सरकार चर्चेस तयार, आंदोलनांची गरज नाही

सरकारच्या महत्वाकांक्षी प्रकल्पांना मोठ्या प्रमाणात लोकांचा विरोध होत आहे. मुख्यमंत्र्यांनी याबाबत सावध पवित्रा घेत चर्चेला तयार असल्याचे आवाहन आंदोलकांना केलय.

विश्वनाथ नेने | प्रतिनिधी

पणजी राज्यात येऊ घातलेल्या मेगा प्रकल्पांविरोधात मोठ्या प्रमाणांत जनआंदोलने सुरू आहेत. सरकार मोठ्या प्रमाणात लोकांच्या रोषाला सामोरे जात असतना त्या संदर्भात मुख्यमंत्र्यानी महत्वाचं विधान केलय. सरकार चर्चेस तयार आहे, आंदोलने करण्याची गरज नसल्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत म्हणाले.

मोलेतील वीज प्रकल्प, रेल्वे डबल ट्रॅक, हायवे रुंदीकरण या तीन मेगा प्रकल्पांबाबत मोठ्या प्रमाणात लोक रस्त्यावर उतरलेत. सरकार हे प्रकल्प कोळसा हाताळणीच्या छुप्या उद्देशानें पुढे ढकलत असल्याचा आरोप होत आहे. सरकारला लोकांची पर्वा नाही. सरकार अदानीच्या फायद्यासाठी गोव्याच्या लोकांशी आणि निसर्गाशी खेळत असल्याचा आरोप होत आहे.

दुसऱ्या बाजूला सत्तरीतील प्रास्तावित आयआयटी प्रकल्पाबाबतही लोक आक्रमक झाले आहेत. कोणत्याही परिस्थितीत शेळ मेळावलीत आयआयटी करू देणार नाही, यावर स्थानिक ठाम आहेत. सरकारने आधी लोकांचा जमीन मालकी हक्काचा प्रश्न सोडवावा, अशी मागणी आंदोलक करताहेत. सत्तरी तालुक्यात या मागणीने जोर धरलाय.

एका बाजूला कोविड 19 महामारी, मायनिंग बंदी या समस्यांमुळे जर्जर झालेल्या आर्थिक परिस्थितीमुळे सरकार मेटाकुटीला आलंय. दुसऱ्या बाजूला सरकारच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांना मोठ्या प्रमाणात विरोध होतोय. अशा परिस्थितीत मुख्यमंत्र्यांनी सावध पवित्रा घेतल्याचे दिसत आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!