Panjim | ३८८ वर्षे जुना पोर्तुगीजकालीन पूल खचला!

खचलेल्या बाजूने वाहतूक बंद; लवकरात लवकर दुरुस्त करण्याची मागणी

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी : ३८८ वर्षे जुना पोर्तुगीजकालीन रायबंदर-पाटो (पोन्ते दि लिन्ह्रास) पूल एका बाजूने खचल्याने ती बाजू रविवारी रात्रीपासूनच वाहतुकीसाठी बंद करण्यात आली आहे. दरम्यान, मोठी दुर्घटना घडण्याआधीच या पुलाची दुरुस्ती करावी, अशी मागणी स्थानिकांकडून केली जात आहे.
गेल्या काही वर्षांपासून हा पूल धोकादायक बनला आहे. या पुलावरून अवजड वाहनांना जाण्यास बंदी आहे. तसेच अन्य वाहनांनाही वेगमर्यादा ४० किमी इतकी निश्चित करण्यात आली आहे. मात्र, या नियमांचे सातत्याने उल्लंघन होत आहे. या भागात वारंवार अपघात होत असतात. या मार्गावर अनेक दुचाकीस्वारांचे प्राण गेले आहेत. तरीही याकडे गांभीर्याने पाहिले जात नाही. मध्यंतरी हा पूल ६ महिने बंद ठेवण्यात आला होता. मात्र, त्यानंतर पुन्हा नियम धाब्यावर ठेवून नागरिक वेगाने वाहने हाकत आहेत, असे स्थानिक रहिवासी नितीन नास्नोडकर यांनी सांगितले.
हेही वाचा:हॉटेलमध्येच ड्रग्जचे सेवन…

पुलाची १६३४ साली पोर्तुगीज राजवटीत निर्मिती

२०१७ साली हा पूल अवजड वाहनांसाठी पूर्णतः बंद करण्यात आला असल्याचे पीडब्ल्यूडीचे मुख्य अभियंता उत्तम पार्सेकर यांनी सांगितले होते. मात्र, हलक्या वाहनांसाठी पूल पुन्हा सुरू करण्यात आला. हा पूल पोर्तुगीज राजवटीत १६३४ साली घोडागाडीतून मालवाहतुकीसाठी बांधण्यात आला होता. त्याकाळी आशियातील सर्वात मोठा पूल म्हणून तो ओळखला जात असे. जून २०१४ मध्ये पुलावर ५० मीटरच्या भेगा पडलेल्याचे आढळून आल्यावर तो भाग पीडब्ल्यूडीने दुरुस्त केला होता. मात्र, काही दिवसांत पुन्हा या ठिकाणी भेगा पडल्या. राजधानीजवळील हा एक महत्त्वाचा पूल असल्याने सध्या त्याची दुरुस्ती होणे गरजचे आहे. मात्र, या जीर्ण झालेल्या पुलाकडे प्रशासनाने जणू पाठच फिरवली आहे.
हेही वाचा:डेकोरेशन करताना शॉक बसून 17 वर्षीय युवकाचा मृत्यू…

पुलाला पर्याय म्हणून एक समांतर पूल बांधण्याच्या विचार मांडला

२०१४ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री स्व. मनोहर पर्रीकर यांनी या पुलाला पर्याय म्हणून एक समांतर पूल बांधण्याच्या विचार मांडला होता. तसेच हा पूल पादचारी व सायकलस्वारांना खुला ठेवण्याबाबत ते बोलले होते. तर पीडब्ल्यूडीने राज्यातील ऐतिहासिक ठिकाण म्हणून याच्या सौंदर्यीकरणाचे नियोजन केले होते. मात्र, नंतर या प्रकल्पावर काहीच कार्यवाही झाली नाही.
हेही वाचा:‘या’ दिवशी मिळणार काँग्रेसला नवा अध्यक्ष; अध्यक्षपदाच्या निवडणुकीची तारीख ठरली…

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!