पंचायत निवडणूका लांबणीवर पडणार, ‘हे’ आहे कारण…

राज्य निवडणूक आयुक्त : प्रभाग आरक्षण, फेररचनेचे काम अपूर्ण

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी : प्रभाग फेररचना तसेच आरक्षणाचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही. त्यामुळे राज्यातील पंचायत निवडणूक कमीत कमी आठवडाभर लांबणीवर पडणार आहे. प्रभाग आरक्षण तसेच प्रभाग फेररचनेचे काम सुरू आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर निवडणुकीची तारीख जाहीर केली जाईल.
हेही वाचाःरेंट अ कॅब, बाईकच्या संख्यांवर मर्यादा आणणार…

प्रभाग फेररचनेचे काम मेपूर्वी पूर्ण होणार

पंचायत निवडणूक ४ जून रोजी घेण्याचा प्रस्ताव होता. आरक्षण तसेच प्रभाग फेररचनेचे काम  मेपूर्वी पूर्ण होईल, असा विचार करून या तारखेचा प्रस्ताव होता. हे काम पूर्ण होण्याला आणखी आठवडाभर लागेल. त्यानंतर तारीख निश्चित होईल. प्रभाग फेररचना आणि आरक्षणाचे काम सुरू आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला जाईल, असे राज्य निवडणूक आयुक्त रमणमूर्ती यांनी सांगितले. प्रत्येक पंचायतीची लोकसंख्या वेगवेगळी आहे. त्यामुळे प्रभागांची संख्या वेगळी असते. पंचायत प्रभागांचे आरक्षण ठरवण्याचे निकष तयार करून ती प्रक्रिया पूर्ण व्हायची आहे. त्याला थोडा वेळ लागेल. निवडणूक आणखी आठ दिवस पुढे जाईल, असे पंचायतमंत्री माविन गुदिन्हो यांनी सांगितले.
हेही वाचाःज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक नंदा गायतोंडे यांचे निधन…

निवडणूक आयोग पावसात मतदान घेण्याचे टाळतो

राज्यात ४ जूननंतर पाऊस सुरू होतो. पावसात निवडणूक घ्यावी की नंतर घ्यायची याचा विचार करून तारीख जाहीर केली जाईल. निवडणूक आयोग सहसा पावसात मतदान घेण्याचे टाळतो. यावेळी निवडणुका पावसातच होण्याची शक्यता आहे. मागील पंचायत निवडणूक ११ जून २०१७ रोजी झाली होती. १३ जून रोजी निकाल जाहीर होऊन पंचायत मंडळ स्थापन झाले होते. त्यामुळे यंदाची निवडणूक प्रक्रिया १३ जूनपर्यंत पूर्ण होणे आवश्यक आहे. पाच वर्षांचा कार्यकाळ संपल्यानंतर पंचायतींवर प्रशासकांची नियुक्ती करावी लागेल. यापूर्वी एकदा प्रशासकांची नियुक्ती करण्याची वेळ आली होती.
हेही वाचाःमुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, विद्यार्थ्यांना मिळणार दिलासा…

मतदार नोंदणी अधिकारी म्हणून नियुक्ती

गोवा पंचायत राज कायदा १९९४च्या कलम ७ मध्ये दुरुस्ती करून सरकारने प्रभाग फेररचनेचे अधिकार राज्य निवडणूक आयोगाला दिले आहेत. यापूर्वी पंचायत संचालनालय प्रभाग फेररचना व आरक्षणाचे काम पहात होता. त्यानुसार प्रभाग फेररचनेचा मसुदा निवडणूक आयोगाने २४ फेब्रुवारी रोजी जाहीर केला. मामलेदार/संयुक्त मामलेदार यांची मतदार नोंदणी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली. हा मुसदा मामलेदार कार्यालयात सूचना व हरकतींसाठी ४ मार्चपर्यंत खुला होता.  विधानसभेच्या मतदार यादीनुसार मसुदा तयार केला होता. दक्षिण गोव्यातून २६३, तर उत्तर गोव्यातून ६५० हरकती आल्या होत्या. मामलेदार/संयुक्त मामलेदारांनी ८ मार्च रोजी हरकती राज्य निवडणूक आयोगाला सादर केल्या. त्यानंतर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी होऊन नवे सरकार स्थापन झाले.
हेही वाचाःप्रा. चिन्मय घैसास यांना साहित्य भूषण पुरस्कार जाहीर…

प्रभाग फेररचना : सर्वाधिक हरकती बार्देशमधून

प्रभाग फेररचनेविषयी सर्वाधिक ३९८  हरकती बार्देश तालुक्यातून आल्या होत्या. त्यानंतर पेडणे तालुक्यातून ८८, डिचोलीतून २३, सत्तरीतून १४, तिसवाडी तालुक्यातून १२७ हरकती आल्या होत्या. दक्षिण गोव्यातील फोंंडा तालुक्यातून ६५, धारबांंदोडा तालुक्यातून ८, सांंगेतून ९, सासष्टीतून ९८, मुरगावमधून ४०, केपेतून २६ आणि काणकोण तालुक्यातून १७ हरकती आल्या होत्या. सर्वाधिक हरकती प्रभाग बदलाविषयी आहेत. एका घरातील सर्व सदस्यांचे एकाच प्रभागात मतदान असावे, अशातऱ्हेने प्रभागांंची फेररचना केली जाईल.
हेही वाचाःलईराईच्या जत्रोत्सवास सुरुवात…

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!