सोमवारी मदतीची साद, मंगळवारी बाचाबाची, बुधवारी धुमश्चक्री! कुणामुळे झाला राडा?

आयआयटीविरोधात स्थानिकांचा संताप

सिध्देश सावंत | प्रतिनिधी

ब्युरो : सोमवारी रात्री मेळावलीतील तरुणांनी एक व्हिडीओ जारी केला. यात त्यांनी मदत मागितली होती. मात्र दुसऱ्या दिवशी अपेक्षेप्रमाणेच मेळावलीत संघर्ष पेटला. आंदोलक सकाळपासूनच ठाण मांडून होते. मात्र त्यांना चकवा देत अखेर सर्वेक्षणाचं काम करण्यात आलं. अखेर ही बाब लक्षात आल्यानंतर आंदोलकांच्या तळपायातली आग मस्तकात गेली. त्यानंतर तीव्र विरोध केला. पोलिस आणि आंदोलकांमध्ये बाचाबाची झाली. तोपर्यंत सर्वेक्षणाचं काम पूर्ण झालं होतं.

मंगळवारी ठिगणी, बुधवारी वणवा

मंगळवारी झालेल्या या घटनेनंतर बुधवारी हे आंदोलन पेटेल अशी भीती होती. झालंही तेच. बुधवारी दगडफेक, लाठीचार्ज या सगळ्यांमुळे मेळावलीतील आंदोलनाला हिंसक वळण लागलं. काही पोलिस जखमी झाले. त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. मात्र यानंतरही आंदोलक आपल्या भूमिकेवर ठाम राहिलेत. आजूबाजूच्या गावातील लोकही मेळावतीली लोकांच्या मदतीला धावलेत. पोलिसांसोबत झालेल्या धुमश्चक्रीनंतर आक्रमक ग्रामस्थांनी वाळपई पोलिस स्थानकाच्या दिशेने मोर्चा काढला.

विरोधाला केराची टोपली!

दरम्यान, या घटनेवर कुणाचीही बुधवारी सकाळपर्यंत कोणतीही प्रतिक्रिया सत्ताधारी आणि विरोधकांकडून आली नव्हती. दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेतली आणि सीमांकन होणार असल्याचं म्हणत आयआयटीबाबत आपण ठाम असल्याचं पुन्हा एकदा अधोरेखित केलं. सरकारी कामात व्यत्यय आणल्यास अटक करावी लागेल, असा इशाराही त्यांनी आपल्या पत्रकार परिषदेमध्ये दिला. थोडक्यात मेळावलीवासियांच्या विरोधाला मुख्यमंत्र्यांनी जराशीही किंमत नसल्याचंच अप्रत्यक्षपणे आपल्या भूमिकेतून स्पष्ट केलं. याआधी त्यांनी आयआयटीला विरोध असणाऱ्यांसोबत अजूनही चर्चेला तयार असल्याचं वारंवार नमूद केलं होतं.

पाहा मुख्यमंत्री काय म्हणाले?

स्थानिकांना वाली कोण?

मेळावलीतील स्थानिकांनी मुख्ममंत्री प्रमोद सावंत आणि विश्वजीत राणे यांच्यावर थेट गंभीर आरोप केलेत. आयआयटीला होणारा विरोध येत्या काळात अधिकच गंभीर रुप धारण करेल, असा इशारा ग्रामस्थांनी दिलाय. दरम्यान, या सगळ्यात सीमांकनाचं काम मात्र सरकारकडून रेटण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोपही करण्यात येतोय. अशातच आता रिव्हॉल्यूशनरी गोवन्सने मेळावलीतील आंदोलनात उडी घेतली आहे. त्यामुळे राजकीय दृष्ट्याही हे आंदोलन आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर निर्णायक ठरण्याची चिन्ह आहेत.

Continue. Protest at melauli

Posted by Melauli on Friday, 4 December 2020

हिंसा ते अहिंसा

गेले अनेक महिने सातत्यानं मेळावलीतील महिला गावाच्या मुख्य रस्त्यावर जमून आपला विरोध दर्शवत होत्या. शांततेच्या मार्गानं हे आंदोलन सुरु होतं. मात्र पोलिस बळाचा वापर करत हे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न झाल्यानं सरकारविरोधात रोष वाढलाय. त्यात बुधवारी या आंदोलनानं उग्र रुप धारण केलं.

अश्रूधुराचा मारा झाला. लाठीचार्ज , दगडफेक या सगळ्या राड्यात आंदोलनाला वेगळं वळण लागलंय. दिगंबर कामत यांनी ट्वीट करुन लाठीचार्जबाबत निषेध नोंदवलाय. सुरुवातीला गप्प असणारे विरोधक आता आयआयटीविरोधातील आंदोलनावरुन हळूहळू सरकारला लक्ष्य करतीय यातही शंका नाहीच.

जमीनमालकी हा राज्यातील गंभीर आणि अत्यंत मोठा प्रश्न आहे. या प्रश्नासोबत आयआयटीविरोधात वर्षाच्या सुरुवातीलाच झालेला राडा, दूरगामी परिणाम करण्याची शक्यता नाकारता येत नाही.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!