जिवबांच्या ‘बर्थ डे केक`नं विरोधकांची सटकली

पेडणे निरीक्षक जिवबा दळवींचा फोटो व्हायरल

किशोर नाईक गावकर, संपादक | प्रतिनिधी

पणजीः गोव्यात सिंघम स्टाईल पोलिस निरीक्षक म्हणून ओळखले जाणारे पेडणेचे पोलिस निरीक्षक जिवबा दळवी यांचा शनिवारी मांद्रेचे आमदार तथा गोवा पर्यटन विकास महामंडळाचे चेअरमन दयानंद सोपटे यांना बर्थ डे केक भरवतानाचा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालाय. या फोटोमुळे विरोधकांची चांगलीच सटकलीय. एका पोलिस निरीक्षकांनं आमदारांना अशा पद्धतीनं केक भरवणं कितपत योग्य, असा सवाल पेडणेत उपस्थित केलाय. कोरोनाच्या या काळात लोकांना मास्क वापरण्यासाठी जनजागृती करणारे हेच पोलिस स्वतः असे कसे बेजबाबदार वागू शकतात, असाही प्रश्न सर्वसामान्य जनतेकडून विचारला जातोय.

हेही वाचाः पुन्हा २०० पेक्षा जास्त नव्या रुग्णांची राज्यात भर! परिस्थिती चिंताजनक, पण कोविड केअर सेंटर ओस

अजय देवगण आणि जिवबा दळवी

सिंघम चित्रपटानंतर पोलिसांची प्रतिमा सर्वसामान्य लोकांच्या मनात बऱ्यापैकी सुधारलीय. एक प्रामाणिक पोलिस ऑफिसर कुणाचीही पर्वा न करता आणि बड्या बड्या राजकीय नेत्यांची तमा न बाळगता आपली ड्यूटी कशा पद्धतीनं प्रामाणिकपणे बजावतो, याचं दर्शन सिंघम चित्रपटात झालंय. बाकी प्रामाणिक ड्यूटी वगैरे बाजूले ठेवलं तरी स्टाईलच्या बाबतीत आणि एकूणच कपड्यांची निवड आणि गेटअपच्या बाबतीत अजय देवगणच्या स्टाईलमध्ये आपण जिवबा दळवी यांना पाहिलंय. कळंगुटमध्ये असताना या पोलिस ऑफिसरनं आपला बराच दबदबा ठेवला होता. वेश्या व्यवसाय, ड्रग्स, गुंडगिरी आदींविरोधात कारवायांचा धडाकाच लावला होता. जिवबा दळवी यांची कारवाई लगेच मीडियामध्येही झळकायची कारण त्यांचे काही खास पत्रकार मित्र त्यांच्या प्रसिद्धीची जबाबदारी सांभाळायचे. प्रत्येक कारवाईनंतर संशयीतांसोबतचे आत्तापर्यंतचे सर्वांत जास्त फोटो हे जिवबा सिंघमचेच छापून आलेत. साहजिकच जिवबा दळवींच्या या अनोख्या स्टाईलमुळे त्यांच्या खात्यातीलच अनेकांना त्यांचा हेवा वाटतो म्हणतात ते यासाठीच असू शकतं.

हेही वाचा – दुसरी लाट नाही तर काय? 24 तासांत तब्बल 90 हजार नवे रुग्ण, 250पेक्षा जास्त मृत्यू

