पणजीत बाबुश जिंकले खरे, पण विरोधात पडली तब्बल इतकी मतं!

४६ टक्के मते बाबूश, भाजपच्या विरोधात

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी : कोणत्याही निवडणुकांत पराभव झाल्यावरही मतांची टक्केवारी सांगून तो स्वतःचाच विजयच असल्याचे सांगण्याची परंपरा असलेल्या भारतीय जनता पक्षावर पणजी महापालिका (मनपा) निवडणुकीची टक्केवारी अंतर्मुख करायला लावणारी ठरली आहे. या निवडणुकीत भाजपने विजय मिळवला असला तरी मतांची टक्केवारी झाकली गेली आहे, त्यावर भाजपने लक्ष देण्याची वेळ आणली आहे. कारण तब्बल ४६.३३ टक्के मते ही बाबूश मॉन्सेरात आणि भाजपच्या विरोधात गेल्याचे स्पष्ट झाले आहे. ५३ टक्के मते भाजप समर्थक उमेदवारांना मिळाली आहेत. सुमारे दहा हजार मतदारांनी निवडणुकीकडे पाठ फिरवली.

थोडक्यात विजय

अर्थात २५ जागा मिळवूनही भाजप समर्थक गटाला ५३.७७ टक्के मते मिळाली आहेत. त्यातही भाजपचे चार महत्त्वाचे उमेदवार पराभूत होता होता वाचले. बाबूश मॉन्सेरात आणि भाजप एकत्र राहूनही महापालिकेच्या निवडणुकीत मोठ्या प्रमाणात मते आपल्या बाजूने वळविण्यात अपयशी ठरले आहेत.

पणजी महापालिकेसाठी ३२,०५१ मतदार होते. त्यापैकी ७०.१९ टक्के म्हणजेच २२,५१७ इतके मतदान झाले. तीसही जागांवर भाजपचे उमेदवार जिंकून येतील, असे मॉन्सेरात यांनी यापूर्वी सांगितले होते. पण भाजपतील अंतर्गत विरोधाची धग मॉन्सेरात यांना बसली आहे. भाजपच्या अनेक नेत्यांनी जाहीरपणे प्रचारात भाग घेतला नाही. उलट ज्यांनी मॉन्सेरात यांच्या गटात मजबूत असलेल्या महापौर पदाच्या दावेदारांना घरी बसवले. शेखर डेगवेकर, राहूल लोटलीकर, किशोर शास्त्री, आफोन्सो, सोरया माखीजा पिंटो अशा महत्त्वाच्या उमेदवारांना भाजपच्या नाराजीचा फटका बसला.

हेही वाचा – ‘कोण मनोज परब? मला नाही माहीत’

पक्षाच्या विरोधात काम केलेल्या सर्वांना परिणाम भोगावे लागतील, असे सांगून भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी पक्षश्रेष्ठी पणजीतील घडलेल्या मताधिक्क्याचा वचपा काढण्याच्या तयारीत आहेत, असे संकेत दिले आहेत.

महत्त्वाचं!

महापालिकेवर २५ उमेदवार निवडून येणे म्हणजे हे प्रचंड बहुमत झाले, पण मतांची टक्केवारी पाहिली तर बहुमतापेक्षा नऊ जागा जास्त मिळूनही फक्त साडेसात टक्केच जास्त मते भाजप गटाला मिळाली आहेत. भाजप गटाच्या ३० उमेदवारांना १२,०१९ मते मिळाली तर त्यांच्या विरोधातील सर्व उमेदवारांना १०,४०८ मते मिळाली.

‘आम्ही पणजीकर’ने इकडून तिकडून जमवलेल्या उमेदवारांना आपल्या पॅनेलमध्ये स्थान दिले होते. त्या उलट मॉन्सेरात यांनी पहिल्या दिवसापासून आपले पॅनेल जाहीर करून प्रचारात आघाडी घेतली होती. निकाल पाहता मॉन्सेरात यांच्या प्रचाराला मतदारांनी फारसा प्रतिसाद दिला नाही.

हेही वाचा – पतीपत्नी जोडीनं निवडणुकीला उभे राहिले, जोडीनं पडले!

हेही वाचा – नणंद भावजय लढतीत कुणी मारली पेडण्यात बाजी?

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!