कोरोना औषधाच्या नावाखाली दिल्या विषाच्या गोळ्या ; तिघांचा मृत्यू !

कर्जाच्या व्यवहारातून घडलेला तामिळनाडू इथला धक्कादायक प्रकार

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी : तामिळनाडूमध्ये कोरोना औषधाच्या नावाखाली विषाच्या गोळ्या दिल्याचा प्रकार समोर आला असून त्यामध्ये तीन जणांचा मृत्यू झाला आहे. एकाची प्रकृती चिंताजनक आहे. ही घटना कर्ज घेतलेल्या पैशांशी संबंधित आहे. विषबाधा झालेल्या कुटुंबाने एका व्यक्तीला कर्ज दिले होते. जेव्हा कुटुंबाने पैशाची मागणी केली. तेव्हा त्याने हे कृत्य केले. मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना तामिळनाडूच्या इरोड येथे घडली.

इरोडमध्ये करुप्पनकाउंडर (७२ वर्षे) यांनी काही महिन्यांपूर्वी आर कल्याणसुंदरम नावाच्या व्यक्तीला १५ लाख रुपये दिले होते. करुप्पनकाउंडर यांनी गरज असल्यामुळे कल्याणसुंदरमकडे पैसे परत मागितले. पैशांची परतफेड करु न शकल्यामुळे कल्याणसुंदरम यांनी करुप्पनकाउंडर आणि त्याच्या कुटुंबाला संपवण्याचा कट रचला.

कल्याणसुंदरम यांनी सबरी नावाच्या व्यक्तीसमवेत योजना आखली. यात सबरी यांना आरोग्य विभागाचा कर्मचारी बनवून करुप्पनकाउंडर यांच्या घरी पाठविण्यात आले. २६ जूनला तिथे जाऊन सबरीने करुप्पनकाऊंडरला विचारले की कुटुंबातील कोणालाही खोकला, सर्दी इ. आहे का? यानंतर सबरीने जाताजाता काही विषाच्या गोळ्या करुप्पनकाऊंडरकडे दिल्या. यावेळी सबरीने रोग प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी हे औषध असल्याचे सांगितले.

सबरी गेल्यानंतर करुप्पनकाऊंडर, त्यांची पत्नी, मुलगी आणि घरात काम करणाऱ्या मोलकरीने त्या गोळ्या घेतल्या. त्यानंतर ते चौघेही बेहोश झाले. शेजार्‍यांनी लवकरच त्याला दवाखान्यात नेले. करुप्पनकाऊंडरची पत्नी मल्लिका, मुलगी दीपा आणि मोलकरीन कुप्पल यांचा रुग्णालयात मृत्यू झाला. सध्या करुप्पनकाऊंडरची प्रकृती देखील गंभीर आहे. दरम्यान, रविवारी रात्री आरोपी कल्याणसुंदरम आणि सबरी यांना अटक करण्यात आली. दोघांनाही आता १५ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत पाठविण्यात आले आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!