‘त्या’ कामचुकार कर्मचाऱ्यांविरुद्ध कारवाई कधी?

पेडणेकारांचा सवाल; मामलेदार कार्यालयातील कामचुकार कारभार

निवृत्ती शिरोडकर | प्रतिनिधी

पेडणेः पेडणे मामलेदार कार्यालयात काही कर्मचारी कार्यालयीन वेळेत अनुपस्थित असतात, कामकाजाच्या वेळा नीट पाळल्या जात नाहीत. त्यामुळे इथे येणाऱ्या नागरिकांना रिकाम्या खुर्च्या पाहून परतावं लागत आहे. यंत्राला अंगठा लावून गायब होणाऱ्या या ‘अंगठेबहाद्दर’ कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

हेही वाचाः जीएमसीत ओपीडीसाठी आता फोनवर घेता येणार अपॉइंटमेंट?

कधीही यावं, आणि वेळेपूर्वी जावं…

पेडणे मामलेदार कार्यालयातील एक महिला कर्मचारी तर सकाळी अकरा ते सव्वा अकरा वाजता कामाला येते, लंच ब्रेकनंतर अर्धातास उशिरा जाग्यावर येते, तर संध्याकाळी चार-साडेचार वाजताच ही महिला कर्मचारी घरी निघून जाते. हीच महिला काही वर्षापूर्वी कार्यालयात झोपत असल्याचं छायाचित्र वर्तमानपत्रात प्रसिद्ध झालं होतं. त्याचवेळी तत्कालीन मामलेदारांनी तिला समज दिली होती. या महिलेव्यतिरिक्त आणखी दोन पुरुष कर्मचारीसुद्धा वेळेत कार्यालयात येत नाहीत, असं निरीक्षण जागरूक नागरिकांनी नोंदवलं आहे.

पगार कसला? सरकारी कामाचा की वैयक्तिक?

सध्या कोरोना महामारीचा काळ असल्याने नागरिकांची ये-जा सरकारी कार्यालयात कमी असते. त्यामुळे कार्यालयीन वेळेत अनेक कर्मचारी कार्यालयाबाहेर आपली वैयक्तिक कामं करताना दिसत असल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे. त्यामुळे या कर्मचाऱ्यांना पगार नक्की सरकारी कामाचा मिळतो की वैयक्तिक कामाचा, असा प्रश्न स्थानिकांनी उपस्थित केलाय.

हेही वाचाः ALPHANSO | ओरिजनल हापूस कसा ओळखणार? कोकणातील बागायतदारांचा मॉडर्न फंडा

अंगठा लावता, की अंगठा दाखवता?

मामलेदार कार्यालयात येणारे व जाणारे कर्मचारी बायोमेट्रिक यंत्राला अंगठा लावतात. त्या यंत्राची नोंदणी तपासून कोणते कर्मचारी, कोणत्या वेळी येतात आणि कोणत्या वेळी जातात याची तपासणी उपजिल्हाधिकाऱ्यांनी करावी, अशी मागणी होत आहे. या तपासणीतून हे कामचुकार कर्मचारी बायोमेट्रिक यंत्राला अंगठा लावतात, की अंगठा दाखवतात, तेही समोर येईल, असं जागरूक नागरिकांचं म्हणणं आहे.

हेही वाचाः खासगी रुग्णालयांमध्ये कोविड उपचारांचे शुल्क निश्चित

पुन्हा ये रे माझ्या मागल्या….

सुमारे 15 दिवसांपूर्वी असेच काही कर्मचारी कामकाजाच्या वेळी मोबाईलवर बोलत होते आणि आपली कामं करून घेण्यासाठी आलेले लोक त्यांच्यासमोर ताटकळत उभे होते. बराच वेळ पाहून कंटाळलेल्या नागरिकांनी, त्या कर्मचाऱ्याची थेट मामलेदार अनंत मळीक यांच्याकडे तक्रार केली होती. मामलेदारांनी लगेच त्या कर्मचाऱ्यांना योग्य सूचना दिल्या होत्या. आता पुन्हा ये रे माझ्या मागल्या, या उक्तीप्रमाणे हे कर्मचारी बेजबाबदार वागत असल्याचं मत अनेक नागरिकांनी व्यक्त केलं आहे.

हेही वाचाः सरकारला फक्त गोंयकारांची मतं हवीत, गोंयकारांचा जीव महत्त्वाचा नाही

साहेब नसले की मज्जाच मज्जा

पेडण्यात मामलेदार अनंत मळीक हे निवडणूक काळात बाहेर जात असतात. हल्ली मोपा लिंक रोड प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी व कायदा आणि सुव्यवस्था बिघडू नये म्हणून घटनास्थळी ते उपस्थित असतात. त्यांच्या गैरहजेरीत काही कर्मचारी कामावर उशिराने येतात व लवकर जातात, यात महिला कर्मचारीही आहेत.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!