2022मध्ये बहुमताचे भाजप सरकार हेच उदि्दष्ट; शीतल दत्तप्रसाद नाईक

विश्वनाथ नेने | प्रतिनिधी
पणजी: 2022 मध्ये भाजपाचे बहुमताचे सरकार सत्तेरवर आणणे हेच ध्येय आहे, असे भाजपच्या नवनियुक्त महिला मोर्चा अध्यक्ष शीतल नाईकांनी सांगितले. गुरूवारी शीतल दत्तप्रसाद नाईकांची गोवा भाजपा महिला मोर्चाच्या अध्यक्षपदी निवड झाली. ही जबाबदारी आधी मुख्यमंत्र्यांच्या पत्नी सुलक्षणा सावंतांकडे होती. दर तीन वर्षांनी या पदावर नव्या अध्यक्षांची निवड होते.
पुढे बोलताना शीतल नाईक म्हणाल्या, महिला मोर्चाच्या माध्यमातून भाजपाचे काम तळागाळापर्यंत पोचवणार. राज्यातील 40 मतदारसंघात महिला मोर्चा सक्रिय करणे, तसेच महिलांचे सशक्तीकरण करणार. या जबाबदारीबदद्ल मी गोवा भाजपाची कोअर टीम, सगळे नेते, ताळगांवचे कार्यकर्ते तसेच राज्यातील महिला नेत्यांचे मनापासून आभार मानते.
पदाचा वापर फक्त राजकारणासाठी नाही
महिला मोर्चा अध्यक्ष या पदाचा वापर फक्त राजकारणासाठी करणार नाही, असे नाईक म्हणाल्या. या पदाच्या माध्यमातून समाजातील महिलांचें प्रश्न आणि समस्या सोडविण्याचे काम मी आणि माझ्या सहकारी करणार असल्याची ग्वाही शीतल नाईकांनी दिली. शीतल नाईक पणजी महानगरपालिकेच्या नगरसेविका आहेत. गोवा बालभवनच्या अध्यक्षपदाची जवाबदारीही त्या यशस्वीपणे सांभाळत आहेत.