पेडणेत परप्रांतीयांच्या गर्दीला बाबू आजगावकर जबाबदार !

राजन कोरगावकर यांचा आरोप

Goan Varta Live | प्रतिनिधी

पेडणे : मिशन फॉर लोकल संघटनेचे अध्यक्ष राजन कोरगावकर यांनी कासारवर्णे आरोग्य केंद्राला भेट दिली. त्यावेळी तिथं लसीकरणासाठी परप्रांतीयांचीच गर्दी अधिक होती. हे कामगार मोपा प्रकल्पावर काम करणारे आहेत. आमदार बाबू आजगावकर यांनी यात लक्ष घातले असते तर स्थानिकांना हा रोजगार मिळाला असता. त्यामुळं याला बाबू आजगावकर हेच जबाबदार असल्याचा आरोप मिशन फॉर लोकल संघटनेचे अध्यक्ष राजन कोरगावकर यांनी केलाय.

कोरगावकर यांनी भेट दिली तेव्हा लसीकरणासाठी कासारवर्णे आरोग्य केंद्रावर मोठी गर्दी होती. पण दुर्दैवाची गोष्ट म्हणजे यात गोमंतकीयांची संख्या कमी आणि परप्रांतीयांची संख्या अधिक होती. या गोष्टीची पडताळणी करण्यासाठी कोरगावकर यांनी माहिती घेतली. त्यानुसार हे परप्रांतीय बिहारमधून आलेले असून मोपा प्रकल्पावर काम करणारे आहेत. त्या कामगारांशी बातचीत केल्यानंतर असे कळले की या दोन दिवसात दिवसाला दोनशे ते अडीचशे परप्रांतीय लसीकरणाचा लाभ घेत आहेत.

यावर लसीकरण हा सगळ्यांचा अधिकार आहे. परप्रांतीयांना लसीकरण देण्यास आमचा विरोध नाही. पण गोमंतकीयांच्या आरोग्याचा विचार करणे महत्त्वाचे नाही का? असा प्रश्न कोरगावकर यांनी उपस्थित केला. त्यांच्या लसीकरणाची उपाययोजना केली असती आणि त्यांचे लसीकरण कंपनीच्या ठिकाणीच होऊ शकले असते. त्यामुळे इथे गर्दी झाली नसती, असेही ते म्हणाले.

भारत सरकार तथा मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचे सरकार उत्तम कार्य करत आहे. त्यांच्या कार्यास तोड नाही. परंतू इकडे तालुक्याचे स्थानिक आमदार तथा उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर यांचं त्यांच्या पेडण्यात लक्ष नाही. जर पेडणेकरांना नोकरीची संधी दिली असती तर आज ही परप्रांतीयांची गर्दी कमी झाली असती असेही ते म्हणाले.

आगामी निवडणुकीत पेडणेकरांनी योग्य न्याय द्यावा. पेडण्यातील मुलांसाठी मोपा प्रकल्पावर स्थानिकांनाच नोकरी मिळवून देऊ आणि त्यासाठी लागणारे प्रशिक्षण केंद्रही लवकरच उभे करू, असे आवाहन राजन कोरगावकर यांनी केलं.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!