राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि नरेंद्र मोदी यांनी न्यायव्यवस्था आणि संविधानाचे केले नुकसान: चोडणकर

आरएसएसने 52 वर्षे राष्ट्रध्वज का फडकावला नाही?

Goan Varta Live | प्रतिनिधी

म्हापसा : न्यायव्यवस्था व घटनात्मक प्राधिकरणाला आपल्या नियंत्रणात ठेवून, तसेच लोकांचा आवाज दाबून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि नरेंद्र मोदी सरकार देशातील लोकांना निराश करण्याचा प्रयत्न करीत आहेत असा आरोप कॉंग्रेस नेते गिरीश चोडणकर यांनी केला आहे आणि आरएसएसने स्वातंत्र्यानंतर 52 वर्षे राष्ट्रध्वज का फडकावला नाही असा प्रश्न केला आहे.

“1885 ते 1947 या काळात आपण (आरएसएस) नेमके काय करीत होते हेही भारतीयांना जाणून घ्यायचे आहे. ” असे चोडणकर म्हणाले.

उत्तर गोवा जिल्हा कॉंग्रेस कार्यालय- म्हापसा येथे 136 व्या कॉंग्रेस स्थापना दिवस साजरा करण्याच्या निमित्ताने आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. विरोधी पक्षनेते व मडगावचे आमदार दिगंबर कामत, माजी केंद्रीय मंत्री अ‍ॅड. रमाकांत खलप, उपाध्यक्ष एम. के. शेख, संकल्प आमोणकर, बागकर, आनंद नाईक, जिल्हा अध्यक्ष विजय भिके, सुधीर खानोलकर आणि इतर नेते उपस्थित होते.

1885 ते 1947 पर्यंत आरएसएस कोठे होता?

“गेल्या सत्तर वर्षांत कॉंग्रेसने काय केले आहे हे लोकांना माहिती आहे. 1885 ते 1947 या काळात भारतीय नागरिक स्वातंत्र्यासाठी संघर्ष करीत होते, त्या काळात आरएसएस काय करत होते हे त्यांनी लोकांना सांगावे. ” असे आव्हान चोडणकर यांनी केले.

“कॉंग्रेस पक्ष लोकांच्या हृदयात आहे. आम्ही समानतेत विश्वास ठेवतो आणि सर्वांना सोबत घेऊन चालतो. ही भारतीय नागरिकांची देखील भावना आहे. म्हणूनच आमच्या संविधानाचे आणि राष्ट्राचे नुकसान करण्याचा प्रयत्न करणाऱ्या शक्तीचा पराभव करण्याची प्रत्येकाची जबाबदारी आहे. ” असे चोडणकर यांनी आवाहन केले.

ते म्हणाले की नरेंद्र मोदी सरकार आणि आरएसएस यांनी न्यायव्यवस्था संपविली आहे. “सध्या आरबीआय आणि निवडणूक आयोगाला घटनात्मक आदेशानुसार काम करण्याचीही संधी नाही.” असे चोडणकर म्हणाले.

ते म्हणाले की, लोकांचा आवाज दाबण्यासाठी आणि भारतीयांमध्ये निराशा निर्माण करण्यासाठी नरेंद्र मोदींनी घटनात्मक प्राधिकरणी आपल्या नियंत्रणात ठेवली आहे. लोकांमध्ये निराशा निर्माण करुन त्यांना मतदाना पासून दूर ठेवण्याचा त्यांचा विचार आहे.” असे चोडणकर म्हणाले.

त्यांनी सांगितले की यूपीएच्या शासनकाळात दारिद्र्य रेषेखालील (बीपीएल) 14 कोटी लोकांना वरील दारिद्र्य रेषेचा (एपीएल) दर्जा देण्यात आला होता. परंतु विद्यमान एनडीए सरकारने त्यास उलट केले आहे आणि लोकांना ‘लाचार’ बनविण्यासाठी बीपीएलमध्ये ह्या सदस्यांना आणले आहे. “लोकांना गरीब बनवून नियंत्रित करणे ही आरएसएसची विचारसरणी आहे.” असे ते म्हणाले.

दिगंबर कामत म्हणाले की, काँग्रेसने लक्ष्य निश्चित करून ते साध्य करण्याची गरज आहे.
“कॉंग्रेसचा इतिहास कोणीही बदलू शकत नाही. आम्हाला त्याचा अभिमान वाटतो. परंतु आपण केवळ भूतकाळाचा विचार करुन जगू शकत नाही. आम्हाला सद्यस्थितीला सामोरे जाण्याची गरज आहे. ” असे कामत म्हणाले.

कॉंग्रेस गट अध्यक्षांनी एका महिन्यात 3 हजार सभासद नोंदणी करण्याचे लक्ष्य ठेवावे असे ते म्हणाले.

“आमच्या कार्यकर्त्यानी घरोघरी जाण्याची गरज आहे. आम्ही मडगाव मध्ये दहा हजार सभासद करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. आपण इतरांना दोष देऊ नये तर आपली उद्दीष्टे साध्य करण्यासाठी कार्य केले पाहिजे. जिल्हा पंचायत निवडणुकी नंतर नगरपालिका निवडणुका आमची दुसरी परीक्षा आहे. जिल्हा पंचायत निवडणुकीत आम्ही यशस्वी झालो नाही, पण आता आमच्याकडे आणखी एक संधी आहे. ” असे ते म्हणाले.

“पक्षाचे कणा असलेल्या माझ्या कार्यकर्त्यांमुळे मी सात वेळा निवडणूक जिंकू शकलो. माझ्या मते नवीन वर्षाचा ठराव नवीन बूथ समित्या आणि नवीन सदस्य असावा. हे साध्य झाल्यास कोणीही आम्हाला सत्तेत येण्यापासून रोखू शकत नाही. ” असे कामत म्हणाले.

अ‍ॅड. रमाकांत खलाप म्हणाले की, मगोमध्ये असताना ते वैचारिकदृष्ट्या कॉंग्रेसचे होते आणि त्यांनी कॉंग्रेस पक्षाला समर्थन करण्याचा प्रयत्न केला. “ मराठी आणि विलीनीकरणाचे मुद्दे सोडले तर मगोची सुद्धा वैचारिकदृष्टी कॉंग्रेस सारखीच होती. तळागाळातील स्तरावर पक्षाची पुनर्रचना करण्यासाठी मी काम केले. ” असे ते म्हणाले.

यावेळी जीपीसीसीचे उपाध्यक्ष एम. के. शेख, जिल्हाध्यक्ष विजय भिके, राजन घाटे, अ‍ॅड. शंकर फडते यांनीही यावेळी भाषण केले.

कॉंग्रेसच्या बांधणीत मोलाच्या योगदानाबद्दल श्री. नोएल डिसूजा, (माजी प्रदेशाध्यक्ष- गोवा प्रदेश युवा कॉंग्रेस) श्री. रवींद्रनाथ मिनेझिस, (कुंकळ्ळी) श्रीमती संध्या कामत, (माजी महिला कॉंग्रेस) आणि श्री. आग्नेल मास्करेन्हस यांना गौरविण्यात आले. स्वर्गीय तुळशिदास मलकर्णेकर (माजी सेवादल) यांचा सन्मान त्यांचा मुलगा सुदेश मालकर्णेकर यांनी स्वीकारला.

जीपीसीसीचे सरचिटणीस अमरनाथ पणजीकर यांनी स्वागत केले, तर गट अध्यक्ष राजेंद्र कोरगावकर यांनी आभार मानले.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!