मांद्रेमध्ये गांजाची नर्सरी, पेडणे पोलिसांची मोठी कारवाई

Goan Varta Live | प्रतिनिधी
पणजी : ड्रग्सविरोधात गोवा पोलिसांनी आक्रमक पवित्रा घेतला असून कारवाईलाही वेग आला आहे. गावडेवाडा-मांद्रेतील एका फ्लॅटवर पोलिसांनी छापा टाकत मोठी कारवाई केली आहे. पेडणे पोलिसांनी गांजाची नर्सरी शोधून काढत त्यावर कारवाई केली आहे. मुख्य म्हणजे या प्रकरणी दोघा रशियन नागरिकांना अटक करण्यात आली आहे. तर फ्लॅट मालकांवर पोलिसांनी गुन्हा नोंदवलाय. गांजाच्या नर्सरीचं रॅकेटची पाळमुळं शोधण्याचं काम सध्या पोलिसांकडून सुरु आहे. अटक करण्यात आलेल्या रशियन नागरिकांची कसून चौकशी सध्या सुरु आहे. या चौकशीतून काय अधिक माहिती समोर येते, हे पाहणं महत्त्वाचंय.
गांजाचं रशियन कनेक्शन
आलेक्सी पेरेवालोव्ह (31) आणि आलेक्सी रेब्रिएव (41) अशी अटक केलेल्या रशियन नागरिकांची नावं आहेत. मे 2020 पासून ते या फ्लॅटमध्ये वास्तव्यास होते. पाच गांजाची रोपे आणि सुकवलेला अडीच किलो गांजा पोलिसांनी आपल्या कारवाईमध्ये जप्त केलाय. याची बाजारातील किंमत सुमारे साडेतीन लाख रुपये आहे. याशिवाय रोख 25 हजार रुपयेही हस्तगत करण्यात आलेत.
निरीक्षक जीवबा दळवी यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली. उपनिरीक्षक प्रफुल्ल गिरी, हरीश वायंगणकर आणि संजीत कांदोळकर, कॉन्स्टेबल रवी मालोजी, अनिशकुमार पोके, विनोद पेडणेकर, साबाजी राऊळ देवीदास मालकर आणि दीपा विर्नोडकर हे देखील यांनी या कारवाईत महत्त्वाची भूमिका बजावली. आता गोव्यातील ड्रग्सच्या रॅकेटचं रशियन कनेक्शन लवकरच समोर येण्याची शक्यता आहे.