पेडण्यात उठाबशा, फातोर्ड्यात लाठीचा प्रसाद

निर्बंधांचे उल्लंघन करणाऱ्यांवर पोलिसांकडून कारवाई सुरू; रस्त्याकडेची दुकानंही केली बंद

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी: देशभरात करोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातलं असून राज्यातही मोठ्या प्रमाणात मृत्यूत वाढ होत आहे. त्यामुळे राज्य सरकारने कडक निर्बंध लागू करून मार्गदर्शक तत्त्वं उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश पोलिसांना दिले आहे. याची दखल घेऊन निर्बंधांचे काटेकोर पालन व्हावं यासाठी पोलीस सक्रिय बनले आहेत.

हा व्हिडिओ पहाः VIDEO Breaking | वास्को रेल्वे स्थानकाबाहेर तोबा गर्दी, सोशल डिस्टन्सिंगचे तीनतेरा

कोविड नियमावलीचं उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई

राज्यात दिवसेंदिवस बाधितांत तसंच मृत्यूत वाढ होत आहे. त्यामुळे करोना नियंत्रणात आणण्यासाठी राज्य सरकारने १० मेपर्यंत कडक निर्बंध जाहीर केले आहेत. अत्यावश्यक सेवा वगळता इतर कोणासही घराबाहेर पडण्यास मनाई करण्यात आली आहे. इतकंच नाही तर अत्यावश्यक सेवा देणाऱ्या तसंच जीवनावश्यक वस्तूंची दुकानंही ठरावीक वेळेतच उघडण्याची परवानगी देण्यात आली. हे निर्बंध सरकारने लागू केले असले तरी त्याचं नागरिक नीट पालन करीत नसल्याचं दिसून आलं आहे. याची दखल घेऊन स्थानिक नगरपालिका किंवा पंचायतींनी स्वतःच्या पातळीवर आदेश जारी करून संबंधित परिसरांत निर्बंध लागू केले आहेत. नव्या निर्बंधानुसार फार्मसी, जीवनावश्यक वस्तूंची दुकानं वगळता इतर सेवा बंद करण्यात आल्या आहेत. याची दखल घेऊन राज्यातील वेगवेगळ्या पोलीस स्थानकांतील पोलिसांनी बुधवारी निर्बंधांचं उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई केली आहे.

अशी सुरू केली अंमलबजावणी..

  • पेडणे पोलिसांनी आवश्यक नसतांना फिरणाऱ्या नागरिकांना उठाबशा काढण्याची शिक्षा केली आहे.
  • फातोर्डा पोलिसांनी अत्यावश्यक सेवा वगळता इतर खुली दुकानं बंद करण्यास लावली.
  • फातोर्डा पोलिसांनी कोणतंही कारण नसताना फिरणाऱ्या काहींना लाठीचा प्रसादही दिला आहे.
  • या व्यतिरिक्त राज्यातील इतर पोलिसांनी अत्यावश्यक सेवा वगळता अन्य दुकानं बंद केली आहेत.
  • रस्त्याच्या बाजूला बसून वस्तूंची विक्री करणाऱ्या नागरिकांना संबंधित परिसरातून हाकलून लावण्यात येत आहे.
  • मास्क न लावणाऱ्यांवर तसंच इतर नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर मोठ्या प्रमाणात कारवाई सुरू केली आहे.
  • पणजीतही मुख्य बाजारपेठ बंद करण्यात आली असून, रस्त्याकडेला भाजीविक्री करणाऱ्यांना हटवण्यात आलं.
ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!