आश्वे मांद्रेतील बेकायदा कुंपणावरून पंचायत आक्रमक

मांद्रेतील 'त्या' बेकायदा कुंपणाची पंचायतीकडून पाहणी; पंचायत मंडळ बैठकीत कारणे दाखवा नोटीशीवर चर्चा

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजीः मांद्रे पंचायत क्षेत्रातील समुद्र किनारे सध्या खाजगी मालकीच्या हवाली होताहेत. पर्यटकांना किनाऱ्याकडे जाण्यासाठीच्या पारंपरिक वाटा एकतर अडवल्या जाताहेत किंवा खाजगी मालक कुंपण घालताहेत. आश्वे समुद्रकिनाऱ्यावर सध्या एका बिल्डरनं अशीच दादागिरी चालवलीये..

सीआरझेडची कुंपणाला परवानगी मिळालीच कशी?

आश्वे मांद्रेतील श्री देव आजोबा देवस्थानाजवळील भली मोठी खाजगी जमीन कोचीन इस्टेट लिमिटेड यांनी विकत घेतलीय. विशेष म्हणजे पंचायतीला काहीही न कळवता जमीन मालकाने संपूर्ण भूखंडाला पत्र्याचं कुंपण घातलंय. यामुळे किनाऱ्याकडे जाण्याची वाट तर अडवली आहेच. परंतु सीआरझेडची या कुंपणाला कशी काय परवानगी मिळाली याची जोरदार चर्चा मांद्रे गावात सुरू आहे.

मांद्रेच्या सरपंचांकडून प्रकरणाची दखल

मांद्रेच्या सरपंच आश्वेता मांद्रेकर यांनी या प्रकाराची गंभीर दखल घेतलीये. या बांधकामाचं काम थांबवण्यासाठी त्यांनी नोटीस जारी केलीय. स्थानिक पंचसदस्य, पंचायत सचिव यांच्यासोबत जाऊन ही नोटीस कुंपणाला चिकटवली. तसंच या बेकायदा कुंपणाची पाहणी 1 मार्च रोजी केली. आगामी पंचायत मंडळाच्या बैठकीत या जमीन मालकाला कारणं दाखवा नोटीस बजावण्यासंबंधीचा निर्णय घेतला जाणार असल्याचं संरपंच म्हणाल्यात.

सगळेच किनारे अशा तऱ्हेनं अडवले गेले तर मांद्रेतील किनारी भागांची रयाच निघून जाईल. इथे किनाऱ्यांवर जाण्यास वाट नसल्यास कुणीच पर्यटक इथे फिरकणार नाही. याचा मोठा फटका पर्यटन व्यवसायाला बसेल. ही परिस्थिती अशीच सुरू राहीली तर भविष्यात मांद्रे हे खाजगी पर्यटनस्थळ बनून राहील. कोचिन इस्टेट लिमिटेड या बिल्डरचा मोठा दरारा मांद्रेत आहे. या बिल्डरला राजकीय आश्रय असल्याचंही बोललं जातं. मांद्रे पंचायतीने नोटीस बजावून धाडस दाखवलं आहेच. परंतु या नोटीशीचं आणि पर्यायाने या बेकायदा कुंपणाचं नेमकं काय होतं, याकडे मांद्रेवासियांचे लक्ष लागून राहीलंय.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!