पेडणे नगरसेविका रमल्या गणेशमूर्ती रंगकामात

गणेश मूर्ती साकारणं पालयेकर कुटुंबाची शेकडो वर्षांची परंपरा

निवृत्ती शिरोडकर | प्रतिनिधी

पेडणेः आजची स्त्री कुठल्याच क्षेत्रात मागे नाही. उलट पुरुषांच्या चार पावलं पुढे आहे. याचं ताजं उदाहरण म्हणजे पेडणे पालिकेची नगरसेविका आश्विनी अरुण पालयेकर. चार भिंतीत न राहता, मुलाबाळांचं शिक्षण, घरसंसार व्यवस्थित करून आणि समाजाचं ऋण फेडण्यासाठी पालिकेच्या निवडणुकीतही विजयी होऊन आपल्या प्रभागाचा विकास त्यांनी केला. त्याचबरोबर आपल्या अंगातील कला चार चौघांपर्यंत पोचावी यासाठी त्या आपल्या चित्रशाळेत वेळात वेळ काढून गणेश मूर्ती रंगवण्याचं काम करत असतात.

गणेश मूर्ती साकारणं पालयेकर कुटुंबाची शेकडो वर्षांची परंपरा

खारेबंद पेडणे येथील पालयेकर कुटुंबियांची शेकडो वर्षाची परंपरा असलेली गणेश मूर्ती चित्र शाळा ही गांधीतीर या ठिकाणी पुरातन वास्तूमध्ये आहे. याच इमारतीला १०० वर्षांपेक्षा जास्त काळ झाला आहे. त्यामुळे त्या काळापासून या वास्तूमध्ये राज्यात आणि बाहेरच्या राज्यात घरोघरी आणि सार्वजनिक गणेशमूर्ती बनवण्याचं काम सुरु असतं. पालयेकर बंधूंची ही चित्रशाळा पूर्ण पेडणे तालुक्यात परिचीत आहे. शेकडो वर्षांची परंपरा जसे पुरुष मंडळी राखतात, त्याचप्रमाणे स्त्रियाही या कलेत रमून आपली कला चार चौघात सादर करायला मागेपुढे पाहत नाहीत.

पती, दीर करतात मार्गदर्शन

नगरसेविका आश्विनी अरुण पालयेकर सांगतात, मागच्या २० वर्षांपासून मी गणेशमूर्ती रंगवण्याचं काम करतेय. मूर्तींना कसा रंग चढवावा याविषयी पती अरुण पालयेकर, दीर यांच्याकडून मार्गदर्शन घेतलं. गणेशमूर्तींना रंग देताना जो आनंद मिळतो, तो अजून कोणत्या कलेत मिळत नाही. मी रंगवलेल्या मूर्तींचं घरोघरी पूजन होतं. त्यामुळे माझ्या कलेचा हा एक वेगळाच सन्मान होतो, असं पालयेकर म्हणतात.

प्राभागातील समस्या सोडवण्याकडे कल

पर्यावरणाला घातक नसणाऱ्या मूर्ती आमच्या चित्र शाळेत गेली १०० वर्षं, किंबहुना त्याहूनही जास्त काळापासून घडवणं सुरू आहे. या कामात आजपर्यंत खंड पडलेला नाही. सामाजिक क्षेत्रात कार्य करत असताना माझ्या प्रभागातील काही महिला नागरिक त्यांच्या समस्या तसंच सार्वजनिक समस्या घेऊन येतात. त्या ऐकून, त्यांना योग्य मार्गदर्शन करत, त्या सोडवण्याचा मी प्रयत्न करते, असं पालयेकर म्हणाल्या.

मुलाचा अभिमान

आश्विनी पालयेकर सांगतात, माझा मुलगा कृष्णा पालयेकर हा सामाजकार्य करतो. त्याचा मला अभिमान आहे. माणुसकीचा झरा त्याच्यातही वर्षाचे १२ महिने वाहत असल्याचं दिसतं. त्याच्यासारख्या मुलाला जन्म देणं म्हणजे आईपणाची धन्यता आहे.

मुलांची आवड ओळखून त्यांना प्रोत्साहन द्या

आजची मुलं मातीत हात घालत नाहीत, असं म्हटलं जातं. परंतु आमच्या चित्रशाळेत अनेक मुलं केवळ आवड म्हणून मातीत हात घालून मूर्तीला आकार देण्याचा प्रयत्न करतात. आजकाल आई-वडील आपल्या मुलांना मातीत हात घालायला देत नसल्यानं काही मुलं मातीत हात घालत नाहीत. आई वडिलांनी मुलांची आवड ओळखून त्यांना जर मार्गदर्शन केलं, तर मुलं नक्कीच या कलेत प्राविण्य मिळवू शकतात, असं पालयेकर म्हणाल्या.

हा व्हिडिओ पहाः VIDEO | SUICIDE OR MURDER? | हाताच्या नसा कापलेल्या…

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!