बांबोळीतील हेडगेवार प्रशालेच्या विस्तारकामासाठी ‘पीएफसी’तर्फे आर्थसाहाय्य

Goan Varta Live | प्रतिनिधी
पणजी : ऊर्जा क्षेत्रातील आघाडीची बँकेतर वित्तसंस्था असलेल्या पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेडने (पीएफसी) बांबोळीतील डॉ. के. बी. हेडगेवार प्रशालेच्या आवारात दुमजली इमारत बांधण्यासाठी अर्थसाहाय्य केले आहे.
‘पीएफसी’ने शाळेच्या बांधकामासाठी तीन कोटींचा सीएसआर निधी उपलब्ध करुन दिला आहे. या शाळेचे उद्घाटन गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि पीएफसीचे सीएमडी रविंदरसिंग धिल्लन यांनी केले.
या इमारतीमध्ये वर्गखोल्या, प्रयोगशाळा, बहुउद्देशीय हॉल, शिक्षकांसाठी खोल्या आणि मुलांसाठी शौचालयांचा समावेश आहे. स्थानिक रहिवाशांची शाळेत जाणारी मुले ही या प्रकल्पाची लाभार्थी आहेत. या शाळेत शिकणारी बहुसंख्य मुले ही समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील आहेत आणि त्यातील अनेकजण अनुसूचित जाती, जमाती व इतर मागासवर्ग या प्रवर्गातील आहेत.
डॉ. के. बी. हेडगेवार प्रशालेतील विद्यार्थ्यांच्या हितासाठी सर्व आवश्यक सुविधांसह शाळेची इमारत बांधण्याच्या या सीएसआर प्रकल्पामुळे राज्यातील शैक्षणिक पायाभूत सुविधांची गरज भागविण्यासही हातभार लागणार आहे. या शाळेच्या इमारतीमुळे स्थानिक समाजातील उच्च वर्गातील पालक पुढे येउन आपल्या मुलांना दर्जेदार शिक्षण देणार्या या शाळेमध्ये प्रवेश घेण्यासाठी प्रोत्साहित होतील, अशी ‘पीएफसी’ला आशा आहे. ‘सीएसआर’च्या जबाबदारीचा भाग म्हणून ‘पीएफसी’ने गेल्या सहा वर्षांत गोव्यातील बेरोजगार तरुणांना प्रशिक्षण देऊन रोजगार मिळविण्यास मदत केली आहे.
या शाळेच्या उद्घाटन कार्यक्रमास सांताक्रूझचे आमदार अँटोनियो फर्नांडिस, ‘पीएफसी’चे माजी सीएमडी व ‘ईईएसएल’चे अध्यक्ष राजीव शर्मा, गोवा सरकारचे वीज खात्याचे सचिव (आयएएस) कुणाल, ‘पीएफसी’चे संचालक (वाणिज्यिक) प्रवीणकुमार सिंग, ‘पीएफसी’चे कार्यकारी संचालक आर. मुरहरी तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.