लोकांना कायद्याचं राज्य हवं, मुख्यमंत्र्यांच्या संगोपनाचे धडे नकोत

बाणावली अल्पवयीन बलात्कार प्रकरण मुख्यमंत्र्यांनी केलेल्या विधानावर 'गोंयचो आवाज'च्या महिला सेलने संताप व्यक्त केला

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी: राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असून लोकांचं लक्ष हटवण्यासाठी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी विधान करत पालकांनीच किशोरवयीन मुलींची नैतिकरित्या पोलिसगिरी करावी, असा सल्ला दिल्याच्या वक्तव्यानंतर ‘गोंयचो आवाज’ महिला सेलने संताप व्यक्त केला आहे.

हेही वाचाः मनोज परब यांना ताब्यात घेण्याचं कारण काय?

पालकांना मुख्यमंत्र्यांकडून बालसंगोपनाच्या धड्यांची गरज नाही

महिला सेलच्या प्रमुख कारमेन कुरिया म्हणाल्या, गोव्यातील पालकांना मुख्यमंत्र्यांकडून बालसंगोपनाच्या धड्यांची गरज नाही. त्याऐवजी, त्यांनी राज्यातील ढासळलेली कायदा आणि सुव्यवस्था सुधारण्यासाठी प्रयत्न करावेत. हे अलिकडच्या वाढत्या बलात्कारांच्या घटनांवरून स्पष्ट होतं. गोवा पोलिसांनी बाणावली बलात्काराच्या घटनेतील संशयितांना गजाआड केलं. मात्र, प्रश्न असा पडतो की, देशभरातील व्यक्तींना गोव्यात येऊन असे भयंकर गुन्हे करण्यात सोयीस्कर का वाटतं? याचं कारण विद्यमान गृहमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली कायद्याची अंमलबजावणी व्यवस्थित होत नाही, असं म्हणत ‘गोंयचो आवाज’च्या महिला सेलने मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला.

हेही वाचाः पावसामुळे चालकाला ‘ती’ गुरं दिसली नाहीत

राज्याचा कारभार सांभाळण्यासाठी मुख्यमंत्री सक्षम नाहीत

मुख्यमंत्री तथा गृहमंत्री हे गोव्याला कॅसिनो हब, रेव्ह पार्टीचं केंद्रस्थान करण्याचा प्रयत्न करताहेत. सध्या गोवा हे गुन्ह्याचं राज्य म्हणून ओळखलं जाऊ लागलंय, जिथे काहीही होतं आणि कायदा अस्तित्वात नसल्याचं दिसतं. अल्पवयीन मुलींना घरातच ठेवावं हा मुख्यमंत्र्यांचा उत्कृष्ट उपाय, परिस्थितीवर उपाय काढण्याचा त्यांचा हेतू नाही हेच अधोरेखित करतं की ते राज्याचा कारभार सांभाळण्यासाठी सक्षम नाहीत. विशेष म्हणजे, गोव्याच्या लोकांनी स्वतःची काळजी स्वतः घ्यावी, असं मुख्यमंत्र्यांना म्हणायचं आहे.

हेही वाचाः आरजीचे सुप्रिमो मनोज परब यांना पोलिसांनी घेतले ताब्यात

महिला-मुलींच्या सुरक्षिततेसाठी कोणती पावलं उचलणार ते स्पष्ट करा

या घटनेनंतर पीडितांच्या कुटुंबियांवर आघात झालाय. मुख्यमंत्र्यांनी असे गुन्हे रोखण्यासाठी तसंच महिला व मुलींच्या सुरक्षितेसाठी कोणती पावलं उचलण्याचा निर्णय घेतलाय, ते स्पष्ट करावं, अशी मागणी कारमेन यांनी केलीये.

हा व्हिडिओ पहाः Video | CM on Controvercial Statement | कुणाच्याही भावना दुखावण्याचा माझा हेतू नव्हता

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!