चिमुकल्यांना ताप येण्याचं प्रमाण वाढल्यानं पालक चिंतेत

विचित्र वातावरणामुळे लहानग्यांमध्ये तापाची साथ?

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी : राज्यातील कोविड प्रसार नियंत्रणात येत असतानाच लहान मुलांसह प्रौढांमध्येही तापाची साथ पसरत असल्याचे दिसून येत आहे. अनेकांना तीन दिवसांचा ताप येत आहे. पण त्यांना कोविडची लागण झालेली नाही, अशी माहिती साथीचे रोगतज्ज्ञ डॉ. उत्कर्ष बेतोडकर यांनी शनिवारी दिली.

तापाची साथ

विविध भागांमध्ये लहान मुलांसह तरुण आणि ज्येष्ठ नागरिकांनाही गेल्या काही दिवसांत ताप आल्याचे स्पष्ट झाले आहे. ही साथ इतर भागांतही पसरत आहे. पण त्यातील बहुतांशी जणांना कोविडची लागण झाली नसल्याचे आढळून आले आहे. कोविड प्रसार नियंत्रणात येत असतानाच तापाची साथ डोके वर काढत असल्याने गोमंतकीय जनतेत भीतीचे वातावरण पसरले आहे.

कोविडच्या लक्षणांमुळे भीती

ताप येणे हे कोविडच्या लक्षणांपैकी एक महत्त्वाचे लक्षण आहे. त्यातच जगभरातील वैद्यकीय तज्ज्ञांनी कोविडची तिसरी लाट भारतात लवकरच येण्याची शक्यता असून, त्याचा सर्वांत मोठा धोका १८ वर्षांखालील मुलांना आहे, असा अंदाज व्यक्त केला आहे. त्यामुळे ताप येत असलेल्या मुलांच्या पालकांमध्ये चिंता आणि भीती पसरली आहे.

काळजी घ्या!

तिसऱ्या लाटेचा धोका ओळखून लहान मुलांना ताप, खोकला किंवा इतर लक्षणे दिसल्यास तत्काळ डॉक्टरांचा सल्ला घेण्याचे निर्देश राज्य सरकारने याआधीच दिले आहेत. कोविडच्या तिसऱ्या लाटेची तयारी सरकारने याआधीच केलेली आहे. गेल्या काही दिवसांत ताप येत असलेल्या मुलांचे प्रमाण वाढत असल्याने सरकारने गांभीर्याने पुढील पावले उचालावी, अशी मागणी पालकांकडून केली जात आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!