गोव्यातील पूरस्थितीचा मोदींनीही घेतला आढावा, मुख्यमंत्र्यांसोबत केली चर्चा

सर्वतोपरी मदतीचं आश्वासन

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी : राज्यात मुसळधार पावसानं पूरस्थिती निर्माण होऊन राज्यातील जनजीवन शुक्रवारी विस्कळीत झालं. सकाळपासून मुख्यमंत्र्यांनी या पूरस्थितीचा थेट घटनास्थळी जाऊन आढावा घेतला होता. दरम्यान, राज्यातील या पूरस्थितीचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही आढावा घेतलाय. मोदींनी मुख्यमंत्र्यांशी बाचतील केली असून राज्यातील परिस्थितीची विचारपूस केली. त्यासोबतच सर्वतोपरी मदत करण्याचं आश्वासनं दिलंय. मोदींसोबत झालेल्या चर्चेत मुख्ममंत्र्यांनी राज्यातील परिस्थितीबाबत सर्व माहिती पंतप्रधानांना दिली आहे.

राज्यात मुसळधार पावसानं अनेकांचे संसार उद्ध्वस्त झालेत. अनेक घरांची पडझड झाली आहे. मोठ्या प्रमाणात शेती बागायतीचंही नुकसान झालं आहे. त्यामुळे गेल्या ३९ वर्षातला सर्वात भयंकर पूर राज्यानं शुक्रवारी अनुभवलाय. त्यामुळे यात नुकसान झालेल्यांना भरपाई कधी मिळणार, याकडे आता राज्यातील जनतेचं लक्ष लागलंय. शुक्रवारी संध्याकाळी कॅबिनेट बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांनी राज्यात आलेल्या पुराविषयी माहिती देताना माध्यमांशी संवाद साधलाय.

ACCIDENT | सावईवेरेत शॉक लागून तिघांचा मृत्यू

शुक्रवारी राज्यात आलेल्या पूरामुळे अनेक भागांत मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. अनेक ठिकाणी पडझड झाली, घाटमार्गांमध्ये दरडी कोसळल्या, गावांमध्ये आणि लोकांच्या घरात पाण्याने शिरकाव केला, मुके प्राणी पाण्यात वाहून गेले, शेती-बागायतीत पाणी घुसल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. याविषयी माहिती देताना मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय, की आजचा पूर हा वर्ष १९८२ नंतरचा सर्वांत मोठा पूर आहे. सत्तरी, डिचोली, बार्देश, फोंडा, पेडणे, धारबांदोडा तालुक्यांना या पुराचा मोठा फटका बसलाय. आजच्या दिवशी एकूणच कोट्यावधींच नुकसान झालंय. धारबांदोडा तालुक्यात एका महिलेच्या मृत्यूची नोंद झालीये, मात्र तो पुरामुळेच हे अजून नक्की झालेलं नाही.

25 जुलैपर्यंत सत्तरीत पाणी पुरवठा नाही?

या पुराचा फटका सुमारे 1 हजार घरांना बसलाय. काही घरांमध्ये पाणी शिरून नुकसान झालंय, तर काहीची घरं मोडून पडलीत. पेडण्यातील 88, बार्देशातील 67, डिचोलीतील 164, सत्तरीतील 130, सांगेतील 18, तर धारबांदोडातील 135 घरांना पुराचा फटका बसला असल्याचं समजतंय. पुराचं पाणी गोंयकारांच्या शेती-बागायतीत घुसल्याने शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. शेतकऱ्यांच्या हाता-तोंडाशी आलेला घास या पुराने हिरावून घेतलाय. शेतीचं सुमारे 2.55 कोटींचं नुकसान झालं असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिलीये. ८२३ हेक्टर शेतजमिनीला या पुराचा फटका बसल्याचं मुख्यमंत्री म्हणालेत.

राज्यात गेले काही दिवस पावसाने हाहाकार माजवला. शुक्रवारी राज्यात पूर आल्यानं अनेक ठिकाणी पाण्याने शिरकाव केला. राज्यातील नद्यांनी आक्रमक रूप धारण केलं. आज सकाळपर्यंत गोव्यात ८६.५० इंच पाऊसाची नोंद झाली. मागच्या २४ तासांत सांगेत सर्वाधिक ८.५ इंच पावसाची नोंद झाली. तर साखळीत ७, केपेत ६, फोंडा, काणकोण, ओल्ड गोव्यात प्रत्येकी ४ इंच पावसाची नोंद झाली.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!