‘सीएम सावंत गोव्यात तर श्रीपाद दिल्लीत चांगलं काम करतात’

भाजप राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांची स्पष्टोक्ती

किशोर नाईक गावकर | प्रतिनिधी

पणजी : राज्यात आगामी विधानसभा निवडणुका मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखालीच लढवल्या जाणार आहेत. ते खूप चांगलं काम करत आहेत आणि गोव्याच्या सर्वांगिण विकासाला त्यांनी चालना मिळवून दिली आहे. केंद्रीयमंत्री म्हणून श्रीपाद नाईक हे दिल्लीत चांगलं काम करतात असंही नड्डा म्हणाले. डॉ. प्रमोद सावंत यांच्या नावाला प्रदेश कोअर समितीने पसंती दिली आहे. निवडणुकीसंबंधीचे निर्णय केंद्रीय निवडणूक समिती घेते. परंतु नेतृत्वाच्याबाबतीत वेगळा विचार होण्याचा प्रश्नच नाही, असंही जे.पी.नड्डा म्हणाले. जे.पी.नड्डा यांच्या या वक्तव्यातून आगामी निवडणुकीत भाजपचा चेहरा डॉ. प्रमोद सावंतच असतील हे पुन्हा एकदा अधोरेखीत झालंय. डॉ. सावंत यांच्या नेतृत्वाबाबत पक्षात संशय आणि संभ्रमाचे वातावरण तयार करणाऱ्या नेत्यांना ही जोरदार चपराक ठरली.

जे.पी. नड्डा खूश हुए

शनिवारी दोन दिवसांच्या गोवा भेटीवर आलेले भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा गोव्याच्या आदरातिथ्याने बरेच खूश झालेत. शनिवारी कोविडच्या काळातही त्यांचं पक्षानं जोरदार आणि जल्लोषात स्वागत करून कोविडची परिस्थिती राज्यात बरीच सुधारल्याचं अप्रत्यक्ष दाखवून दिलं. यानंतर त्यांनी शनिवारी पक्षाचे सर्व आमदार, मंत्री, पदाधिकारी आणि प्रमुख कार्यकर्ते यांच्याशी वार्तालाप केला. आगामी विधानसभा निवडणुकीची तयारी, कोविड व्यवस्थापन तसंच राज्यात ओढवलेल्या पूरजन्य परिस्थितीवर मात करण्यासंबंधीच्या विषयांवर सखोल चर्चा झाली. यावेळी प्रत्येक आमदार, मंत्र्यांनी आपले विचार त्यांच्यापर्यंत पोहचवल्याची खबर आहे.

हेही वाचा : Tito’sचे मालक रिकार्डो डिसोझांनी भाजप हायकमांडसमोर वाचला व्यथांचा पाढा?

तिकिटांची चाचपणी

काँग्रेस तथा अन्य पक्षातून भाजपात दाखल झालेल्या आमदारांनी आपल्या तिकिटाबाबतची चाचपणी या भेटीत केल्याची खबर आहे. विशेषकरून भाजपात दाखल झालेल्या काही अल्पसंख्याक आमदार, मंत्र्यांनी आपली कैफियत त्यांच्यापुढे मांडल्याचीही खबर आहे. या आमदारांना पक्षाने अपक्ष निवडणूक लढविण्याची मोकळीक द्यावी तसेच बाहेरून पाठींबा द्यावा असाही प्रस्ताव पुढे करण्यात आल्याचे कळते. या व्यतिरीक्त निष्ठावंत आणि नवे असा जो काही वाद सुरू झालाय, त्यासंबंधीच्या तक्रारीही जे.पी.नड्डा यांच्यासमोर पोहचल्यात, अशीही खबर मिळालीय.

विजयाची खात्री असणाऱ्यांना दिलासा

घराणेशाही आणि एका घरात अनेकांना तिकीटं या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत, असं जे.पी.नड्डा म्हणालेत. या वक्तव्याने त्यांनी एकाच कुटुंबात अनेकांना तिकिटांची अपेक्षा असलेल्यांना किंचित दिलासा दिलाय. विजयाची खात्री असलेल्यांना हमखास तिकीट मिळेल, असाच संदेश त्यांच्या या वक्तव्यातून बाहेर गेलाय. विजयाची खात्री असलेल्यांना पक्ष तिकीट नाकारू शकत नाही, असंही त्यातून स्पष्ट झालंय. अर्थात याचा संबंध फॅमिली राजशी लावणं चुकीचं असल्याचंही मत जे पी नड्डा यांनी व्यक्त केलंय.

हेही वाचा : भाजपच्या कोअर टीममध्ये बाबू कवळेकर, विश्वजीत, मॉविनची एन्ट्री

मुख्यमंत्र्यांच्या विरोधकांना चपराक

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाला अपशकून करण्यासाठी कार्यरत असलेल्या भाजपातीलच काही नेत्यांना जे.पी.नड्डा यांच्या वक्तव्यामुळे चांगलीच चपराक बसलीए. अलिकडेच राज्यसभा खासदार विनय तेंडुलकर यांनी केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक हे स्थानिक राजकारणात आल्यास त्यांचे स्वागतच करू, अशी एक भली मोठी फेसबूक पोस्ट टाकून खळबळ उडवली होती. मंत्रिमंडळातील काही सदस्य अंतर्गत पद्धतीने डॉ. सावंत यांच्या नेतृत्वाला विरोध करत आहेत. जे.पी.नड्डा यांनी प्रमोद सावंत यांच्या नावावरच शिक्कामोर्तब केल्याने आता या नाराज घटकांसमोर आव्हान उभं राहिलंय. एकतर सावंत यांचे नेतृत्व मान्य करणे किंवा नेतृत्व मान्य नसल्यास वेगळी चूल थाटणे, असे पर्याय या नेत्यांकडे राहिलेत. यासंबंधी एका नेत्याकडे चर्चा केली असता गणेश चतुर्थीनंतर हे चित्र स्पष्ट होईल, असे संकेत त्यांनी दिलेत.

हेही वाचा : मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेलं पॅकेज हे भाजपचं इलेक्शन रिव्हायव्हल पॅकेज

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!