या सेकंड हॅण्ड घेऊन नंतर आपल्या नावावर करण्यामागे नेमके काय कारण आहे हे मात्र स्पष्ट झालेलं नाही. आता प्रश्न असा आहे की सरकारची महत्वाची कामं मिळवणाऱ्या ठेकेदाराकडून एका मंत्रीपुत्रानं सेकंड हॅण्ड कार घेण्याचं कारण काय,अशावेळी जनतेच्या मनात संशय निर्माण होणं सहज आहे,असा टोला प्रविण आर्लेकर यांनी हाणलाय. वास्तविक या सेकंड हॅण्ड कार डीलबाबत उपमुख्यमंत्र्यांनी पेडणेच्या जनतेला स्पष्टीकरण दिलं असतं तर बर झालं असतं. वारंवार या कारचा विषय उपस्थित होण्याचा प्रकार थांबला असता,असंही आर्लेकर म्हणालेत.

व्यवहार कायदेशीर तर तोंड बंद का ?

मोपा येथे जाऊन आंतरराष्ट्रीय विमानतळाचे काम बंद पाडण्याची धमक असलेले उपमुख्यमंत्री बाबू आजगांवकर नॅशनल हायवेच्या कामात सुरू असलेल्या बेपर्वाईबाबत चकार शब्द काढत नाहीत याचे कारण काय,असा सवाल प्रविण आर्लेकर यांनी केलाय. अशी कोणती गोष्ट आहे जी उपमुख्यमंत्र्यांना ठेकेदाराला जाप विचारण्यापासून परावृत्त करतेय,असा चिमटाही त्यांनी काढलाय. एरवी बारीक सारीक गोष्टीवरून जनतेची बाजू घेऊन उभे राहणारे बाबू आजगांवकर हायवेच्या ठेकेदाराबाबत मात्र पूर्णपणे अपयशी ठरलेत. या ठेकेदाराकडून अनेकांची सतावणूक सुरू आहे. तोर्से येथील आपा नागझरकर यांचा विषय अजूनही सुटत नाहीए. ठेकेदाराच्या बेजबाबदारपणामुळे अनेकांचे बळी गेले. यापुढेही बळी जाण्याची शक्यता आहे. मागील पावसाळ्यात लोकांनी जीव मुठीत ठेवून प्रवास केला.

या पावसाळ्यातही यापेक्षा अधिक गंभीर परिस्थिती उदभवणार आहे. बारीकसारीक गोष्टींवरून सरकारी अधिकाऱ्यांना दरबारात बोलावून लोकांसमोर अपमानीत करणारे उपमुख्यमंत्री या ठेकेदाराला बोलावून लोकांसमोर जाप विचारणार का विचारत नाहीत,असाही सवाल आर्लेकर यांनी केलाय. आजच्या घडीला अगदी पत्रादेवीपासून नोकरी व्यवसायानिमित्त प्रवास करणाऱ्यांना या हायवेच्या बेजबाबदार कामामुळे पुन्हा सुरक्षित घरी पोहचणार काय याची हमी राहीलेली नाही. वारंवार अपघात घडतात. मुख्यमंत्री, पीडब्लूडी मंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी किमान पत्रादेवी ते करासवाडापर्यंतच्या हायवेच्या कामाची पाहणी करून या ठेकेदाराला जाब विचारावा,अशी लोकांची प्रांजळ मागणी आहे,असे आर्लेकर म्हणाले.

पेडणे नागरीक समितीला जाब द्या

हायवेच्या विषयावरून पेडणे नागरीक समिती सातत्याने पाठपुरावा करतेय. आत्तापर्यंत त्यांनी अनेकांच्या भेटी घेऊन हायवेच्या धोक्याबाबतची कल्पना सरकारला दिलीय. बाबू आजगांवकर हे पेडणे नागरीक समितीबरोबर बैठक घेऊन सविस्तरपणे हायवेच्या विषयावर चर्चा का करीत नाहीत. या चर्चेसाठी त्यांनी हायवेच्या ठेकेदारालाही पाचारण करावे,असेही आर्लेकर म्हणाले.

एमव्हीआरचा दबदबा

एमव्हीआर हा राज्यातला सर्वांत मोठा ठेकेदार. भाजपच्या राजवटीत बहुतांश कामे ह्याच ठेकेदाराला मिळताहेत. अलिकडेच उदघाटन झालेल्या मुंबई हायकोर्टाच्या गोवा खंडपीठाची नवी अलिशान इमारत ह्याच ठेकेदाराने उभारलीय. या ठेकेदाराचा गॉडफादर भाजपचा एक ज्येष्ठ नेता आहे. हा नेता एका महत्वाच्या पदावर आहे. हा नेता गोव्यात आला की या ठेकेदाराकडेच पाहुणचाराला असतो. एवढंच नाही तर या ठेकेदाराचं नातं या नेत्याशी असल्याच्याही चर्चा आहेत. एमव्हीआर हा भाजपचा फंड रेझर ठेकेदार असल्याचा आरोप विरोधक करतात. मुंबई- गोवा हायवेचे कंत्राट दिलीप बिल्डकॉन कंपनीला मिळालंय. पण गोव्यात मात्र पत्रादेवी ते बांबोळीपर्यंतच्या हायवेचं काम एमव्हीआरनं पटकावलंय. या हायवेच्या कामाची अक्षरक्षः दुर्दशा सुरू आहे. कामाच्या दर्जाचं तर बोलायलाच नको.

भविष्यात हा हायवे मृत्यूचा सापळा बनणार अशी भिती व्यक्त केली जातेय. एकदम निकृष्ट दर्जाचं काम, रोड इंजिनियरिंगचा तर पत्ताच नाही. एवढं करून कुणी काहीच या ठेकेदाराला विचारत नाहीए. केंद्रीय रस्ता वाहतूकमंत्री नितीन गडकरी निष्क्रिय ठेकेदारांबाबत खूप कठोर बोलतात पण एमव्हीआरबाबत मात्र चकार शब्द ते काढत नाहीत,अशी भावना अनेकांची बनलीए. पत्रादेवी ते बांबोळी या पट्टा सध्या मृत्यूचा सापळा बनलाय. आत्तापर्यंत अनेकांचे बळी गेलेत. शेकडो लोक जायबंदी होऊन बसलेत. लोकांनी सगळं करून बघितलं. क्राईंम ब्रँचपासून, पोलिस स्थानक, जिल्हाधिकारी, मुख्यमंत्री, पंतप्रधान, राष्ट्रपती सगळ्यांकडे तक्रारी झाल्या. पेडणे उपजिल्हाधिकाऱ्यांनी या ठेकेदारावर गुन्हा नोंद केला पण जिथे चालेना राष्ट्रपतीचे तिथे काय करणार बिचारे उपजिल्हाधिकारी अशी परिस्थिती आहे. लोकांचा हा एल्गार पाहुन मुख्यमंत्र्यांना पाझर फुटत नाही. या ठेकेदाराचा विषय काढला की ते जणू आपण काही एेकलंच नाही, अशा थाटात वागतात. या सगळ्याचं गुढ काही उकलत नाही,अशी परिस्थिती निर्माण झालीए.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!