बाबरी मशिदीवर निबंध स्पर्धा; ‘पीएफआय’विरुद्ध पोलिसांत तक्रार

हिंदू जनजागृती समितीकडून कारवाईची मागणी

सचिन खुटवळकर | प्रतिनिधी

पणजी : बाबरी मशिदीवर आधारित निबंध स्पर्धा आयोजित केल्यामुळे पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया अर्थात पीएफआय हिंदुत्ववादी संघटनांच्या निशाण्यावर आलीय. या स्पर्धेच्या माध्यमातून धार्मिक द्वेष भडकवत असल्याचा आरोप करत पीएफआयच्या विरोधात कारवाई करावी, अशी मागणी हिंदू जनजागृती समितीनं गोव्याच्या पोलीस महासंचालकांकडे केली आहे.

10 वी ते 12 वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा

बाबरी मशिदीच्या विषयावर आधारित निबंध लेखन स्पर्धा आयोजित करणार्‍या पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया संघटनेला राज्यात रोषाला सामोरं जावं लागतंय. या संघटनेनं गोव्यातील 10 वी ते 12 वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी बाबरी मशिदीवर आधारित अखिल गोवा निबंध स्पर्धा आयोजित केलीय. त्यासाठी 3 हजार, 2 हजार आणि 1 हजार अशी बक्षिसं ठेवलीत. विषय बाबरी मशीद हा आहे. लेस्ट वी फरगेट अर्थात ‘तर आम्ही विसरून जाउ…’ या शीर्षकाखाली स्पर्धेचं आयोजन केलंय. 8 डिसेंबर ही निबंध सादर करण्याची अंतिम दिनांक ठेवली असून त्यासाठी मडगाव, दवर्ली, पणजी, वास्को आणि म्हापसा येथे केंद्रे घोषित केली आहेत. या निबंध स्पर्धेचा निकाल 13 डिसेंबरला जाहीर होणार आहे. मात्र याद्वारे ‘पी.एफ.आय.’ समाजात द्वेष निर्माण करत असून त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी हिंदू जनजागृती समितीने गोव्याच्या पोलीस महासंचालकांकडे केली आहे.

विद्यार्थ्यांमध्ये द्वेष निर्माण करणारी स्पर्धा!

सर्वोच्च न्यायालयाने बाबरी मशिदीवर यापूर्वीच निकाल घोषित केला असल्याने ही निबंध स्पर्धा समाजातील विविध गटांत शत्रुत्व निर्माण करणारी, समाजातील ऐक्यास हानी पोचवणारी, तसेच कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणारी आहे. त्याचप्रमाणे देशाची भावी पिढी असलेल्या विद्यार्थ्यांमध्ये द्वेष निर्माण करणारी आहे, असं हिंदू जनजागृती समितीनं म्हटलंय.

पीएफआयचा दहशतवादी संघटनेशी संबंध!

पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया ही दहशतवादी, देशविरोधी कारवाया करणारी आणि इसिस या दहशतवादी संघटनेशी संबंध असलेली संघटना असल्यावरून केंद्र सरकार या संघटनेवर लक्ष ठेवून आहे. त्यामुळे भा.दं.वि. कलम 153 अतंर्गत पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया या संघटनेवर आणि या निबंध स्पर्धेत सहभागी असलेल्या सर्वांवर कारवाई करावी, अशी मागणी हिंदू जनजागृती समितीनं केलीय.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!