कर्नाटकचा मुख्यमंत्री कोण ? शेवटी ‘हायकमांड’ने यक्षप्रश्न सोडवला; ‘असा’ ठरला फॉर्म्युला

Goan Varta Live | प्रतिनिधी
ब्यूरो रिपोर्ट, १५ मे : कर्नाटकातील विधानसभा निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर काँग्रेस पक्षासमोर मुख्यमंत्रिपदाची निवड हा मोठा प्रश्न होता. त्यातल्या त्यात राजस्थानमध्ये होणाऱ्या घडामोडींच्या हिशेबाने कॉँग्रेस हायकमांडने चांगलाच धडा घेऊन दोघंही दावेदारांना न दुखावता सुवर्णमध्य साधत हा यक्षप्रश्न प्रथमदर्शी तरी सोडवला आहे. पक्षाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कर्नाटकात पहिली दोन वर्षे सिद्धरामय्या मुख्यमंत्री असतील आणि या काळात डीके शिवकुमार उपमुख्यमंत्री असतील. यानंतर पुढील तीन वर्षे शिवकुमार यांच्याकडे मुख्यमंत्रिपदाची सूत्रे सोपवली जाणार आहेत. यासोबतच शिवकुमार उपमुख्यमंत्री असतील तेव्हा त्यांच्याकडे दोन महत्त्वाची मंत्रिपदेही असतील. पक्षाच्या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत पुनः या सूत्रावर चर्चा होणार असून त्यानंतरच अंतिम निर्णय होणार आहे.

मग ठरलं तर ! 18 मे रोजी शपथविधी
येत्या दोन दिवसांत मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा होणार असून 18 मे रोजी शपथविधी होणार असल्याचे पक्षाच्या सूत्रांनी सांगितले. या सोहळ्यात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसह अनेक कॅबिनेट मंत्रीही शपथ घेणार असल्याचे सांगण्यात येत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार जी परमेश्वरा, बीके हरिप्रसाद, एमबी पाटील, आरव्ही देशपांडे, कृष्णा बायरे गौडा, रामलिंगा रेड्डी, केजे जॉर्ज, प्रियांक खर्गे, जमीर खान, यूटी खादर, एस पाटील, लक्ष्मी हेब्बाळकर, ईश्वर खांद्रे, जारकीहोळी, संतोष लाड, सलीम अहमद. , एच महादेवप्पा, एच के पाटील आणि दिनेश गुंडू राव या मातब्बर नेत्यांचा मंत्रिमंडळात समावेश होण्याची प्राथमिकदृष्ट्या दाट शक्यता आहे.

काँग्रेसला प्रचंड बहुमत मिळाले
शनिवारी आलेल्या निकालात काँग्रेसने 136 जागा जिंकून बहुमत मिळवले आहे. त्यामुळे भारतीय जनता पक्षाला केवळ 65 जागा जिंकता आल्या. दुसरीकडे किंगमेकर बनण्याचे स्वप्न पाहणाऱ्या जेडीएसला केवळ 19 जागा जिंकता आल्या. निकाल लागल्यानंतर लगेच सिद्धरामय्या आणि डीके शिवकुमार यांचे समर्थक त्यांच्या नेत्यांना मुख्यमंत्री बनवण्याची मागणी करत होते . निवडणूक जिंकल्यावर कोणाला मुख्यमंत्री बनवायचे हे ठरवणे काँग्रेससाठी अधिक कठीण जाईल असे प्रथमदर्शी तरी वाटत असताना हायकमांडने व्यवस्थित तोडगा काढून शंका कुशंका धूसर केल्या आहेत.
