केजरीवाल उद्या गोव्यात येणार! गोंयकारांना म्हणाले, सी यू सून…

गोव्याच्या राजकारणावर केजरीवालांची ट्वीटमधून टीका

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो : गेल्या दोन दिवसांपासून आपल्या वेगवेगळ्या गोष्टींमुळे चर्चेत आलेल्या आम आदमी पक्षानं मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. या पार्श्वभूमीवर काही दिवसांपूर्वीच आपचे वरीष्ठ नेते मनिष सिसोदिया यांनी गोवा दौरा केला होता. त्यानंतर राघव चढ्ढा हेदेखील हल्लीच गोव्यात येऊन गेले. त्यानंतर आता दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे मंगळवारी गोव्यात येणार आहे. ट्वीट करत केजरीवाल यांनी ही माहिती दिली आहे.

सडकून टीका

गोव्यातील राजकारणावर टीका करतानाच गोव्याला प्रामाणिक राजकारणाची गरज असल्याचं अरविंद केजरीवाल यांनी म्हटलंय. गोव्यातील आमदारांच्या घोडेबाजारवरुनही त्यांनी सडकून टीका केली आहे. आमदारांच्या खरेदी विक्रीला आता चाप बसायला हवा असं त्यांनी म्हटलंय. घाणेरड्या राजकारणाने कळस गाठल्याचाही उल्लेख त्यांनी केलाय. गोव्याला विकास हवाय आणि बदल हवाय, असं अरविंद केजरीवाल म्हणाले आहेत. पैशांची कुठेच कमरता नसून प्रामाणिकपणाचा अभाव गोव्याच्या विकासाच्या आड येत असल्याची टीका केजरीवाल यांनी केली आहे. दरम्यान, उद्या गोव्यात येत असल्याचंही त्यांनी म्हटलंय.

आप चर्चेत

आगामी विधानसभा निवडणुकांसाठी गोव्यात आपनं बरीच कंबर कसली आहे. वेगवेगळ्या आंदोलनांमधून, उपक्रमांमधून जनतेपर्यंत पोहोचण्याचा आपचा प्रयत्न दिसून आलाय. यात आता गोव्यातील निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अरविंद केजरीवाल यांचा दौरा महत्त्वपूर्ण मानला जातोय. आपल्या या दौऱ्यात आपच्या संभाव्य उमेदवारांसोबतच कार्यकर्त्यांशी बैठका आणि चर्चा करण्यासाठी केजरीवाल गोव्यात येत आहेत. त्या पार्श्वभूमीवर राज्यातीलही राजकीय घडामोडींना वेग आलाय. शनिवार-रविवारी आपच्या कार्यकर्त्यांनी केलेला केक वाटपाचा उपहासात्मक इव्हेंटही चांगलाच चर्चिला गेलाय. त्यानंतर आता केजरीवाल यांच्या गोवा दौऱ्यामुळे पुढचे काही दिवस आम आदमी पार्टी गोव्यात चर्चेत राहण्याची शक्यताही बळावली आहे.

शाब्दीक चकमकी

एकीकडे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांचा गोवा दौरा रद्द झालाय. तर दुसरीकडे केजरीवाल उद्या गोव्यात येत आहेत. या सगळ्या दौरांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वक्तव्य, आरोप प्रत्यारोप आणि शाब्दीक चकमकी रंगणार, यात शंका नाही.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!