…आणि जिवबा पेडण्यात पोहचले

पेडणे पोलिस स्टेशनवर अनेकांची नजर असते. इथे बीच बेल्ट, चेक नाके, रेती, चिरे, खडी, दारू इत्यादी इत्यादी व्यवहार मोठ्या प्रमाणात चालतात. जुगार आणि जत्रोत्सवातील पट हा तर पोलिसांच्या उत्पन्नाचा मुख्य स्त्रोत. बस्स, आपल्या गॉडफादरला खूश ठेवून हवी ती मजा करायची, अशीच काहीशी रीत आत्तापर्यंत पेडणेच्या ऑफिसरची राहत आलीये. यापूर्वी पेडणेचे निरीक्षक संदेश चोडणकर यांच्यावर सरकार पक्षातीलच एका आमदाराने गंभीर आरोप केले होते. सुदैवाने चोडणकर यांची बढती झाल्याने हे पद रिक्त झालं. या पदावर येण्यासाठी अनेकांनी सीएम आणि उपमुख्यमंत्री बाबू आजगांवकर यांच्याकडे फिल्डींग लावली होती. अखेर बाबू आजगांवकर यांनी बाजी मारली आणि खुद्द गृह खातं सांभाळणाऱ्या सीएमच्या भरवशावर असलेल्या अधिकाऱ्यांची घोर निराशा झाली. जिवबा दळवी यांनी बाबू आजगांवकर यांना जिंकलं आणि पेडणेचं निरीक्षक पद मिळवलं. पेडणे दाखल होताच कारवाईंचा धडाकाच सुरू केला. ड्रग्स प्रकरणी मोठ्या कारवाया केल्या. परंतु बाबू आजगांवकर आणि सोपटे यांच्या दबावापोटी धिरयो, पट, जुगार आदींवर मात्र कारवाई करण्यात ते अपयशी ठरलेत. या गोष्टी लोकांनाच हव्यात तर ते तरी काय करणार, असा युक्तीवाद केला जातोय. या गोष्टींविरोधात कुणीच उघडपणे विरोध करायला पुढे येत नाहीत, असं पोलिसच सांगतात. जुगार, पट, रेती, चिरे, खडी, धिरयो आदींना सांभाळा आणि उर्वरीतांवर कठोर राहा, असाच संदेश राजकीय गॉडफादरांनी पोलिसांना दिल्याची जोरदार चर्चा पेडणेत सुरूय.

हेही वाचा – हृदयद्रावक! अपघातात अख्खं कुटुंब उद्ध्वस्त! आईसह 3 मुलींचा दुर्दैवी अंत

जिवबा स्पेशल…

पेडणे पोलिस स्टेशनवर दाखल झाल्यानंतर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी खास पोलिस स्टेशनवर भेट देऊन जिवबांना शुभेच्छा दिल्या होत्या. यानंतर तर सिंघमची छाती अधिकच फुलून गेली होती. आजही हा फोटो अनेकांनी आपल्या मोबाईलवर सेव्ह करून ठेवलाय. आता तर हेच पोलिस ऑफिसर इतके राजकीय नेत्यांमध्ये समरस झालेत की त्यांनाच आपण काय करतोय आणि कसं वागतोय याचं भान राहीलेले नाही. पोलिस ऑफिसरने आपल्या पदाची शान आणि वर्दीचा सन्मान राखण्याची गरज असते. ते जनतेचे सेवक असतात. राजकीय नेत्यांचा चांगूलपणा राखणं हे क्रमप्राप्त असलं तरी या चांगूलपणाचं प्रदर्शन तरी निश्चितपणे मांडले जाऊ नये, याचं भान त्यांनी ठेवायला हवं होतं, अशी प्रतिक्रिया उमटल्या आहेत. आमदार दयानंद सोपटे यांच्या वाढदिनी त्यांना खास केक घेऊन ते भरविण्यापर्यंत या पोलिस ऑफिसरने मजल मारलीय. सोपटे यांच्या वाढदिनी कोरोना मार्गदर्शक तत्त्वाचं उल्लंघन करून कार्यक्रम झाला तिथे पोलिस बघ्याची भूमिका घेऊन उभं होतं. उपजिल्हाधिकाऱ्यांनी फक्त 500 लोकांना परवानगी दिली होती पण तिथे हजारोंच्या संख्येने गर्दी होती तरीही पोलिस कारवाई करण्यास धजावले नाहीत. या एकूणच कार्यक्रमातून मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे तसंच आमदार दयानंद सोपटे यांच्या वागणूकीवर अनेकांनी नाराजी व्यक्त केलीच आहे. पण त्याचबरोबर पेडणे पोलिस ऑफिसरच्या या बेजबाबदार वागणूकीबद्दलही खेद व्यक्त केलाय.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!