पोलिस कॉन्स्टेबल, बिल्डर ते राजकारणी

तारक आरोलकरांचा थक्क करणारा प्रवास

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजीः धिरूभाई अंबानी म्हणे फुटपाथवर व्यापार करायचे. हिंमत आणि मेहनतीच्या जोरावर त्यांनी आपले प्रस्थ उभारलं. सगळेच काही धिरूभाई अंबानी बनू शकत नाहीत. पण आपल्याकडेही अशी अनेक उदाहरणं आहेत. अगदी सामान्यातला सामान्य माणूस जेव्हा अचानक उंच शिखरावर पोहचतो तेव्हा समाज त्याच्याकडे कुतुहलानेच बघतो. म्हापसा नगरपालिकेवर यंदा पहिल्यांदाच तारक आरोलकर आणि विकास आरोलकर हे बंधु निवडून आलेत. आझिलो हॉस्पिटलात सर्व्हंट म्हणून काम करणाऱ्या एका महिला कर्मचाऱ्याचे हे मुलगे. तारक हा प्रारंभी पोलिस कॉन्स्टेबल म्हणून पोलिस सेवेत होता. राजकारण्यांना सॅल्यूट करणारा तारक अचानक बडा बिल्डर झाला. आता राजकारणीच त्याला सॅल्यूट करतात. तारकने आता राजकारणात प्रवेश केलाय. राजकारणाच्या पहिल्या एट्रीतच त्याने आपल्या भावी वाटचालीचे संकेत दिलेत. भाजप विरोधी गटातून ते निवडून आले. तिथे सत्ता स्थापन होत नसल्याचं दिसताच त्यांनी आता अचानक आपले बंधु विकास आरोलकर आणि विराज फडके यांच्यासह भाजपात प्रवेश करून सत्ता तिथे यशाचा मार्ग हेच दाखवून देत अनुभवी राजकारण्यांनाही चकित करून सोडलंय. 

सत्तेपुढे एकवोटीत फुट

म्हापसा नगरापालिकेच्या 20 जागांसाठी झालेल्या निवडणूकीत भाजप समर्थक गटाला 9 आणि ‘म्हापशाचो एकवोट’ या नावाने सगळे विरोधक एकत्र झालेल्या गटाला 9 अशा जागा मिळाल्या. दोन जागांवर अपक्ष नगरसेवक निवडून आले. त्यांनी ‘म्हापशाचो एकवोट’ गटाला पाठींबा दिल्याची कुणकुण लागताच भाजपने मिशन फोडाफोडी सुरू केली. म्हापशाचे नगराध्यक्षपद महिलांसाठी राखीव आहे. भाजपच्या माजी म्हापसा गट अध्यक्ष तथा माजी नगरसेवक शुभांगी वायंगणकर यांनाच भाजपने आपल्याकडे आणून एकवोटचा विचका करून टाकला. हे कमी म्हणून की काय तर एकवोटात सर्वांधिक भाजपविरोधात बोलणारे आणि भाजपच्या नाकी दम आणणारे तारक आरोलकर, विकास आरोलकर आणि मगोचे नेते बाळु फडके यांचे पुत्र विराज फडके यांनाही त्यांनी आपल्या गळाला लावले. या पक्षांतरामुळे म्हापसा नगरपालिका राजकारणाने आपला एक वेगळाच इतिहास नोंदवलाय. विशेष म्हणजे तारक आरोलकर आणि विकास आरोलकर यांना गोवा फॉरवर्डचे कार्यकारी अध्यक्ष तथा माजी आमदार किरण कांदोळकर यांनी जवळ केलं होतं. भाजपने एका दगडात तीन पक्षी मारून काँग्रेससह गोवा फॉरवर्ड आणि मगोचाही मुखभंग करून भाजप विरोधातील एकवोट ही नाममात्र असल्याचंच सिद्ध केलं.

थेट सीएमचा फोन…

म्हापसा नगरपालिकेत भाजपचीच सत्ता असेल असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी म्हटलं होतं. शेवटी त्यांनी आपला शब्द खरा ठरवलाच. तारक आरोलकर याचे सीएमशी चांगले संबंध असल्याने त्यांच्या मध्यस्तीनेच आरोलकर बंधुंना भाजपात प्रवेश दिल्याची वार्ता आहे. विशेष म्हणजे या पक्ष प्रवेशावेळी माजी नगरसेवक फ्रँकी कार्व्हालो यांचीही हजेरी होती. कार्व्हालो यांना निवडणूक लढविण्यापासून अपात्र ठरविण्यात तारक आरोलकर यांची प्रमुख भूमिका होती. आता हे दोघेही भाजपच्या झेंड्याखाली एकत्र आल्याने या दोघांसाठी एकमेकांशी वैर पत्करलेले कार्यकर्ते मात्र बुचकळ्यात सापडलेत.

