कर्नाटक विरुध्द अवमान याचिका हे तर सरकारचे नाटक, आपचा आरोप

विश्वनाथ नेने | प्रतिनिधी
पणजी: कर्नाटक विरूध्द सरकारनं सुप्रीम कोर्टात दाखल केलेली अवमान याचिका हे सरकारचं नाटक आहे, असा आरोप आम आदमी पक्षाने केलाय. सरकार यातून फक्त लोकांच्या डोळ्यांना पाणी लावण्याचं काम करत आहे, असं आपचे प्रवक्ते सुरेल तिळवे यांनी म्हटलंय.
अवमान याचिका सिध्द होईल कशी?
कर्नाटकविरुद्ध अवमान याचिका सादर करण्यास सरकारला इतका उशीर का झाला?, असा सवाल आपने उपस्थित केलाय. कर्नाटकने बांध आणि कॅनॉलने म्हादईचं पाणी वळवलं असताना सरकार गप्प का?, असं म्हणत आपने हल्लाबोल केलाय. हा गोवेकरांच्या डोळ्यांना पाणी लावण्याचा प्रकार आहे, अशी टीका भाजपवर करण्यात आली आहे. केंद्र सरकारने गॅझेट नॉटिफिकेशन काढून प्रकल्पासाठी कर्नाटकला मान्यता दिली आहे. त्याच आधारे कर्नाटकचं काम सुरु आहे. कर्नाटकचे मंत्री म्हणतात की प्रकल्पासाठी गोवा सरकारच्या परवानगीची गरज नाही. अशा परिस्थितीत गोवा सरकारची अवमान याचिका कोर्टात सिध्द होईल हे कशावरुन? असा प्रश्न आपचे प्रवक्ते सुरेल तिळवे यांनी उपस्थित केला आहे.
केंद्र सरकारला नंबर गेम महत्वाचा
म्हादई गोव्यासाठी किती महत्वाची आहे, हे केंद्र सरकारला पडलेलं नाही, असा आरोप तिळवे यांनी केलाय. गोव्यात फक्त दोन खासदार आहेत. कर्नाटकात 28 खासदार आहेत. केंद्र सरकार नंबर गेमवर डोळा ठेऊन आहे, असाही गंभीर आरोप तिळवे यांनी केलाय. भाजपने म्हादई पणाला लावली असून अवमान याचिका हे सरकारचं फक्त नाटक आहे, असाही टोला आपने लगावलाय.
दोन खासदारांचा नव्हे, यांचा विचार करा…
गोव्यात जरी दोन खासदार असले तरी 15 लाख गोयकर अस्तित्त्व म्हादईवर अवलंबून असल्याचं तिळवेंनी नमूद केलं. म्हादईचं महत्व प्रत्येक गोयकराला पटलं आहे. सगळ्या गोवेकरांनी, राजकीय पक्षांनी एकत्र येऊन केंद्रावर दबाव आणला पाहिजे असं आवाहन तिळवेंनी केलं.
होम आयसोलेशन मोहिमेवर टीका
होम आयसोलेशन किटची घोषणा करुन त्यांच्यावर आपले फोटो छापायला सरकारला 4 आठवडे लागले. आता ते किट गरजू रुग्णांपर्यत पोचायला किती वेळ लागेल, असा प्रश्न आपच्या राहुल म्हांबरे यांनी केलाय. आम आदमी पक्षाने ऑक्सिमीटर मोहीमेखाली 7 हजारांवर लोकांची ऑक्जिजन लेव्हल तपासली. आम्ही बोलण्यापेक्षा काम करुन दाखवतो, असं म्हणत त्यांनी सरकारी मोहिमेवर निशाणा साधला.