लोकांशी चांगले संबंध ठेवा! मतदारांचा विश्वास जिंकून निवडणुकीला सामोरे जा: भाजपाध्यक्ष

मंत्री, भाजप आमदारांसोबतच्या बैठकीत नड्डा यांचा सल्ला

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांचं गोव्यात आगमन झाल्यानंतर त्यांनी लगेचच आमदार, मंत्र्यांसोबत बैठक घेत चर्चा केली. या चर्चेदरम्यान त्यांनी सर्वांना महत्त्वाचा कानमंत्र दिलाय. लोकांशी चांगले संबंध ठेवण्याचं आवाहन करताना मतदार संघातील विकासकामांना गती देऊन मतदारांचा विश्वास जिंकण्याचं आवाहन त्यांनी यावेळी भाजपच्या सर्व कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांनी दिलंय. मतदारांचा विश्वास जिंकून निवडणुकीला सामोरं जाण्याचा सल्ला यावेळी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी दिलाय.

ताज विवांतामध्ये भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांच्या उपस्थितीत महत्त्वाची बैठक पार पडली. यावेळी जे पी नड्डा यांनी भाजपच्या १०० पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. मोजक्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत त्यांनी मार्गदर्शन केलं. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर याआधी जे पी नड्डा यांचा गोवा दौरा काही वेळा रद्द करण्यात आला होता. तर काही वेळा वेगवेगळ्या कारणांमुळे पुढे ढकलण्यात आला होता. दरम्यान, आता २०२२च्या तयारीच्या अनुशंगाने कार्यकर्त्यांमध्ये नवा उत्साह आणि जोश भरण्यासाठी जे पी नड्डा यांनी मोलाचं मार्गदर्शन केलंय. राज्यातील वेगवेगळ्या राजकीय समीकरणांच्या अनुशांगाने त्यांनी महत्त्वाचा सल्लाही भाजपच्या पदाधिकाऱ्यांना दिलाय.

प्रशंसा आणि अभिनंदन

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी मुख्यमंत्री, पक्षाचे सर्व मंत्री आणि आमदार यांच्यासोबती बैठक घेतली. मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत आणि आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी कोविड काळात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीचे श्री जे पी नड्डा यांनी कौतुक केलंय. पक्षाचे सर्व मंत्री, पदाधिकारी आणि आमदारांनी कोविड काळात केलेल्या कामाची त्यांनी प्रशंसा केली आणि अभिनंदनही केले.

पक्षाच्या आमदारांनी आपापल्या मतदारसंघात केलेली मदत, लसीकरण मोहिमेची जनजागृती, गोरगरिबांना केलेले अर्थसाहाय्य याबद्दलही श्री नड्डा यांनी समाधान व्यक्त केले. कोविड महामारी अजूनही संपलेली नाही. देशात आणि राज्यांत मोठ्या प्रमाणात लसीकरण सुरू आहे. या पार्श्वभूमीवर पक्षाच्या सर्व मंत्री आणि आमदार यांनी सजग राहून आपले समाजकार्य यापुढेही असेच सुरू ठेवावे, असे आवाहन त्यांनी केलंय. गेले १२-१३ दिवस कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे राज्यात अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली होती. अनेक गावांत आणि घरांत पाणी शिरल्याने मोठे आर्थिक आणि मालमत्तेचे नुकसान झाले आहे. या विषयावरही यावेळी महत्त्वाची चर्चा करण्यात आली. आर्थिक नुकसान झालेल्यांना तसेच समस्याग्रस्त लोकांना मदत करा. तसेच विद्यमान परिस्थितीवर लक्ष ठेवा. आणि गरजूंना आवश्यक ती मदत करा, अशी सूचना श्री नड्डा यांनी यावेळी केली.

उद्याही महत्त्वपूर्ण बैठका

उद्याही जे पी नड्डा गोव्यात असून उद्याही भाजपच्या पदाधिकाऱ्यांसोबत त्यांच्या वेगवेगळ्या बैठका होण्याची शक्यता आहे. राज्यातील तिकीट वाटपाचा मुद्दा असेल, अंतर्गत बंडाळी असेल किंवा इतर राजकीय प्रतिस्पर्ध्यांना कसं तोडं द्यायचं, याबाबतची रणनिती असेल, याबाबतही नड्डा यांच्या गोवा दौऱ्यात महत्त्वपूर्ण चर्चा होणार, हे नक्की. दरम्यान, आज दुपारी २ वाजता जे. पी. नड्डा यांचं दाबोळी विमानतळावर दणक्यात स्वागत करण्यात आलं होतं. यावेळी मुख्यमंत्र्यांसह भाजपचे ज्येष्ठ नेत्यांचीही जातीनं नड्डा यांच्या स्वागतासाठी हजेरी पाहायला मिळाली होती. मोठ्या संख्येनं कार्यकर्तेही यावेळी नड्डा यांच्या स्वागतासाठी दाबोळी विमानतळावर दाखल होते.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!