‘भाकरी वेळेवर परतली नाही तर ती करपते !’ म्हणत राष्ट्रवादीचे सूप्रिमो शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरुन पायउतार, महाराष्ट्रात राजकीय भूकंप

Goan Varta Live | प्रतिनिधी
मुंबई, 2 एप्रिल 2023 : गेल्या ६० वर्षांपासून महाराष्ट्राच्या आणि पर्यायाने देशाच्या राजकारणावर प्रभावी पकड असलेले नेते शरद पवार आता या पुढे सक्रिय राजकारणात दिसणार नाहीत. “योग्य वेळी भाकरी परतावी लागते, ती नाही परतली तर ती करपते, असं सूचकपणे एकदा शरद पवार म्हणाले होते. आज त्यांनी भाकरी परतवण्याची सुरुवात स्वत:पासून करत महाराष्ट्राच्या राजकारणात एक मोठी पोकळी निर्माण केली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरुन निवृत्त होणार असल्याचं सांगत पुन्हा निवडणुकीला उभा राहणार नाही, अशी मोठी घोषणा शरद पवार यांनी केली. १ मे १९६० ते १ मे २०२३ इतक्या प्रदीर्घ काळ काम केल्यानंतर कुठेतरी थांबण्याचा विचार मनात आला, असं सांगताना आता नवा अध्यक्ष कोण, याचा विचार पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी करावा, असं पवार म्हणाले.
)
शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत त्यांच्या ‘लोक माझे सांगाती’ या आत्मकथेच्या दुसऱ्या भागाचं प्रकाशन पार पडले, याच भाषणात त्यांनी निवृत्तीचा घक्कादायक निर्णय जाहीर केला. सार्वजनिक जीवनात कोठेतरी थांबण्याचा विचार करणे आवश्यक आहे. त्यामुळे मी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला आहे. तथापि शिक्षण, शेती, सहकार, क्रीडा, सांस्कृतिक क्षेत्रात अधिक काम करण्याचा माझा मानस आहे, असं त्यांनी सांगितलं.
सर्वांनाच धक्का देत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरुन निवृत्त होत असल्याचं जाहीर केलं. यानंतर शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुढील वाटचालीबाबत निर्णय घेण्यासाठी समिती सूचवली. लोक माझे सांगाती पुस्तकाच्या विस्तारित आवृत्तीच्या प्रकाशन सोहळ्यावेळी हा निर्णय जाहीर केला.

मी संघटनेच्या संदर्भातील एक निर्णय जाहीर केल्यानंतर पुढं काय करायचं , कसं जाहीर करायचा याचा निर्णय जाहीर करावा . एक समिती स्थापन करण्यासंदर्भात जयंत पाटील आणि प्रफुल पटेल यांना सुचवणार आहे, असं शरद पवार म्हणाले.
शरद पवार यांनी सूचवलेली समिती
प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, के.के. शर्मा, पी.सी. चाको, अजित पवार, जयंत पाटील, सुप्रिया सुळे, छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, अनिल देशमुख, राजेश टोपे, जितेंद्र आव्हाड, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, जयदेव गायकवाड तसेच नरहरी झिरवळ इतर सदस्य : फौजिया खान, अध्यक्षा, राष्ट्रवादी महिला काँग्रेस, धीरज शर्मा, अध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रे सोनिया दूहन, अध्यक्षा, राष्ट्रवादी युवती कॉंग्रेस आणि अध्यक्ष राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस. हे सदस्य त्या समितीत असावेत, अशा सूचना शरद पवार यांनी केल्या.
शरद पवार काय म्हणाले?
गेल्या ६० वर्षांत महाराष्ट्राने व आपण सर्वांनी मला खंबीर साथ व प्रेम दिले, हे मी विसरू शकत नाही. परंतू यापुढे पक्ष संघटनेच्या संदर्भात पुढील दिशा ठरवणे आवश्यक वाटते. रिक्त झालेल्या अध्यक्षपदाच्या निवडीबाबत निर्णय घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील सदस्यांची एक समिती गठीत करावी असे मी सुचवू इच्छितो.

१९९९ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाली तेव्हापासून गेली २४ वर्षे राष्ट्रवादी पक्षाचा अध्यक्ष म्हणून काम पाहत आहे. सार्वजनीक जीवनातील १ मे १९६० पासून सुरू झालेला हा संपुर्ण प्रवास गेली ६३ वर्षे अविरत चालू आहे. त्यापैकी ५६ वर्षे मी कुठल्या ना कुठल्या सभागृहाचा सदस्य किंवा मंत्री म्हणून सातत्याने काम करत आहे. संसदेतील राज्यसभा सदस्यपदाची पुढील ३ वर्षे शिल्लक आहेत. या काळात राज्याच्या आणि देशाच्या प्रश्नांमध्ये अधिकाधीक लक्ष घालण्यावर माझा भर असेल, याशिवाय मी कोणतीही अन्य जबाबदारी घेणार नाही.

सार्वजनिक जीवनातील १ मे, १९६० ते १ मे, २०२३ इतक्या प्रदीर्घ कालावधीनंतर आता कोठेतरी थांबण्याचा विचार करणे आवश्यक आहे. त्यामुळे मी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला आहे. तथापि शिक्षण, शेती, सहकार, क्रीडा, सांस्कृतिक क्षेत्रात अधिक काम करण्याचा माझा मानस आहे. तसेच युवक, युवती व विद्यार्थी यांच्या संघटनांकडे आणि कामगार, दलित, आदिवासी व समाजातील इतर कमकूवत घटकांच्या प्रश्नांकडे माझे लक्ष राहिल.

असे जरी असले तरी आता अजित पवार आपल्या काकांच्या सावलीतून बाहेर येत कोणती खेळी करतायत ये पाहणेही तितकेच रंजक ठरणार. तसेच सुप्रिया सुळे व अजित पवार यांच्यातील संघर्षाची ठिणगी 2024च्या विधानसभा आणि पर्यायाने लोकसभा निवडणुकीत किती रौद्र धरण करते हे पाहणे औत्सुकतेचे ठरणार आहे. कारण या घडामोडींवरच महाराष्ट्राच्या पुढील 10-15 वर्षांच्या राजकारणाची मोट बांधली जाणार हे नक्की.