मुख्यमंत्र्यांना धमकीचा मेसेज पाठवणारा तरुण नेमका कोण आहे?, वाचा

प्रसाद शेट काणकोणकर | प्रतिनिधी
फोंडा : मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यासह चार जणांना खंडणी आणि धमकीचा फोन केल्याप्रकरणी कुठ्ठाळी येथील आशिष सुरेश नाईक या 25 वर्षांच्या तरुणाला सोमवारी फोंडा पोलिसांनी ताब्यात घेतलंय. चौकशीअंती त्याला अटक करण्यात आली आहे.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना ज्या मोबाईल क्रमांकावरून खंडणीसाठी एसएमएस आला, त्याच क्रमांकावरून गोवा फॉरवर्डचे उपाध्यक्ष दुर्गादास कामत आणि प्रणव सावर्डेकर यांनाही धमकी आणि खंडणीसाठी संदेश आला होता. त्यानंतर मंत्री माविन गुदिन्हो यांनादेखील तसाच मेसेज आला होता. या प्रकरणी तपासाअंती फोंडा पोलिसांनी कुठ्ठाळी येथील आशिष नाईक याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून मोबाईल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी फोंडा पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे. सदर संशयित हा पार्टटाइम कॅब चालक म्हणून काम करतो.
कसा लागला आशिषचा सुगावा?
मंत्री माविन गुदिन्हो यांनी या खंडणी आणि धमकीप्रकरणी तक्रार नोंदवली होती. त्यांना आलेल्या धमकीच्या मेसेजमध्ये एक नंबर होता. या नंबर होता जयेश फडते याचा. पोलिसांनी तक्रारीवरुन पेशानं रिअल इस्टेटचा बिझनेस करणाऱ्या जयेश फडतेला ताब्यात घेतलं. मोबाईल नंबरही त्यांचा असल्यानं त्याची चौकशी करण्यात आली. मात्र हा मेसेज त्याने पाठवला नसल्याचं चौकशीतून समोर आलं. अखेरीस जामीनावर जयेश फडतेला सोडण्यात आलं.
दरम्यान एका आयपी एड्रेसवर हा एसएमएस पाठवल्याचं पोलिसांच्या निदर्शनास आलं. त्यानंतर पोलिसांनी आयपीचा शोध घेतला. हा आयपी आशिष सुरेश नाईकचा असल्याचं समोर आलं. महत्त्वाचं म्हणजे जयेशसोबत आशिषचा एका प्रॉपर्टीच्या प्लॉटवरुन वाद सुरु होता. या वादातूनच जयेशला अडकवण्यासाठी आशिषने कट रचल्याचा पोलिसांना संशय आला. तपासाअंती आशिषनेच इंटरनेट मेसेज पाठवल्याचं समोर आलं आहे.
कोण आहे आशिष नाईक?
आशिष नाईकचं वय हे 25 वर्ष आहे. हा विद्यार्थी असून तो कुठ्ठाळीमध्ये राहायला आहे. नुकताच त्यानं आयटीआयचा कोर्स केला होता. दुसरी गोष्ट म्हणजे तो पार्ट टाईम ड्रायव्हिंगचं काम करतो. सूड घेण्याच्या इराद्यानं आशिषने हा सगळा कट रचल्याचं समोर आलंय. पोलिस निरीक्षक मोहन गावडे याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.