काँग्रेस-भाजप कार्यकर्ते आमनेसामनो! मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या पत्नीचे काँग्रेसला ३ सवाल

सद्बुद्धी यात्रेवरुन भाजप कार्यकर्ते आक्रमक

विनायक सामंत | प्रतिनिधी

साखळी : साखळीत आज भाजप आणि काँग्रेसचे कार्यकर्ते एकमेकांसमोर उभे ठाकले होते. काँग्रेसच्या सद्बुद्धी यात्रेची हवाच भाजपच्या कार्यकर्त्यांनी काढून घेतली. यावेळी आक्रमक झालेल्या भाजपच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. त्याशिवाय विरोधी पक्षनेत्यांच्या आणि गिरीश चोडणकरांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहनही करण्यात आलं. मोठ्या संख्येनं एकवटलेल्या भाजपच्या कार्यकर्त्यांच्या गर्दीमुळे सोशल डिस्टन्सिंगचाही पुरता फज्जा उडाला होता. दरम्यान, यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांचाही मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या पत्नी सुलक्षणा सावंत याही भाजपच्या कार्यकर्त्यांसह घोषणाबाजी करताना दिसून आल्यात.

सुलक्षणा सावंतही आक्रमक

यावेळी भाजपच्या कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या समर्थनात जोरदार घोषणाबाजी करत काँग्रेसवर सडकून टीका केली आहे. गिरीश चोडणकर आणि विरोधी पक्षनेते यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला चपलेने बडवण्यात आलं. त्यानंतर या प्रतिकात्मक पुतळ्याचं घोषणाबाजी करत दहनही करण्यात आलं. असंख्य भाजप कार्यकर्ते यावेळी साखळीत एकवटले होते. भाजप कार्यकर्त्यांच्या संख्येपुढे काँग्रेसच्या सद्बुद्धी यात्रेचा फज्जा उडाल्याची चर्चा साखळीत रंगली आहे. दरम्यान, यावेळे भरपावसात असंख्य कार्यकर्त्यांसह मुख्यमंत्र्यांची पत्नी सुलक्षणा सावंत यादेखील कार्यकर्त्यांसह काँग्रेसला उत्तर देण्यासाठी मैदनात उतरल्या होत्या.

सडकून टीका

यावेळी सुलक्षणा सावंत यांनी विधानसभेतून पळ काढणाऱ्या काँग्रेसच्या आमदारांवर सडकून टीका केली. सद्बुद्धीची गरज नेमकी काँग्रेसला असल्याचं म्हणत त्यांनी जोरदार हल्लाबोल केला. सद्बुद्धी यात्रेला तोडीस तोड उत्तर देण्यासाठी आलेल्या भाजप कार्यकर्त्यांचं मनोबल उंचावण्यासाठी सुलक्षणा सावंतही घोषणाबाजी करताना दिसून आल्या होत्या. यावेळी पत्रकारांशी बोलताना सुलक्षणा सावंत यांनी काँग्रेसच्या नेत्यांना सवाल केलेत. मतदारांच्या तोंडाला पानं पुसत विरोधकांनी सभात्याग करणाऱ्या काँग्रेस आमदारांच्या भूमिकेवर त्यांनी टीका केली. लोकांचा विश्वासघात काँग्रेसच्या नेत्यांनी केल्याची टीका करताना खाणसंबंधी असलेल्या काँग्रेसच्या भूमिकेवरुनही त्यांनी प्रस्न उपस्थित केलेत.

तणाव!

रविवारी संध्याकाळपासूनच साखळीतील हाऊसिंग बोर्ड जंक्शनजवळ तणाव पाहायला मिळाला होता. मोठ्या संख्येनं उपस्थित झालेल्या भाजप आणि काँग्रेस कार्यकर्ते एकमेकांसमोर उभे ठाकल्यानं पोलिसांनीही खबरदारी घेत फौजफाटा वाढवला होता. अखेर सद्बुद्धी यात्रेचं आयोजन फसलं आणि मुख्यमंत्र्यांनीही काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना भेट न दिल्यानं साखळीतील राजकीय वातावरण रविवारी ढवळून निघालं होतं.

पाहा व्हिडीओ –

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!