डॉक्टरांवरचा भार कमी करण्यासाठी लोकांनी स्वतःची काळजी घ्यावी

माजी केंद्रीय मंत्री एदुआर्द फालेरो यांचं गोंयकारांना आवाहन

Goan Varta Live | प्रतिनिधी

मडगावः कोविड महामारीने आज डॉक्टरांवर अधिक जबाबदारी आली आहे. गोव्यातील सर्व डॉक्टर रात्रंदिवस लोकांचे प्राण वाचवण्यासाठी झटत आहेत. अनेक कुटुंबियांसाठी देवदूत होऊन त्यांनी अनेकांचे प्राण वाचवले आहेत. आपण सर्वांनी या कोविड महामारीच्या कठीण काळात स्वतःची काळजी घेत डॉक्टरांवरील भार कमी करावा, असं आवाहन माजी केंद्रीय मंत्री एदुआर्द फालेरो यांनी केलं. दक्षिण गोवा जिल्हा काँग्रेस कार्यालयात आयोजित कोविड महामारीत अविरतपणे सेवा देणाऱ्या काही डॉक्टरांचा रविवारी सन्मान करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी विरोधी पक्ष नेते दिगंबर कामत, माजी मुख्यमंत्री लुईझिनो फालेरो, माजी मंत्री आलेक्स सिक्वेरा, दक्षिण गोवा जिल्हा काँग्रेस अध्यक्ष ज्यो डायस उपस्थित होते.

हेही वाचाः वाळपई छत्रपती शिवाजी महाराज नगरपालिका उद्यानाचं सौंदर्यीकरण प्राधान्याने

आजाराची लक्षणं दिसल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या

लोकांची सेवा करण्यास आम्ही बांधील आहोत. प्रयत्नांची पराकाष्ठा करून जीव वाचवण्यासाठी कर्तव्य भावनेने आम्ही सर्व आरोग्य सेवक काम करत आहोत. लोकांनी कोणत्याही आजाराची लक्षणं दिसल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेणं महत्त्वाचं आहे. डॉक्टरांवर अनेक मर्यादा असतात आणि वेळीच रुग्ण दाखल झाल्यास त्यांना योग्य तो इलाज करणं सोपं जातं. लोकांनी कोविडच्या महामारीत सर्व मर्यादा पाळूनच वागावं. काँग्रेस पक्षाने आमच्या कार्याची दखल घेऊन आमचा सन्मान केला याबद्दल आम्ही सर्वजण त्यांचे ऋणी आहोत, असे उद्गार डॉ. राजेश नायक यांनी यावेळी बोलताना काढले.

हेही वाचाः CRIME | हणजुण येथे चोरी प्रकरणी एकास अटक

डॉक्टरांचा गौरव सोहळा

माजी केंद्रीय मंत्री एदुआर्द फालेरो यांच्या हस्ते डॉ. व्यंकटेश मळये, डॉ. राजेश नायक, डॉ. प्रविण भट यांचा सन्मान करण्यात आला. विरोधी पक्ष नेते दिगंबर कामत यांनी डॉ. राजेश्वर नाईक, डॉ. सॅम्युएल अरवतगी आणि डॉ. सुजोय दास यांचा गौरव केला. नावेलीचे आमदार लुईझिनो फालेरो यांनी डॉ. मिलींद देसाई, डॉ. सुधिर शेट आणि डॉ. राजेश जवेरानी यांचा सन्मान केला. माजी मंत्री आलेक्स सिक्वेरा यांनी डॉ. ब्रेनान तावारिस तसंच डॉ. शशांक प्रभुदेसाई यांचा गौरव केला.

हेही वाचाः अभिनेते दिलीप कुमार हिंदुजा रुग्णालयात

प्रत्येक आरोग्य सेवकाचा करणार सन्मान

दक्षिण गोवा जिल्हा काँग्रेस अध्यक्ष ज्यो डायस यांनी सन्मान कार्यक्रमास उपस्थित राहिल्याबद्दल सर्व डॉक्टरांचे आभार मानले. कोविड महामारीत बंधनं असल्यानं इतर आरोग्य सेवकांचा सन्मान नंतर करण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं. यापुढे प्रत्येक आरोग्य केंद्राना भेट देऊन आरोग्य सेवकांचा सन्मान करणार असल्याचंही ते म्हणाले.

हेही वाचाः दक्षिण गोवा जिल्हा कोविड हॉस्पिटलात आतापर्यंत 200 बाधित गर्भवतींवर उपचार

जिल्हा काँग्रेस उपाध्यक्ष दीपक खरंगटे यांनी आभार प्रदर्शन केलं. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन पिटर गोम्स आणि रोयला फर्नांडिस यांनी केलं. गोवा प्रदेश काँग्रेस समितीचे सरचिटणीस सुभाष फळदेसाई, ॲड. येमेनी डिसोजा, शिवानी पागी, फ्लोरीयानो कुलासो तसंच इतर काँग्रेस पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!