नाराज भाजप नगरसेवकांबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं विधान

पक्षपात झाला नसल्याचाही दावा : मुख्यमंत्री

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी : पालिका तसेच पणजी महानगरपालिकेचे (मनपा) प्रभाग राखीवता नियमांनुसारच करण्यात आलेले आहे. राखीवतेबाबत पंचायत संचालनालयाने निर्णय घेतला असून, त्याची अंमलबजावणी केलेली आहे. राखीवतेबाबत सत्ताधारी भाजपचे नगरसेवक नाराज आहेत. यातून राखीवतेबाबत सरकारने कोणताही पक्षपात केलेला नाही, हेच सिद्ध होते, असा दावा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी बुधवारी पत्रकारांशी बोलताना केला.

अनेकांचे पत्ते कट

पालिका तसेच पणजी मनपाच्या प्रभाग राखीवतेवरून सत्ताधारी भाजपच्या काही नगरसेवकांचे पत्ते कट झाले आहेत. त्यामुळे त्यांच्यातून मोठ्या प्रमाणात नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर बोलताना, भाजप नगरसेवक नाराज आहेत, याचा अर्थ सरकारने राखीवता जाहीर करताना पक्षपातीपणा केला नसल्याचेच उघड होते. पालिका संचालनालयाने नियमांनुसारच राखीवता जाहीर केली आहे, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, काँग्रेस आणि मगोमधून भाजपमध्ये आलेल्या आमदार बाबूश मॉन्सेरात, उपमुख्यमंत्री चंद्रकांत कवळेकर, उपमुख्यमंत्री मनोहर आजगावकर, आरोग्यमंत्री विश्वजीत राणे, उपसभापती इजिदोर फर्नांडिस व आमदार क्लाफासियो डायस यांच्या समर्थक नगरसेवकांसाठी भाजपने आपल्या मूळ नगरसेवकांवर अन्याय केला, असा आरोप सत्ताधारी भाजप नगरसेवक व नेत्यांकडून होत आहे.

कुणाला फटका?

प्रभाग फेररचना व राखीवतेचा आयात नेत्यांच्या समर्थकांना फायदा झाला आहे, पण मूळ भाजप नगरसेवकांचे अस्तित्व मात्र धोक्यात आले आहे, असे ते जाहीरपणे सांगत आहेत. पणजी मनपातील प्रभाग फेररचना आणि राखीवतेमुळे भाजपच्या सत्ताधारी आठ नगरसेवकांना फटका बसला आहे. पालिका संचालनालयाने राखीवता जाहीर करताना नेमका कोणता फॉर्म्युला वापरला हे जाहीर करावे, अशी मागणी भाजप प्रवक्ते दत्तप्रसाद नाईक यांनी केली आहे. तर आपण भाजपचाच आमदार असून, मनपातील तीसही प्रभागांत भाजपचेच नगरसेवक निवडून येतील, असा विश्वास आमदार बाबूश मॉन्सेरात यांनी व्यक्त केला आहे.

आलेक्स रेजिनाल्ड यांचा निशाणा

काँग्रेस आमदार आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स यांनी राखीवतेवरून राज्य सरकारवर निशाणा साधला. राज्यातील भाजप सरकार लोकशाही धोक्यात आणू पाहत असल्याचे पालिका राखीवतेवरून सिद्ध होते. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार ५६ टक्क्यांपेक्षा अधिक जागा राखीव ठेवता येत नाहीत. पण सरकारने मात्र या निर्णयाला पायदळी तुडवल्याचा आरोप त्यांनी केला. निवडणूक आयोग सरकारच्या हातातील बाहुले बनले आहे. त्याचा फायदा भाजप उठवत असल्याचेही लॉरेन्स यांनी नमूद केले आहे.

पाहा स्पेशल रिपोर्ट –

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!