शाळा सुरू करण्यास ‘रेड सिग्नल’

Goan Varta Live | प्रतिनिधी
पणजी : राज्यातील शाळा सुरू करण्यास मुख्याध्यापक तसेच पालक-शिक्षक संघटना तयार नाहीत. 209 अनुदानित शाळांपैकी 196 शाळांनी यासाठी नकार दिल्याची माहिती मुख्याध्यापक संघटनेचे अध्यक्ष मारियन वालादोरिस यांनी दिली.
राज्यातील शाळांबाबत याच आठवड्यात निर्णय घेण्याचे संकेत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिले असले, तरी त्याला विरोध होताना दिसतोय. करोना अद्याप नियंत्रणात आलेला नाही. अशा स्थितीत शाळा सुरू झाल्या आणि सरकारने त्याबाबतची नियमावली जारी केली, तरी त्यांचं पालन विद्यार्थ्यांकडून होईलच असं नाही. या भीतीमुळेच शाळा उघडण्याबाबत पालक सकारात्मक नाहीत.
शाळा सुरू करायच्या झाल्यास करोना नियंत्रणासाठी नियमित स्वच्छता आणि शाळा परिसराचे दररोज निर्जंतुकीकरण करावं लागेल. त्यासाठी मोठा खर्च येईल. अनुदानित शाळांना देण्यात येणारं देखभाल अनुदान गेल्या वर्षापासून मिळालेलं नाही. अशा स्थितीत निर्जंतुकीकरणासाठीचा खर्च शाळा कसा करतील, असा सवाल मारियन वालादोरिस यांनी उपस्थित केला.