राजकारण : संसदेचे पावसाळी अधिवेशन 20 जुलैपासून ! CCPA बैठकीत महत्वाचा निर्णय, समान नागरी संहितेबाबत (UCC) पेच

Goan Varta Live | प्रतिनिधी
वेबडेस्क 01 जुलै : संसदेचे पावसाळी अधिवेशन 20 जुलैपासून सुरू होणार आहे. संसदीय कामकाजावरील कॅबिनेट समितीने (CCPA) अधिवेशनाच्या तारखांना मंजुरी दिली आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली CCPA बैठकीची अधिकृत तारीख निश्चित करण्यात आली. पावसाळी अधिवेशनात केंद्रातील मोदी सरकार समान नागरी संहिता (UCC) बाबत विधेयक मांडू शकते.

संसदीय कामकाजमंत्री प्रल्हाद जोशी यांचे अधिकृत ट्विट
संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी ट्विट करून माहिती दिली की, संसदेचे पावसाळी अधिवेशन 2023 20 जुलैपासून सुरू होईल आणि 11 ऑगस्टपर्यंत चालेल. 23 दिवस चालणाऱ्या या अधिवेशनात एकूण 17 बैठका होणार आहेत. मी सर्व पक्षांना अधिवेशन काळात विधीमंडळ आणि संसदेच्या इतर कामकाजात रचनात्मक योगदान देण्याचे आवाहन करतो.”
UCC बिल सादर केले जाऊ शकते
पावसाळी अधिवेशनात मोदी सरकार समान नागरी संहितेबाबत विधेयक मांडू शकते. यूसीसीबाबत पंतप्रधान मोदींच्या नुकत्याच झालेल्या वक्तव्यानंतर त्याबाबतच्या अटकळींना जोर आला आहे. 27 जून रोजी भोपाळमध्ये पीएम मोदी म्हणाले होते की, दोन कायदे असल्यावर घर चालत नाही, तर देश दुहेरी पद्धतीने कसा चालणार? पीएम मोदींचे विधान यूसीसीच्या अंमलबजावणीकरता सोईस्कर वातावरण निर्माण करण्यासाठी असल्याचे मानले जात आहे.

कॉँग्रेस आणि विपक्षही भाजपला शह देण्यास सज्ज !
संसदेच्या अधिवेशनापूर्वी काँग्रेसनेही तयारी सुरू केली आहे. यूसीसीवर पंतप्रधान मोदींच्या वक्तव्यानंतर काँग्रेसने केंद्रावर हल्लाबोल केला आहे. अशा स्थितीत या मुद्द्यावर ग्रँड ओल्ड पार्टीची भूमिका संसदेत मांडली जाऊ शकते. पावसाळी अधिवेशनासंदर्भात काँग्रेस संसदीय समितीची (CPC) बैठक शनिवारी (1 जुलै) सोनिया गांधी यांच्या अध्यक्षतेखाली होत आहे. 10 जनपथ येथे ही बैठक बोलावण्यात आली आहे.

दिल्लीतील ट्रान्सफर पोस्टिंगच्या प्रकरणावर उपराज्यपालांना अधिकार देणाऱ्या विधेयकाबाबत मोदी सरकारला विरोधाचा सामना करावा लागू शकतो. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल देशभर फिरत आहेत आणि भाजपविरोधी पक्षांच्या भेटी घेऊन या प्रकरणी त्यांचा पाठिंबा घेत आहेत. केजरीवाल यांनीही काँग्रेसला या विधेयकाला विरोध करण्यास सांगितले आहे, मात्र कॉंग्रेस पक्षाने अद्याप आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही.