गोव्याला कृषी क्षेत्रात आत्मनिर्भर बनवण्यासाठी आराखडा जारी

आयसीएआर-सीसीएआरआयच्या संकेतस्थळावर 'व्हिजन डॉक्युमेंट' उपलब्ध

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी : आयसीएआर प्रादेशिक समितीच्या बैठकीत गोव्याला कृषी क्षेत्रात स्वयंपूर्ण  बनवण्यासाठी ‘कृषी आणि संलग्न  क्षेत्रांच्या विकासाचे (स्वयंपूर्ण गोवा) व्हिजन डॉक्युमेंट म्हणजेच भविष्याचा आराखडा, केंद्रीय मत्स्योद्योग,  पशुपालन आणि दुग्धव्यवसाय मंत्री पुरुषोत्तम रुपाला यांच्या हस्ते  आभासी पद्धतीने जारी करण्यात आला. 

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आयसीएआर-केंद्रीय किनारपट्टी कृषी संशोधन संस्था (सीसीएआरआय), कृषी संचालनालयाचे अधिकारी, पशुसंवर्धन आणि पशुवैद्यकीय सेवा, मत्स्यउद्योग, उद्योग, कृषीविज्ञान केंद्रे, जिल्हा ग्रामीण विकास संस्था आणि संबंधित हितधारकांसोबत अनेक बैठका घेतल्या आणि शेतीच्या शाश्वत विकासासाठी एक रूपरेषा  विकसित करण्याविषयी चर्चा केली.

आयसीएआर-सीसीएआरआयने गोव्याचे मुख्यमंत्री आणि सचिव (कृषी) यांच्या मार्गदर्शनाखाली आणि राज्य विभागांशी सल्लामसलत करून हे व्हिजन डॉक्युमेंट तयार केले आहे. आयसीएआर-सीसीएआरआयच्या अधिकृत संकेतस्थळावर ते उपलब्ध आहे.

सचिव (कृषी) आणि गोव्याचे राज्य विभागांचे संचालक यांनी गोव्यातील कृषी उत्पादकता आणि उत्पन्न सुधारण्यासाठी कृषी, पशुसंवर्धन आणि मत्स्यव्यवसायाशी संबंधित समस्या मांडल्या. आयसीएआर-सीसीएआरआय सचिवांनी या समस्या सोडवण्याचे आश्वासन दिले. देशभरातून एकूण 260 जण या बैठकीला उपस्थित होते.

केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण राज्यमंत्री कैलाश चौधरी, शोभा करंदलाजे, डीएआरईचे सचिव आणि आयसीएआरचे महासंचालक डॉ. त्रिलोचन मोहपात्रा, आयसीएआरचे सचिव डॉ. संजय गर्ग, आयसीएआरचे DDG (NRM & Engg.) आणि प्रादेशिक समितीचे नोडल अधिकारी डॉ. सुरेश कुमार चौधरी, आयसीएआरचे उपमहासंचालक आणि अतिरिक्त महासंचालक, राज्य कृषी विद्यापीठांचे कुलगुरू आणि संस्थांचे संचालक,  मध्य प्रदेश, महाराष्ट्र, गुजरात आणि गोवा राज्य सरकारचे पशुसंवर्धन, शेती, फलोत्पादनविभागाचे सचिव आणि संचालक आदी उपस्थित होते.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!