नारायण ! नारायण..! खुद्द पंतप्रधान कार्यालयाची दिशाभूल

राष्ट्रीय महामार्ग-१७ वाहतुकीसाठी असुरक्षित; पेडणेत तीव्र संताप

किशोर नाईक गावकर | प्रतिनिधी

पणजी : पेडणे तालुक्यातील पत्रादेवी ते धारगळपर्यंतचा राष्ट्रीय महामार्ग-१७ वाहतुकीसाठी असुरक्षित बनला आहे, असा स्पष्ट अहवाल पेडणेच्या मामलेदारांनी उपजिल्हाधिकाऱ्यांना सादर केला आहे. एवढे करून सार्वजनिक बांधकाम खात्याच्या विभाग 7 ते कार्यकारी अभियंते नारायण मयेकर यांनी पंतप्रधान कार्यालयाला मात्र खोटी माहिती दिली आहे. या महामार्गावरील खड्ड्यांचे काम नियमीतपणे सुरू आहे आणि दिशाफलक आणि इतर सर्व सुरक्षेच्या उपाययोजना कंत्राटदार मेसर्स एमव्हीआर कंपनीने घेतल्या आहेत,असे स्पष्टीकरण दिले आहे. नारायण मयेकर यांच्या या खोटारडेपणामुळे पेडणेत तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

सध्या राष्ट्रीय महामार्ग १७ च्या रूंदीकरणाचे काम जोरात सुरू आहे. मुळातच सार्वजनिक बांधकाम खात्याने अद्याप भूसंपादन पूर्ण केले नाही. अर्धवट भूसंपादनामुळे कंत्राटदाराचे काम अडले आहे. सदर कंत्राटदाराकडून अत्यंत निकृष्ट दर्जाचे काम सुरू आहे. हा महामार्ग रोजच्या प्रवासासाठी धोकादायक ठरला आहे . पेडणेतील लोकांना नोकरी, व्यवसाय आणि इतर कामांसाठी ह्याच रस्त्याचा वापर करावा लागत असल्याने त्यांना आपला जीव मुठीत धरून बाहेर पडावे लागते. आत्तापर्यंत अनेकांचे बळी गेले आहेत तर अनेकजण जखमी होऊन घरी आहेत. पावसाळ्यात तर या महामार्गावरून प्रवास करणेच धोक्याचे ठरले होते. सदर कंत्राटदाराचे घनिष्ट राजकीय लागेबांधे असल्याने हा कंत्राटदार अधिकाऱ्यांना फाट्यावर मारतो. कुणाचेही एकत नाही आणि तक्रारींना काडीचीही किंमत देत नाही. याविरोधात गुन्हे शाखा, पोलिस स्थानकात तक्रार करूनही काहीच उपयोग झालेला नाही.

गत पावसाळ्यात प्रसाद ताटकर यांनी पंतप्रधान कार्यालयाकडे तक्रार दाखल केली होती. यावरून सार्वजनिक बांधकाम खात्याचे कार्यकारी अभियंते नारायण मयेकर यांनी पंतप्रधान कार्यालयाला पाठवलेले पत्र धक्कादायक होते. सदर कंत्राटदार नियमीतपणे रस्त्याची दुरूस्ती करतो आणि सुरक्षेचे उपाययोजना आखतो,असे ढळढळीत खोटे स्पष्टीकरण दिले. प्रत्यक्षात कंत्राटदाराकडून कोणतेही काम केले जात नाही. आता अलिकडेच सप्टेंबर महिन्यात संदीप हळदणकर यांनी पुन्हा एकदा या महामार्गाबाबत पंतप्रधान कार्यालयाकडे तक्रार दाखल केली. या तक्रारीबाबतही नारायण मयेकर यांनीच स्पष्टीकरण दिले आहे. या स्पष्टीकरणात त्यांनी पुन्हा एकदा तोच खोटारडेपणा केला आहे. कंत्राटदाराकडून वेळोवेळी खड्डे बुजवणे आणि इतर सुरक्षेच्या उपाययोजना आखल्या जातात,असे खोटे सांगण्यात आले आहे. थेट पंतप्रधान कार्यालयाला खोटी माहिती देऊन फसविण्याच्या या कृतीबाबत पेडणेत तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. दक्षता सप्ताह सुरू आहे. या सप्ताहातच अशा पद्धतीने एक वरिष्ट अभियंते पंतप्रधान कार्यालयाची दिशाभूल करीत असल्याने प्रशासनात तो चर्चेचा विषय ठरला आहे.

मामलेदारांकडून अहवाल सादर

पेडणे तालुका नागरीक समितीने राष्ट्रीय महामार्गाच्या दैनावस्तेबाबत फौजदारी तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीची दखल उपजिल्हाधिकारी रविशंकर निपाणीकर यांनी घेतली. या प्रकरणी त्यांनी पेडणे मामलेदारांना पाहणी करून राष्ट्रीय महामार्गाच्या स्थितीबाबत अहवाल सादर करण्यास सांगितले. हा अहवाल मामलेदारांनी सादर केला. ह्यात हा रस्ता वाहतूकीसाठी धोकादायक असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला आहे. एवढे करून सार्वजनिक बांधकाम खात्याचे कार्यकारी अभियंते नारायण मयेकर मात्र सर्व काही ठिक आहे,असा बनाव करून पंतप्रधान कार्यालयालाच खोटी माहिती देत असल्यामुळे हे धाडस ते कसे काय करू शकतात,असा सवाल उपस्थित केला जात आहे.

सगळे चिडीचुप

राष्ट्रीय महामार्गाच्या या विषयावरून मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, सार्वजनिक बांधकाममंत्री दीपक पाऊसकर यांना या प्रकरणाची माहिती दिली असता त्यांच्याकडून कोणतीही प्रतिक्रिया प्राप्त होऊ शकली नाही.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!