‘पेडणेकरच करतील बाबूंचा त्याग’

मोपा विमानतळ संघर्ष समितीचा आजगावकरांना इशारा

Goan Varta Live | प्रतिनिधी

पेडणे : मोपा विमानतळावर स्थानिकांना नोकर्‍या व कामधंदा देण्याऐवजी परस्पर बाहेरच्या बाहेर कामे देऊनही तीन वर्षे मंत्री बाबू आजगावकर हे मूग गिळून गप्प राहिले. ज्यावेळी मोपा विमानतळ संघर्ष समितीने गावागावात जाऊन जनजागृती आंदोलनाची तयारी केली. त्यावेळी झोपेतून जागे झालेले आजगावकर आता स्थानिकाना रोजगार मिळाले नाहीतर आपण आंदोलनात पुढे असण्याची भाषा करतात. वेळप्रसंगी राजकारणाचा त्याग करणार असे सांगून त्यांनी पेडणेकरांची आणि मोपा पिडीत लोकांची दिशाभूल करू नये. स्वाभिमानी पेडणेकर आता आजगावकर यांचा त्याग करतील, असा इशारा मोपा विमानतळ संघर्ष समितीने स्थानिक पत्रकारांकडे बोलताना दिला.

मोपा विमानतळ पेडणे तालुक्यासाठी वरदान ठरण्याची अपेक्षा होती. मात्र, तो आता शाप ठरत आहे. स्थानिकाना विमानतळावर किती नोकर्‍या मिळाल्या, कामाचे विविधे ठेके कुणाला मिळाले, कुणाच्या गाड्या कामाला लागला याचा खुलासा उपमुख्यमंत्र्यांनी करावा, असे आवाहन संघर्ष समितीचे निमंत्रक सुबोध महाले यांनी केले आहे . स्थानिकांना वगळून परस्पर कामे केली जातात. ज्या पंचायत क्षेत्रातील जमिनी या प्रकल्पासाठी गेल्या त्या पिडीताना न्याय नाही, नोकरी नाही, मोबदला नाही आणि तरीही आजगावकर गप्प आहेत. त्यांना खरोखरच पेडणेकरांचे हित साधायचे असेल तर विनाविलंब आताच विमानतळ विरोधी आंदोलन करावे. आम्हीही त्यांच्यासोबत आहोत. आमचा विमानतळाला विरोध नाही, मात्र अन्याय सहन करणार नाही, स्थानिकांना वागळून जर नोकर्‍या बाहेरच्याना देण्याचा जो प्रकार चालू आहे त्या विरोधात संघर्ष समिती तीव्र आंदोलन छेडणार आहे अशी माहिती समितीने दिली.

उपमुख्यमंत्री पद बाबू आजगावकर यांना पेडणेकरामुळे मिळाले. आता बाबू आजगावकर यांनी या मंत्री पदाचा वापर करून विधानसभेत खास कायदा आणून बाजारभावाने मोपा विमानतळाच्या जमिनीला भाव देण्यासाठी वापर करावा, अशी मागणीही करण्यात आली आहे. जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत लढा चालूच राहणार. आंदोलन आता कुणीच थांबवू शकणार नाही. हे आंदोलन भूमिपुत्रांच्या हक्कासाठी असणार असल्याचे समितीने जाहीर केले.

आमच्या जमिनी गेल्या, आमच्याकडे वाहन आहे ते विमानतळावर लावण्याऐवजी पर्वरीची वाहने वापरली जातात आणि बाबू आजगावकर गप्प का असतात, असा सवाल पीडित शेतकरी उदय महाले यांनी केला.

उदय महाले म्हणाले की…

बाबू आजगावकर यांनी आता आंदोलन कधी करणार ते जाहीर करावे. विरोधकानाही सोबत घेऊन पेडणेकरांच्या हक्कासाठी लढावे. आम्ही त्यांच्या सोबत आहोत.

उदय महाले, निमंत्रक, मोपा विमानतळ संघर्ष समिती

हेही वाचा –

मोठा दिलासा! ‘या’ महिन्यात कोरोना नियंत्रणात येणार

चोर्ला घाटाची अक्षरशः चाळण, पावसामुळे घाट आणखी धोकादायक

आपला गोवा बेस्ट डेस्टिनेशनमध्ये 11व्या स्थानी, थोडक्यात टॉप टेन हुकलं

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!