युवा काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवर पोलिसांचा लाठीचार्ज

वाढत्या बेरोजगारी, महागाईविरोधात आझाद मैदानावर निदर्शने : सरकारविरोधात घोषणाबाजी

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी: वाढत्या बेरोजगारी आणि महागाईविरोधात मंगळवारी आझाद मैदानावर निदर्शने करणाऱ्या राष्ट्रीय युवा काँग्रेस आणि गोवा प्रदेश युवा काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी लाठीचार्ज करून ताब्यात घेतलं. या कार्यकर्त्यांना दोनापावला पोलीस स्थानकात नेण्यात आलं. त्यानंतर त्यांना सोडण्यात आलं.

हेही वाचाः ‘आप’ने गोंयकारांच्या नोकरीच्या मागणीसाठी सुरू केली मेगा चळवळ!

ताब्यात घेतलेल्या कार्यकर्त्यांमध्ये राष्ट्रीय युवा काँग्रेसचे अध्यक्ष पी. श्रीनिवास, गोवा प्रदेश युवा काँग्रेसचे अध्यक्ष वरद म्हार्दोळकर, जनार्दन भंडारी व अनेक युवा कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आले होते. भाजप सरकारच्या कार्यकाळत महागाई खूप वाढली आहे तसंच देशात आणि राज्यात सुशिक्षित बेरोजगारी वाढली आहे. याविषयी देशभर सरकार विरोधात काँग्रेसची निदर्शने सुरू आहेत. याचा भाग म्हणून राष्ट्रीय युवा काँग्रेसचे आणि गोवा प्रदेश युवा काँग्रेसच्या कार्यकत्यांना आझाद मैदानावर निदर्शने केली.

दरम्यान, आझाद मैदानावरून मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी जात असताना पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. यावेळी कार्यकर्त्यांनी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. दरम्यान, कार्यकर्ते व पोलिसांमध्ये तणाव निर्माण झाल्यावर पोलिसांनी लाठीचार्ज केला. काँग्रेसच्या अनेक युवा कार्यकर्त्यांवर लाठीचार्ज करण्यात आला. काही काँग्रेस युवा कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन दोनापावला पोलीस स्थानकात नेलं.

लाठीचार्जची चौकशी व्हवी : चोडणकर

शांतपणे निदर्शने करणाऱ्या काँग्रेसच्या युवा कार्यकर्त्यांवर सरकारने पोलिसांना लाठीचार्ज करण्याचे आदेश कसे दिले, याची चौकशी झाली पाहिजे. लोकशाहीच्या देशात प्रत्येकाला आंदोलन करण्याचा अधिकार आहे. वाढती महागाई व बोरोजगारी विरोधात युवा काँग्रेसचे कार्यकर्ते आंदोलन करत होते. यापुढेही सरकारला अशाचप्रकारे आंदोलनांना सामोरे जावे लागणार आहे. आम्ही या विरोधात राज्यभर आंदोलन करणार आहेत. जनतेचा आवाज आम्ही सरकारसमोर मांडत आहोत. मात्र, सरकार हुकूमशाहीने राज्य कारभार हाकत आहे, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी सांगितलं.

हेही वाचाः अवघ्या 3 तासांत मुंबई-सिंधुदुर्ग हे अंतर पार करता येणार?

आगामी सहा महिन्यामध्ये मुख्यमंत्र्यांना गोव्यातील सर्वसामान्य जनतेच्या रागाला सामोरं जावं लागणार असून लोक प्रत्येक ठिकाणी मुख्यमंत्र्यांना जाब विचारणार आहे. वाढती महागाई तसंच बेरोजगारीमुळे लोक हैराण झाले आहेत. चतुर्थी जवळ आली असून महागाई वाढत असल्यानं लोकांना अनेक समस्यांना समोरं जावं लागत आहे. पण, सरकारला याचे काहीच पडलेलं नाही, अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी केली. 

आंदोलन सुरूच राहणार : दिगंबर कामत

भाजप सरकार हुकूमशाहीने वागत आहे. शांतता मार्गाने निदर्शने करणाऱ्या युवा काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवर लाठीचार्ज केल्याने या घटनेचा आम्ही निषेध करतो. काँग्रेस सरकारच्या कार्यकाळात अनेक आंदोलने झाली. मात्र, काँग्रेसने कधीच विरोधकांवर लाठीचार्ज करण्याचा आदेश दिला नाही. हे सरकार सर्वसामान्य लोकांचा आवाज दाबण्याचे काम करत आहे. महागाई बेरोजगारी वाढत आहे, असे विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी सांगितलं.

आम्ही लोकशाही मार्गाने शांतपणे निदर्शने करत होतो वाढती बेरोजगारी आणि महागाईविरोधात सर्वत्र लोक आवाज करत आहेत. लोकांचा आवाज आम्ही सरकारपर्यंत पोहचविण्याचे काम करत असतानाच पोलिसांनी राष्ट्रीय तसेच गोव्यातील अनेक युवा कार्यकर्त्यांवर लाठीचार्ज केला. आम्ही या घटनेचा निषेध करतो, असं गोवा प्रदेश युवा काँग्रेसचे अध्यक्ष वरद म्हार्दोळकर म्हणाले.  

हा व्हिडिओ पहाः CCP | Ganesh Chaturthi | जाणून घ्या, काय आहेत नव्या एसओपी?

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!