पोलिस शिपाई आता निवृत्तीच्या वेळी होणार पीएसआय !

महाराष्ट्राचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटलांची मोठी घोषणा

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी : महाराष्ट्र राज्यातील पोलिस शिपाई आणि कनिष्ठ पोलिस कर्मचाऱ्यांसाठी राज्य सरकारच्या वतीने सुखद घोषणा करण्यात आली आहे. आता राज्यभरातील पोलिस शिपाई आपल्या निवृत्तीपर्यंत पोलिस उपनिरीक्षक पदापर्यंत मजल मारतील. पोलिस दलात शिपाई या पदावर रुजू होणाऱ्या प्रत्येकाची आता पोलिस उप-निरीक्षक पदावर निवृत्ती होणार आहे. राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी पुण्यातील एका कार्यक्रमात यासंदर्भातील घोषणा केली आहे.

पोलिस दलात शिपाई या पदावर रुजू होणाऱ्या प्रत्येकाची पोलिस उप-निरीक्षक होण्यासाठी धडपड सुरू असते. कठोर मेहनत आणि ड्युटीचे तास यांचे नियोजन लावून काही परीक्षा देऊन पीएसआय होतात. तर काही विशेष कामगिरी आणि कर्तृत्वाने पदोन्नती मिळवतातही. पण, बहुतांश शिपायांना निवृत्तीच्या वेळी केवळ सहाय्यक पोलिस उप-निरीक्षक पदावर निवृत्त व्हावे लागते. काही पोलिस कर्मचारी तर त्यापूर्वीच निवृत्त होतात. त्याचीच दखल आता गृहमंत्र्यांनी घेतली आहे.

दिलीप वळसे पाटील म्हणाले, पोलिस दलात 3 दशक सेवा दिल्यानंतरही शिपायांना केवळ एएसआय पदावर येऊन निवृत्ती मिळते. पोलिस शिपाई म्हणून रुजू झालेल्या प्रत्येकाला पीएसआय पदावर पोहोचता यावे आणि निवृत्तीच्या 5 वर्षांपूर्वीपर्यंत या अधिकारी पदावर काम करता यावे, अशी योजना आहे. याच दरम्यान, कोरोना काळात पोलिसांनी रस्त्यावर उतरून, आपले जीव धोक्यात टाकून जी कामगिरी केली त्याबद्दल गृहमंत्र्यांनी पोलिसांचे तोंडभर कौतुक केले. याबाबत अधिकृत निर्णय घेण्यासाठी एक बैठक होणार आहे. उपमुख्यमंत्र्यांनी त्या बैठकीसाठी वेळ द्यावा अशी मागणी गृहमंत्र्यांनी कार्यक्रमातच केली. त्याला अजित पवारांनी देखील होकार दिला.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!