काँग्रेस कोलमडतंय; आप सावरतंय

दिल्लीची पुनरावृत्ती गोव्यात निश्चितः मनीष सिसोदिया

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी : राज्यात सर्वाधिक काळ सत्ता उपभोगलेल्या काँग्रेसची परिस्थिती हलाखीची बनलीए. 2017 च्या निवडणूकीत सर्वांत मोठा पक्ष ठरलेल्या काँग्रेसकडे सध्या 5 आमदार आहेत. यापैकी सगळेच निवृत्तीच्या उबंरठ्यावर आहेत. एकमेव युवा आमदार आलेक्स रेजिनाल्ड लोरेन्सो यांची मात्र या ज्येष्ठांनीच कोंडी करूनठेवलीय. तिकडे प्रभारी प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर एकाकी पडलेत. कार्यकर्त्यांना तर पक्षानं जणू वाऱ्यावरच सोडून दिलंय. विरोधी पक्ष नेत्याच्या नेतृत्वाखाली पक्षाचा दोन तृतीयांश गट भाजपात दाखल झाल्यानंतर आता प्रदेश महिला अध्यक्षा अॅड. प्रतिमा कुतीन्हो ह्या आपमध्ये दाखल झाल्याने पक्षाची प्रतिष्ठा साफ लयाला गेलीए. आपने नेमकी हीच संधी साधलीए. मनीष सिसोदिया यांची गोवा भेट हीच रणनिती ठरविण्यासाठी आहे. भाजप आणि काँग्रेस पक्षातील बहुतांश अतृप्त घटकांना आपल्याकडे ओढण्यासाठी आपने जोरदार व्यूहरचना रचलीय.

पर्रीकरांचे स्वप्न आप पूर्ण करेल

माजी केंद्रीय सरंक्षणमंत्री आणि माजी मुख्यमंत्री दिवंगत मनोहर पर्रीकर यांचं विकासाचं स्वप्न केवळ आप पूर्ण करू शकेल,असं विधान दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी केलंय. विद्यमान भाजपने पर्रीकरांचा वारसा आणि त्यांच्या स्वप्नांचा चुराडा केलाय. त्यांनी गोव्याबद्दल तयार केलेलं व्हिजन पायदळी तुडवलंय. ज्यांना कुणाला हे व्हिजन सत्यात उतरवायची इच्छा आहे, त्यांनी आपमध्ये सहभागी व्हावं,असं जाहीर आव्हान सिसोदिया यांनी केलंय. गोंयकारांचे हाल सुरू आहेत. सरकारचे कोणतेच नियंत्रण राहीलेले नाही. गोव्याचं अस्तित्व आणि वेगळेपण पणाला लावण्यात आलंय. या परिस्थितीत केवळ आप हाच गोंयकारांना पर्याय आहे,असंही ते म्हणाले. दिल्लीतही अशीच थट्टा सुरूवातीला आप पक्षाच्या कार्यकर्त्यांची केली जायची. पण आपने चमत्कार करून दाखवला. गोवा आता ह्याच वाटेवर आहे. आपची थट्टा करणारे लवकरच तोंडात बोटे घालतील. आपमध्ये दाखल होणाऱ्यांची संख्या वाढत चाललीय. ही गती अशीच सुरू राहीली तर 2022 मध्ये आपचे सरकार गोव्यात सत्तेवर असणार हे लक्षात ठेवा,असंही सिसोदिया म्हणाले.

शुभम शिवोलकर आपमध्ये

आप पक्षाला वाळपई मतदारसंघात अपेक्षित नेता मिळत नव्हता. विश्वेष पोरोब यांच्याकडे ही जबाबदारी दिली होती. त्यांनी आपल्यापरीने तिथे कामही केलं होतं. परंतु अपेक्षित परिणाम मात्र ते करू शकले नाहीत. सत्तरीतील आयआयटी विरोधी आंदोलनाने अनेक नव्या युवा दमाच्या नेतृत्वाला उभारी दिली. सरकारला आपला निर्णय मागे घेण्यास या आंदोलनाने भाग पाडले. या आंदोलनाने संपूर्ण देशाचे लक्ष्य वेधून घेतले. ह्याच आंदोलनाचे नेतृत्व करणारे युवा कार्यकर्ते शुभम शिवोलकर यांनी आपल्या काही साथीदारांसह आपमध्ये प्रवेश केला. शुभम ह्याचा गाव शेळ-मेळावली असला तरी तो फातोर्ड्यात स्थायिक झालाय. शेळ-मेळावली आंदोलनानंतर मात्र त्याने सत्तरीतच ठाण मांडलीए. इंजिनियरिंगचे शिक्षण घेतलेला शुभम हा एक उत्तम चित्रकारही आहे. त्याने केलेला आप प्रवेश वाळपईत मात्र चर्चेचा विषय ठरलाय हे नक्की.

प्रतिमा बनली स्टार प्रचारक

काँग्रेसमध्ये आंदोलन जिवंत ठेवलेल्या ऍड. प्रतिमा कुतीन्हो या सध्या गोव्यातील आपच्या स्टार प्रचारक बनल्यात. काँग्रेसमध्ये त्यांच्या आंदोलनाची कुणालाही दखल घ्यावी असं वाटत नव्हतं. इथं मात्र प्रतिमा कुतीन्हो यांच्या राजकीय सक्रीयतेवर दिल्लीचे नेते खूष आहेत. त्यांना अशाच एनर्जेटिक कार्यकर्ते आणि नेत्यांची गरज आहे. लवकरच प्रतिमा कुतीन्हो यांच्याकडे महत्वाचं पद दिलं जाईल,अशी चर्चा सुरू आहे. प्रतिमा कुतीन्हो यांना पक्षाकडून वेगवेगळ्या आंदोलनासाठीची सगळी रसद पुरवली जाणार आहे. लवकरच आप एक व्यापक मोहीम राबवण्याच्या तयारीत असून प्रतिमा कुतीन्हो यांच्याकडे ही जबाबदारी दिली जाईल,अशी शक्यता आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!