तुये परिसरात १५०० झाडांची लागवड

पर्यावरणाचा समतोल राखण्याचा प्रयत्न

निवृत्ती शिरोडकर | प्रतिनिधी

पेडणेः एमके अरोमॅटिक लिमिटेड (प्लास्टिक ते इंधन सुविधा), पेडणे आयटीआय, गोवा जैविक विविधता आणि तुये जैव विविधता समिती यांच्या संयुक्त विद्यमाने जागातिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने पेडणे कचरा प्रकल्पा शेजारी एकूण १५०० नवीन झाडांची लागवड करून पर्यावरण दिन साजरा करण्यात आला. 10 जून 2021 रोजी हा कार्यक्रम पार पडला.

मान्यवरांची उपस्थिती

या कार्यक्रमाला गोवा राज्य जैवविविधतेचे सदस्य सचिव डॉ. प्रदीप व्ही. सरमोकादम, तुये  जैवविविधता समितीचे अध्यक्ष आणि पंच निलेश कांदोळकर, पेडणे आयटीआयचे प्राचार्य दत्तप्रसाद पाळणी तसंच एमके अरोमेटिक लिमिटेडचे आशिम मर्चंट यांची उपस्थिती होती. पर्यावरण दिनानिमित्त एमके अरोमेटिक कंपनीचे मालक आशिम मर्चंट यांनी हाती घेतलेल्या महान उपक्रमाबद्दल त्यांचे सर्वांनी आभार मानले. सर्व झाडे कंपनीच्या आवारात, आयटीआय कॅम्पस तसंच सभोवतालच्या क्षेत्रात – आयटीआय पेडणेच्या कंपनी कर्मचारी आणि विद्यार्थ्यांच्या मदतीने लावण्यात आली.

रोज सजरा करा पर्यावरण दिन

पर्यावरण दिन एक दिवसच साजरा करू नये, तो दररोज साजरा करावा. वृक्ष लागवडीचं महत्व प्रत्येकजण जाणतो. प्रत्येक रोग, प्रत्येक विषाणूचा प्रसार बहुधा मानवजातीने तयार केलेल्या वातावरणाच्या ऱ्हासामुळे होतो. किमान झाडे लावून त्यांचं जतन करणं हे आपल्यापैकी प्रत्येकाचं कर्तव्य आहे. आपण कमीतकमी झाडं लावण्यास सक्षम नसल्यास झाडं तोडू तरी नयेत. मोपा  विमानतळासाठी बरीच झाडं तोडण्यात आली. ते नुकसान भरून काढण्यासाठी आपल्याला पाच पटीने जास्त झाडं लावावी लागणार आहेत, असं डॉ. प्रदीप सरमोकादम म्हणाले.

फक्त झाडं लावू नका, त्यांची काळजी घ्या

आजच्या वातावरणाचा प्रश्न किती गंभीर आहे हे आपल्या सर्वांनाच माहीत आहे. झाडे लावून पर्यावरणाचं रक्षण करणं आपलं कर्तव्य आहे. केवळ वृक्षारोपण केलं म्हणून होणार नाही, तर ती मोठी होईपर्यंत त्यांची काळजी घेणं हे आपलं कर्तव्य आहे. हे आपल्याला स्वतःसाठी आणि येणाऱ्या पिढीच्या भविष्यासाठी करावं लागणारेय. आशिम यांनी पर्यावरणाचं जतन करण्याच्या उद्देशाने उचललेलं हे पाऊल खरंच महान आहे, असं निलेश कांदोळकर म्हणाले.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!