धारगळात आंदोलकांकडून उपमुख्यमंत्र्यांचा निषेध, काळे बावटे दाखवून घोषणाबाजी

मोपा महामार्ग रद्द करण्याची मागणी

Goan Varta Live | प्रतिनिधी

पेडणे : धारगळ ते मोपा दरम्यान होणाऱ्या राष्ट्रीय महामार्गासाठी जमिनी गेलेल्या शेतकऱ्यांचा या महामार्गाला तीव्र विरोध सुरू आहे. शनिवारी पत्रकार परिषद घेऊन हा महामार्ग रद्द करण्यासाठी स्थानिक आमदार तथा उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर यांनी प्रयत्न न केल्यास त्यांना काळे बावटे दाखवले जातील, असा इशारा देण्यात आला होता. रविवारी उपमुख्यमंत्री दाडाचीवाडी धारगळ येथे एका कार्यक्रमासाठी आले होते. तेव्हा पीडित शेतकऱ्यांनी त्यांना काळे बावटे दाखवले. त्यांच्या विरोधात घोषणा देऊन परिसर दुमदुमून सोडला.

गेले अनेक दिवस सरकारच्या विरोधात हे पीडित शेतकरी आंदोलन करत आहेत. महामार्गाच्या जमिनीचा सर्व्हे करण्यासाठी आलेल्या अधिकाऱ्यांनाही आंदोलकांनी विरोध दर्शवला होता. या आंदोलनात महिलांची संख्या मोठी राहिली आहे. शनिवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत आंदोलकांनी स्थानिक आमदार बाबू आजगावकर यांना आपल्यासोबत येण्याचे आवाहन केले होते.

हेही वाचा – MOPA | धारगळमधील लोकांची अस्तित्त्वाची लढाई

रस्ता होऊ नये, आमच्या जमिनी आम्हाला परत कराव्यात यासाठी सरकार दरबारी प्रयत्न करण्याची मागणी केली होती. तसेच उपमुख्यमंत्र्यांनी प्रतिसाद न दिल्यास ते जिथे जातील, तेथे त्यांना काळे बावटे दाखवण्याचा इशारा दिला होता. रविवारी रात्री उपमुख्यमंत्री दाडाचीवाडी धारगळ येथे एका कार्यक्रमाच्या निमित्ताने आले होते. कार्यक्रम आटोपून ते परत जात असताना मोठ्या संख्येने आंदोलकांनी त्यांना काळे बावटे दाखवले व त्यांच्या विरोधात घोषणा दिल्या. आंदोलकांनी त्यांचा निषेध करणारे फलकही हातात धरले होते.

हेही वाचा – MOPA | मोपात दिसला ‘मेळावली पॅटर्न’

हेही पाहा – Mopa | प्रकल्पाला विरोध करणाऱ्यांचं नेमकं म्हणणं काय आहे, तेही ऐकून घ्यायला हवंच

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!