पेडणे पोलिसांनी स्कूटर-मोटरसायकल चोरांची टोळी पकडली

चोरलेल्या वाहनांची ७ इंजिने जप्त

मकबूल माळगीमनी | प्रतिनिधी

पेडणेः पेडणे पोलिसांनी मोटरसायकल चोरी प्रकरणी एकूण चार युवकांच्या एका टोळीला अटक केलीये. शिवाय चोरलेल्या वाहनांची ७ इंजिने जप्त केलीत.

हेही वाचाः मांद्रेत सचिन परबांमुळे काँग्रेसचं अस्तित्व टिकून

गॅरेज मालकाने नोंदवली तक्रार

पेडणे पोलिस निरीक्षक  जिवबा दळवींनी माहिती देताना सांगितलं, प्रमोद ज्ञानदेव शेगडे (रा. सावंतवाडी, महाराष्ट्र)  यांचं ‘सातेरी ऑटोमोबाईल गॅरेज’  आगरवाडा पेडणेत आहे. गॅरेज मालकाने अशी तक्रार दाखल केली, की अज्ञात संशयितांनी जीए-११ – सी-4364  आणि होंडा असलेली अ‍ॅक्टिव्हा स्कूटर, दुरुस्तीसाठी गॅरेजबाहेर ठेवलेली जीए-11-बी -8081  क्रमांकाची डीओ स्कूटर संशयितांनी एका टाटा एस रिक्षात नेली. 

हेही वाचाः केंद्रीय योजनांसाठी आता कन्सल्टंट

पोलिस तपास सुरू; संशयितांना घेतलं ताब्यात

पोलिसांनी तातडीने गुन्हा नोंदवून तपास सुरू केला. वेगवेगळ्या टीम तयार करून पोलिसांनी तपासाला दिशा दिली. अगरवाडा येथून रिक्षा जातानाची सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागली आणि तांत्रिक पाळत ठेवल्यानंतर त्या रिक्षाचा आरसीओ नोंदणी क्रमांक सीसीटीव्हीच्या माध्यमातून मिळू शकला. पुढे रिक्षाचा मालक मोहम्मद सलमान मनिहर याला करासवाडा येथे पोलिसांनी ताब्यात घेतलं. त्याने आपल्या अन्य तीन साथीदारांसह चोरी केल्याची कबुली दिली.  पेडणे पोलिसांनी तातडीने उर्वरित संशयितांचा शोध घेत त्यांना  अटक केली.  चारही संशयितांनी गुन्ह्याची कबुली दिली. संशयितांमध्ये मोहम्मद आजम अली मनिहर (वय ३२ वर्षं),  सलमान आजम अली मनिहर ( वय २७  वर्षं), सुलतान आझम अली मनिहर (वय २८ वर्षं) आणि अब्दुल गुलाम कादिर (वय ३० वर्षं) यांना अटक करण्यात आली आहे. 

हेही वाचाः रिलायन्स जिओ, गुगलतर्फे ‘जिओफोन-नेक्स्ट’ची घोषणा

चोरलेल्या दुचाकी जप्त

पेडणे  पोलिसांनी  जीसी44ई5113370, डीएचजीबीकेई6014, एफ4862236732, जेएफ08ई8517331, जेएफ08ई0341497, एनओई/एक्स078318 आणि जेईओबीयूडी96641 इंजिने तसंच दोन दुचाकी स्क्रॅप अड्ड्यातून जप्त केल्या आहेत. उर्वरित 5 इंजिनांच्या मालकांचा शोध घेण्याचा प्रयत्न पोलिसांकडून सुरू आहे.

हेही वाचाः सोमनाथ कोमरपंत यांना कालिदास पुरस्कार जाहीर

टोळी अशी करायची चोरी

संशयित  मोहम्मद आजम अली मनिहर हा करासवाडा म्हापसा येथील स्क्रॅप यार्डातून  त्याच्या मजुरांच्या माध्यमातून अशा स्कूटर्सची माहिती गोळा करत असे आणि त्याचे इतर साथीदार या दुचाकी उचलून रिक्षामध्ये लोड करत. तसंच पुढे स्क्रॅप यार्डमध्ये नेत. भंगार यार्डात दुचाकींचे पार्ट्स काढून ते काळेबाजारात विकले जात.  अशाप्रकारे ही टोळी चोरट्या वाहनांचा कोणताच पुरावा स्वतःजवळ ठेवत नसत.  पेडणे पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे इतर चोरीच्या वाहनांचाही शोध घेण्यात येत आहे.

हेही वाचाः रिलायन्स जिओ देशात प्रथम 5 जी लाँच करणार

पेडणे पोलिसांची कामगिरी

पोलीस निरीक्षक जिवबा दळवी यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक संजीत कांदोळकर, पोलीस उपनिरीक्षक हरीश वायंगणकर, पीएसआय विवेक हळर्णकर, संदेश किनळेकर,  रूपेश कोरगावकर,  गुरुदास मांद्रेकर, सागर खोर्जुवेकर, लोकेश गावडे, किशोर नाईक,  प्रजोत मयेकर,  विनोद पेडणेकर,  सर्वेश कळंगुटकर,  महेंद्र साखळकर यांनी कामगिरी बजावली. म्हापसा पोलिस उपअधीक्षक गजानन प्रभुदेसाई आणि पोलीस अधीक्षक (आयपीएस)  शोबित सक्सेना यांच्या देखरेखीखाली पुढील तपास सुरू आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!