महाराष्ट्रात राजकीय भूकंप ! काकांच्या ‘फिरवलेल्या भाकरीस’ कंटाळून पुतण्याने मांडली वेगळी चूल…

एकंदरीत थोरल्या पवारांच्या राजीनामा नाट्याने या सगळ्या घटनाक्रमांची नांदी झाली.विरोधी पक्षनेतेपदाची जबाबदारी सोडून संघटनेतील कोणत्याही पदावर काम करण्याची इच्छा अजित यांनी व्यक्त केली होती.

Goan Varta Live | प्रतिनिधी

वेबडेस्क 2 जुलै | महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा राजकीय भूकंप आलाय. पहाटेच्या शपथविधीच्या अपयशाचा शिक्का पुसणारच ! ही गोष्ट मनावर घेत पुतण्याने ‘भाकरी’ एवजी सगळी चुलच हलवली. काल परवा पर्यन्त एकमेकांना पाण्यात पाहणारे आज एकत्र बसून तेच पाणी पितायत यातही काहीच आश्चर्य वाटण्याजोगे नाहीये.

एव्हाना आता महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.  शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पाडत राष्ट्रवादीचे नेते अजित पवार बंडखोरी करत शिंदे सरकारमध्ये सहभागी झाले आहेत. अजित पवार हे आता महाराष्ट्राचे नवे उपमुख्यमंत्री बनले असून ही ट्रिपल इंजिन सरकारची सुरवात आहे. त्यांच्याशिवाय आणखी 9 आमदार मंत्री झाले आहेत. मंत्री झालेल्या नेत्यांमध्ये छगन भुजबळ, दिलीप वळसे, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, धर्मराव बाबा, आदिती तटकरे, संजय बनसोडे आणि अनिल पाटील यांच्या नावाचा समावेश आहे. महाराष्ट्र राजभवनात हा शपथविधी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. अजित पवारांना ३० आमदारांचा पाठिंबा आहे. 

शपथ घेतली लगेच बायोही बदलला

दिल्लीत गुपचुप गाठी भेटी

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांची दिल्लीत गुप्त बैठक झाली, ज्यामध्ये या राजकीय बदलाची रणनीती तयार करण्यात आली. 

नेमकं झालं काय ?

एकंदरीत थोरल्या पवारांच्या राजीनामा नाट्याने या सगळ्या घटनाक्रमांची नांदी झाली. अजित पवार यांनी त्यांच्या शासकीय निवासस्थानी देवगिरी येथे आमदारांची बैठक बोलावली होती. विरोधी पक्षनेतेपदाची जबाबदारी सोडून संघटनेतील कोणत्याही पदावर काम करण्याची इच्छा अजित यांनी व्यक्त केली होती. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजित पवार महाराष्ट्र अध्यक्ष होणार असल्याची चर्चा रंगू लागली. 

अजित पवार यांच्या शासकीय निवासस्थानी उपस्थित असलेल्या आमदारांनी महाराष्ट्राच्या पक्षाध्यक्षपदाची जबाबदारी अजित पवार यांच्याकडे सोपविण्याबाबत चर्चा केली होती. नवीन सभापतींची निवड लवकरात लवकर व्हावी, अशी मागणी आमदारांनी केली होती. बैठकीला दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, छगन भुजबळ, किरण लहमटे, नीलेश लंके, धनंजय मुंडे, रामराजे निंबाळकर, दौलत दरोडा, मकरंद पाटील, अतुल बेनके, सुनील टिंगरे, अमोल मिटकरी, आदिती तटकरे, सुप्रिया सुळे (खासदार) उपस्थित होते. ), अमोल कोल्हे (खासदार), शेखर निकम, निलय नाईक उपस्थित होते. 

सभा संपताच सर्व आमदार आपापल्या वाहनाने एकत्र बाहेर आले. यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा बदल होणार असल्याच्या बातम्या येऊ लागल्या. दरम्यान, अजित पवारही निवासस्थानातून बाहेर आले आणि थेट राजभवनाच्या दिशेने गेले. मग जे काही घडले ते सर्वांसमक्ष आहेच..

राष्ट्रवादीच्या बैठकीबाबत शरद पवार काय म्हणाले?

यापूर्वीही अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या आमदारांची बैठक बोलावली होती. त्यावर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार म्हणाले की, “ही बैठक नेमकी कशासाठी बोलावली आहे हे मला माहीत नाही, पण विरोधी पक्षनेते असल्याने त्यांना (अजित पवार) आमदारांची बैठक बोलावण्याचा अधिकार आहे. या गोष्टी नियमितपणे केल्या जातात . मला या बैठकीची यावेळी फारशी माहिती नाही.”

एवढे मात्र नक्की की शिवसेना आणि कॉँग्रेस असं घडणार हे खूप आधीपासूनच जाणून होते. फक्त वेळ होती ती थोरल्या पवारांच्या भाकरी परतण्याची. ती परतली आणि अजित पवारांनी येथे आपली चुलच वेगळी मांडली. बाकी घड्याळ सोबत असले की वेळ कधी आणि कशी बदलता येते हे अजित पवारांनी अगदी अचूक पद्धतीने दाखवून दिली आहे.

दुसरीकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी येत्या काही काळात अजून काही आमदार मंत्रिपदाची शपथ घेऊ शकतात याची वाच्यता केली, तसेच एका प्रश्नाचे उत्तर देताना ते म्हणाले ” जर नागालँड मध्ये आम्ही एकत्रित सरकार स्थापन करू शकतो तर महाराष्ट्रात का नाही? “

तसेच गोव्यातले राष्ट्रवादीचे अध्यक्ष झुजे फिलिप डिसोझा म्हणाले की “आम्ही शरद पवारांच्या सोबत आहोत आणि ते जे निर्णय घेतील ते आम्हा कार्यकर्त्यांना मान असेल.”

आता हेच पाहणे औत्सुकत्याचे ठरेल की महाराष्ट्राचे राजकारण कोणत्या वळणावर जाऊन उभे ठाकणार !

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!