‘स्वयंपूर्ण गोवा’ स्वप्न नव्हे सत्य – मुख्यमंत्री सावंत

पालिका निवडणुका पक्षीय पातळीवर नाहीच

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी : स्वयंपूर्ण गोवा हे निवडणुकीची घोषणा नव्हे किंवा स्वप्न नव्हे तर सत्य आहे. लोकांचा माझ्या नेतृत्वावर पूर्ण विश्‍वास आहे. गोमंतकीयांच्या अढळ विश्‍वासावरच गोवा स्वयंपूर्ण करण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले. येथील एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.

यंदा आपण गोवामुक्तीचे हीरक महोत्सवी वर्ष साजरे करत आहोत. यासाठी केंद्राकडे 100 कोटी रुपये मागितले होते. पण केंद्र सरकारने यांनी गोव्याला 300 कोटी रुपये दिले. यासाठी मी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचा आभारी आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले. हीरक महोत्सव म्हणजे केवळ एखादा कार्यक्रम किंवा उप्रकम नव्हे तर आपल्यासाठी मोठी बाब आहे. आगामी पिढीला गोव्याची संस्कृती, इतिहास माहीत असायला हवा. तसेच प्रत्येक गोमंतकीयांपर्यंत विकास पोहोचायला हवा, यासाठी उपनगरे, शहरांसह ग्रामीण भागात पायाभूत सुविधा निर्माण करण्यात येतील. पंचायती, पालिकांना यापूर्वीच 50 लाख रुपये घोषित केले आहेत. यासाठी त्यांनी समापयोगी प्रकल्प उभारावा. तसेच हा प्रकल्प एक वर्षात पूर्ण करणे आवश्यक आहे, असे डॉ. सावंत एका प्रश्‍नावर उत्तर देताना म्हणाले.

केंद्र सरकारने हीरक महोत्सवी वर्षासाठी 300 कोटी रुपये जाहीर केल्यानंतर अनेकांनी पत्रकार परिषदा घेऊन हे पैसे कसे खर्च करावेत, याचे सल्ले देण्यास सुरुवात केली आहे. मी राज्याचा अर्थमंत्रीही आहे. मला हे पैसे कसे खर्च करायचे याची चांगलीच माहिती आहे. गोमंतकीयांचे हित हेच माझ्यासाठी महत्त्वाचे असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
राज्यातील प्रत्येक विकासकामांना विरोध करणार्‍या विरोधकांची मला चिंता नाही. तर प्रकल्प होत असलेल्या ठिकाणचे स्थानिक लोक आणि ग्रामस्थ यांची मला चिंता आहे. यामुळेच लोकांना नको असलेलेे प्रकल्प सरकारने सध्या स्थगित ठेवले आहेत, असेही ते म्हणाले.

भाजपसाठी कोणतीही निवडणूक ही फायनलच असते. सेमीफायनल वगैरे असे काही आम्ही मानत नाही. आणि प्रत्येक निवडणूक ही महत्त्वाची मानून आम्ही कार्यरत असतो. यंदाची पालिका निवडणूक पक्षाच्या चिन्हावर होणार नाही, याचा पुनर्उच्चार त्यांनी यावेळी केला. प्रभाग फेररचना आणि आरक्षणावरून सुरू असलेल्या आरोपांबाबत विचारले असता मुख्यमंत्री म्हणाले, यात सरकारने किंवा पक्षाने काहीही हस्तक्षेप केलेला नाही. निवडणूक लढण्याची ज्या लोकांची संधी हुकली आहे, ते लोक असले आरोप करतातच. त्याकडे फारसे लक्ष देण्याची गरज नाही, असे ते म्हणाले.

गोमंतकीय गेले दोन वर्षे माझे काम पाहत आहेत. प्रशासनावरील घट्ट पकड आणि कोरोना महामारीच्या प्रचंड अडचणीच्या काळातही केलेले आर्थिक नियोजन यामुळेच पक्षाने आगामी विधानसभा निवडणूक माझ्या नेतृत्वाखाली लढली जाईल, असे जाहीर केले. यासाठी मी पक्षाचा आभारी असल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले. विरोधक कितीही बोलत असले तरी राज्यात मध्यावधी निवडणुका होणार नाहीत. अजून बरीच कामे प्रलंबित आहेत. कोरोनामुळे थांबली आहेत. ही कामे पूर्ण करणे आवश्यक आहेत. यामुळे निवडणूका ठरलेल्या वेळेतच होतील, असे स्पष्ट विधान मुख्यमंत्र्यांनी केले.

केंद्र सरकारकडून मिळणार्‍या 300 कोटी रुपयांतून राज्यातील वारसास्थळे आणि स्मारके यांची डागडुजी केली जाईल. गेल्या 60 वर्षांपासून दीपाजी राणे यांचे स्मारक दुर्लक्षित आहे. बेतुल किल्ल्याकडेही दुर्लक्ष झाले आहे. पुढील पिढीसाठी गोवा जतन करून ठेवणे आवश्यक असल्याने लोकापयोगी कामांसह इतर कामेही केली जातील. तसेच ही स्थळे पर्यटनस्थळ म्हणून विकसित केली जातील, असे मुख्यमंत्री म्हणाले.

मुलाखतीच्या शेवटी मुख्यमंत्री म्हणाले, दूध, फळे, फुले, कडधान्य, तांदूळ, चिकन, अंडी यासारख्या छोट्या – छोट्या उद्योग व्यवसायातून गोवा स्वयंपूर्ण होईल. सध्या यातील बहुतांश गोष्टी अन्य राज्यातून आणाव्या लागत असल्या तरी भविष्यात याची आयात कमी-कमी होत जाईल, असा विश्‍वास डॉ. सावंत यांनी व्यक्त केला. तसेच आगामी काळात राज्यात सरकारी नोकर्‍या तयार होतील. कोरोना महामारीमुळे सध्या आर्थिक घडी मोडली असली तरी येत्या काही महिन्यात सर्व काही सुरळीत होईल, असेही मुख्यमंत्री एका प्रश्‍नावर उत्तर देताना म्हणाले.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!