तारक आरोलकराचा दबदबा

तारक आरोलकर हा एका गरीब कुटुंबातून आलाय. त्याची आई म्हापसा आझिलो हॉस्पॉलात सर्व्हंट म्हणून सेवेत होती. घरात चार भांवडं. 1995 साली त्याचे वडील वारले आणि कुटुंबाचा सगळा भार एकट्या आईवर पडला. यावेळी आईचे कष्ट पाहुन तिला आधार देण्याचा विचार त्याच्या मनात घोळत होता. शाळेत असतानाही बारीकसारीक कामं करून तो आईला मदत करत होता. प्राथमिक शिक्षण सरकारी शाळेत आणि मग जनता हायस्कुलमध्ये विद्यालयीन शिक्षण पूर्ण केलं. तिथून डीएमसी कॉलेजमध्ये पदवी प्राप्त करून त्याने कायद्याचीही पदवी प्राप्त केली. एवढंच नव्हे तर त्याने ड्राफ्टमॅनशीपचा डिप्लोमाही पूर्ण केलाय. अत्यंत प्रतिकुल परिस्थितीत त्यानं शिक्षण घेतलं. यानंतर पोलिस खात्यात कॉन्स्टेबल म्हणून तो रूजू झाला. माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांच्या ताफ्यातील पायलट गाडीवर तो सेवेत होता. यानंतर अचानक त्याने पोलिस नोकरी सोडली आणि तो अज्ञातवासात गेला.

अलिशान वाहन आणि काळे गॉगल केलेल्या तारकची एन्ट्री

पोलिस नोकरी सोडून तारक गेला कुठे, असा प्रश्न सर्वांना पडला असतानाच अचानक अगदी फिल्म स्टाईलमध्ये तारक एका वेगळ्याच अवतारात आला. अलिशान गाडीतून उतरून,  डोळ्यांवर काळा गॉगल लावलेल्या तारक आरोलकरची एन्ट्री झाली. साईच्छा बिल्डर्स अँण्ड डेव्हलेपर्स नावाने त्याने बांधकाम आणि रिअल इस्टेट बिझनेसमध्ये प्रवेश केला. अगदी अल्पकाळात त्याने या व्यवसायात आपला दबदबा निर्माण केला. हाच तारक आता बडे उद्योजक आणि बड्या राजकारण्यांसोबत लोकांना पाहायला मिळतो. मध्यंतरी अनेक प्रकरणात तो चर्चेत आला. `राईस पुलर` नामक एक यंत्र असतं. हे यंत्र घरी असल्यास नशीब फळफळतं आणि पैसा चालून येतो, अशी काहीजणांची भावना आहे. या यंत्राचा कोट्यवधीचा व्यवहार चालतो. या यंत्राच्या व्यवहारात तारक आरोलकर याला अटक झाली होती. शेवटी ते सहीसलामत सुटले. यानंतर त्याच्याकडे खंडणीची मागणी होत असल्याची तक्रार त्याने केली होती, तेव्हाही हे प्रकरण बरंच गाजलं होतं. आणखी एका प्रकरणात त्याने आपलं अपहरण झाल्याची तक्रार केली होती. या प्रकरणात बीजापूर पोलिसांनी त्याला अटकही केली होती, परंतु तिथूनही तो सहजपणे सुटला. एकापेक्षा एक वादळे त्याने परतवुन लावत सर्वसामान्यांच्या नजरेत आपली ताकद सिद्ध केली. सध्या म्हापसा नगरपालिकेच्या राजकारणात तो किंगमेकर ठरलाय. 

हळदोणा मतदारसंघावर नजर

आरोलकरबंधु यांचे प्रभाग म्हापसा नगरपालिकेत असले तरी हा भाग हळदोणा मतदारसंघात येतो. तारक आरोलकर हा हळदोणा मतदारसंघातून निवडणूक लढविण्याची तयारी करत असल्याची चर्चा म्हापशात सुरू आहे. आमदार ग्लॅन टीकलो यांच्यावर त्याने टीकाही केलीए. पण आता त्यांच्या प्रवेशावेळी ग्लॅन टीकलोही हजर राहील्याने त्यांच्यात समेट झाल्याची खबर आहे. पणजी विधानसभा निवडणूकीत तारक आरोलकर काँग्रेसचे आमदार बाबूश मोन्सेरात यांच्या प्रचारात बराच सक्रियपणे वावरला होता. आता बाबुशच भाजपात आले म्हटल्यावर तारक आरोलकर यांनेही भाजपची वाट धरणं पसंत केलं असावं, असं म्हटलं जातं. म्हापसा नगरपालिकेत उपनगराध्यक्षपद आणि त्याच्या बंधुसाठी मार्केट कमिटीचे अध्यक्षपद देण्याचं ठरलंय, अशीही चर्चा सुरू आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!