भाजपनं जाहीर केलेल्या मनपा उमेदवारांमध्ये मोठ्या बदलांची शक्यता

वाचा काय म्हणाले, आमदार बाबूश मॉन्सेरात

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी : पणजीचे भाजप आमदार बाबूश मॉन्सेरात यांनी पणजी महानगरपालिका निवडणुकीसाठी जाहीर केलेल्या पॅनलला पक्षातील काही पदाधिकाऱ्यांकडून आक्षेप घेतला जात आहे. त्यामुळे त्यांच्या पॅनलमधील एक किंवा दोन उमेदवार अंतिम क्षणी निवडणुकीतून वगळले जाण्याची शक्यता आहे.

मंगळवारी पत्रकारांशी बोलताना आमदार बाबूश मॉन्सेरात यांनीही आपल्या पॅनलला पक्षातील काही नेते हरकत घेत असल्याचे स्पष्ट केले. आपण जाहीर केलेल्या पॅनलला बाहेरील कोणाचाही विरोध नाही; पण पक्षातील काहीजणांकडून आक्षेप घेतला जात आहे. त्यामुळे एखाद्या प्रभागातील उमेदवारात बदल होऊ शकतो. संबंधित प्रभागातील उमेदवार आपल्या पॅनलमधून निवडणूक लढवू इच्छित नाही. त्याला आपण काहीही करू शकत नाही, असे आमदार बाबूश म्हणाले.

पक्षातील जे नेते आपण दिलेल्या पॅनलला आक्षेप घेत आहेत, ते आपल्यासमोर किंवा पक्षाकडे जाऊन काहीही बोलत नाहीत. पण त्यांच्याकडून अंतर्गत विरोध सुरूच आहे. नेतृत्व करणाऱ्या लीडरसमोर नेहमीच आव्हाने असतात. आपल्यासमोरही तशी आहेत. आपण जाहीर केलेले पॅनल जनतेसमोर जाऊन मते मागेल. जनतेला त्यांनी केलेली कामे माहीत आहेत. त्याचा विचार करूनच जनता त्यांना मते देईल, असेही त्यांनी नमूद केले.

पॅनलला आक्षेप कशासाठी?

पणजी महानगरपालिका निवडणुकीत याआधी बाबूश पॅनल विरुद्ध भाजप पॅनल अशीच निवडणूक होत होती.

माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या निधनानंतर पणजीत झालेली पोटनिवडणूक काँग्रेसच्या तिकिटावर जिंकून आमदार झालेले बाबूश मॉन्सेरात लगेचच भाजपात दाखल झाले. पण भाजपातील काही नेत्यांना बाबूश यांचा भाजप प्रवेश अद्याप रूचलेला नाही.

पणजी मनपातील प्रभाग फेररचना व आरक्षणामुळे भाजपच्या काही नगरसेवकांचे पत्ते कट झाले. याला पूर्णपणे बाबूश मॉन्सेरात जबाबदार असून, ते भाजपला संपवत असल्याची भावनाही भाजपच्या काही नेत्यांची झाली आहे. त्यामुळे त्यांच्याकडून आता बाबूश यांच्या पॅनललाही आक्षेप घेतला जात आहे.

पाहा व्हिडीओ –

हेही वाचा – पणजीच्या डॅशिंग आमदारांना मंत्रिपद मिळणार?

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!