सरकारी बाबुंनी नाचवले कागदी घोडे…समस्येचे मात्र भिजत घोंगडे !

संबंधित अधिकाऱ्यांवर खटले दाखल करण्याची होतेय मागणी

Goan Varta Live | प्रतिनिधी

मडगाव : एखादा सुजाण नागरीक सामाजिक बांधिलकीतून तक्रार करतो, त्या तक्रारीवर कारवाईही होते. मात्र समस्या तशीच राहते. इतकच नव्हे तर जनतेच्या पैशाचाही कसा ‘खेळ’ केला जातो, याचं अतिशय लाजिरवाणं उदाहरण गुड गव्हर्नन्ससाठी देशात लौकीकपात्र ठरलेल्या गोव्यात पाहायला मिळतंय. मडगाव केटीसी बसस्थानकाच्या मागील बाजुला नागरी वस्तीतलं सांडपाणी शेतात आणि तिथुन थेट नदीत मिसळत असल्याबाबतची तक्रार करण्यात आली होती. यासंदर्भात सार्वजिनक बांधकाम आणि प्रदुषण नियंत्रण यांच्यात ‘लेटरवाॅर’ही झालं. त्यानंतर प्रदुषण नियंत्रणनं 1 कोटी 18 लाख 80 हजारांचा दंड भरण्याचा आदेश सार्वजनिक बांधकामला दिला. जनतेचाच पैसा एका खात्यातुन दुसया खात्यात वर्ग होण्याचा हा प्रकार, पण दुर्दैव म्हणजे, ते होवूनही तब्बल सहा वर्षांनंतरही समस्या तशीच कायम आहे.
यासंदर्भात डाॅ. आशिष कामत गेली सहा वर्षे लढा देताहेत. सांडपाणी चेंबरमधुन शेतात आणि त्यानंतर थेट नदीत मिसळत असल्यानं ही निश्चितच गंभीर बाब आहे. डाॅ. आशिष यांनी यासंदर्भात दक्षिण गोवा जिल्हाधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभाग, मुरीडा फातोर्डा आणि गोवा राज्य प्रदुषण नियंत्रण मंडळ यांच्याकडं लेखी तक्रार केली होती. त्यानंतर या दोन्ही खात्यात ‘लेटरवाॅर’ झालं. सार्वजनिक बांधकाम खात्यानं सांडपाणी बंद केल्याचं कळवलं, परंतु वस्तुस्थिती तशी नव्हती. त्यामुळं अखेर प्रदुषण नियंत्रणच्या सदस्य, सचिव डाॅ. शर्मिला मोंतेरो यांनी सार्वजनिक बांधकामला 1 कोटी 18 लाख 80 हजारांचा दंड ठोठावला. अर्थात या खात्यातुन त्या खात्यात गेले काय, पैसा शेवटी जनतेचाच आहे. परंतु तब्बल सहा वर्ष हे कागदी घोडे नाचवुनही अखेर समस्या ‘जैसे थे’च आहे.

गुड गव्हर्नन्ससाठी देशात लौकीक मिळवलेल्या गोव्यात एका गंभीर समस्येचा असा ‘पोरखेळ’ व्हावा, हे खरंच दुर्दैवी आहे. दरम्यान, केवळ दंड न ठोठवता पाणी प्रदुषणासारख्या गंभीर समस्येचं गेली सहा वर्षे भिजत घोंगडं ठेवल्याबददल संबंधित अधिका-यांवर खटले दाखल करावेत, अशी मागणी तक्रारदार डाॅ. कामत यांनी केलीय.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!