चरणजीत सिंग चन्नी यांचा आज शपथविधी; पंजाबचे नवे मुख्यमंत्री म्हणून घेणार शपथ

चर्चेतील नावांना वगळून काँग्रेसकडून धक्कातंत्राचा वापर

Goan Varta Live | प्रतिनिधी

चंदिगड: काँग्रेस नेते चरणजित सिंग चन्नी पंजाबचे नवे मुख्यमंत्री होतील, असं ट्विट काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हरीश रावत यांनी केलं आहे. रविवारी दिवसभर चाललेल्या बैठकीनंतर चरणजीत सिंग चन्नी यांच्या नावावर काँग्रेसश्रेष्ठींकडून शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे. चन्नी यांनी सायंकाळी राज्यपालांची भेट घेऊन सत्ता स्थापन करण्याचा दावा केला आहे. चन्नी हे सोमवारी सकाळी ११ वाजता मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. मुख्यमंत्रिपदी निवड झाल्यानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी चन्नी यांचे अभिनंदन केले आहे. चन्नी हे पंजाबचे पहिले दलित मुख्यमंत्री असतील.

पंजाबच्या मुख्यमंत्रिपदासाठी सुखजिंदर सिंग रंधावा, नवज्योतसिंग सिद्धू, सुनिल जाखड आणि माजी केंद्रीय मंत्री अंबिका सोनी यांच्या नावांची चर्चा होती. त्यात सर्वाधिक चर्चेत सुखजिंदरसिंग रंधावा यांचे नाव होते. मात्र, या सर्व नेत्यांना डावलून चन्नी यांना काँग्रेसकडून संधी देण्यात आली आहे. कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर पंजाबमध्ये जोरदार राजकारण रंगले होते. यापूर्वी सुखजिंदर सिंह रंधावा यांच्या नावाची चर्चा होती. मात्र, चरणजीत सिंग चन्नी यांच्या नावाची घोषणा हरीश रावत यांनी केली आहे. चरणजीत सिंग चन्नी हे ४८ वर्षांचे आहेत. आतापर्यंत ते तीन वेळा आमदार झाले आहेत. राज्यात अकाली दल आणि भाजपाची सत्ता असताना चन्नी विधानसभेत विरोधी पक्षनेते होते. ते चमकौर साहिब मतदारसंघाचे आमदार असून त्यांनी मंत्री म्हणून तांत्रिक शिक्षण आणि औद्योगिक प्रशिक्षण, रोजगार निर्मिती आणि प्रशिक्षण तसेच पर्यटन आणि संस्कृती व्यवहार विभागाची जबाबदारी सांभाळली होती. पक्षाच्या नेत्यांनी मांडलेल्या मुद्द्यांकडे माजी मुख्यमंत्री लक्ष देत नाहीत म्हणून त्यांनी कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या विरोधात आवाज उठवला होता.

चरणजीत सिंग चन्नी यांनी घेतली राज्यपालांची भेट

मुख्यमंत्रिपदी निवड झाल्यानंतर चरणजीत सिंग चन्नी यांनी राज्यपालांची भेट घेतली. यावेळी पंजाब काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धूही होते. चन्नी हे सिद्धू यांचे निकटवर्तीय मानले जातात. राज्यपालांना आपण आमदारांच्या पाठिंब्याचे पत्र दिले आहे. आपली विधिमंडळ पक्ष नेतेपदी एकमताने निवड झाली आहे. राज्यपालांकडे सरकार स्थापनेचा दावा आपण केला आहे, असं चन्नी यांनी राज्यपालांच्या भेटीनंतर सांगितले. सोमवारी सकाळी ११ वाजता शपधविधी होईल, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

स्वातंत्र्यानंतर पंजाबमध्ये आतापर्यंत १५ मुख्यमंत्री

स्वातंत्र्यानंतर पंजाबमध्ये आतापर्यंत १५ मुख्यमंत्री झाले. पण यांपैकी एकही दलित नव्हता. १५ पैकी ३ मुख्यमंत्री हिंदू होते. ग्यानी झैलसिंग वगळता बाकीचे सर्वच मुख्यमंत्री जाट शीख होते. ग्यानी झैलसिंग हे रामगढीया समाजातून येतात. हा समाज पंजाबमधील ओबीसी म्हणजेच इतर मागासवर्गीयांमध्ये येतो.

मुख्यमंत्री पद कोणाला द्यायचे हा पक्षश्रेष्ठींचा निर्णय

मुख्यमंत्री पद कोणाला द्यायचे हा पक्षश्रेष्ठींचा निर्णय आहे. मी त्यांच्या निर्णयाचे स्वागत करतो. चन्नी माझ्या लहान भावासारखे आहेत. मी अजिबात निराश नाही, असं काँग्रेस नेते सुखजिंदर सिंग रंधावा म्हणाले.

मुख्यमंत्रिपदी निवड झाल्याबद्दल चन्नी यांचं अभिनंदन

मुख्यमंत्रिपदी निवड झाल्याबद्दल चन्नी यांचं अभिनंदन. सीमेपलिकडील सुरक्षेचा वाढता धोका लक्षात घेता होणारे मुख्यमंत्री चन्नी हे सीमेची आणि पंजाबच्या जनतेची सुरक्षा करतील अशी अपेक्षा आहे, असं पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग म्हणाले.

हा व्हिडिओ पहाः Huge Fish Dead | 30 ते 35 फूट लांब व्हेल मासा मृतावस्थेत आढळला

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!