देशात पणजी शहर राहणीमानात अव्वल!

लहान राज्यांत सर्वोत्तम जीवनमानात १६ व्या स्थानी; केंद्राच्या यादीतून उघड

सिद्धार्थ कांबळे | प्रतिनिधी

पणजी : दहा लाखांपेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या आणि सर्वोत्तम जीवनमान असलेल्या ६२ शहरांच्या यादीत पणजी शहर सोळाव्या क्रमांकावर आहे. तर, राहणीमानाच्या दृष्टीने पणजी प्रथम क्रमांकावर आहे.

केंद्राच्या यादीतून उघड

केंद्रीय गृहनिर्माण आणि नगर व्यवहार मंत्रालयाने भारतातील राहण्यासाठी सर्वोत्तम जीवनमान असलेल्या शहरांची यादी जाहीर केली आहे. या यादीतून ही बाब समोर आली आहे. राहणीमानासाठी सर्वोत्तम जीवनमान गटात क्रमांक देताना तेथील राहणीमान, आर्थिक क्षमता, शाश्वतता आणि नागरिकांचं सर्वेक्षण या गोष्टींचा विचार केला जातो. त्यातील राहणीमानामध्ये परवडणारी घरं, शुद्ध पाण्याची उपलब्धता, मूलभूत शिक्षण, आरोग्यविषयक सुविधा, सुरक्षा आदींचा समावेश होतो. त्याच बाबतीत पणजी शहर ६२ शहरांमध्ये अव्वल ठरलं आहे. तर, आर्थिक क्षमतेत २४ व्या, शाश्वततेबाबत ४२ व्या आणि नागरिकांचे सर्वेक्षणमध्ये ४६ व्या क्रमांकावर आहे. संपूर्ण यादीत पणजी १६ व्या क्रमांकावर आहे. तर, शिमला, भुवनेश्वर, सिल्वासा, काकिनाड आणि सालेम ही शहरे अनुक्रमे पहिल्या पाच स्थानी आहेत.

दोन गटांतून यादी जाहीर

याआधी २०१८ मध्ये मंत्रालयाकडून अशा प्रकारची यादी जाहीर करण्यात आली होती. त्यावेळी सर्वच शहरांना एकाच श्रेणीत ठेवून क्रमांक देण्यात आले होते. त्यावेळी देशभरातील १११ शहरांत पणजीचा क्रमांक १८ वा होता. पण यंदा मंत्रालयाने दहा लाखांपेक्षा कमी लोकसंख्या असलेली शहरे आणि दहा लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेली शहरे अशा दोन गटांतून यादी जाहीर केली आहे. दहा लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या शहरांच्या यादीत बंगळुरू प्रथम, पुणे द्वितीय, तर अहमदाबाद तृतीय स्थानी आहे.

सर्वोत्कृष्ट पालिकांत २८ व्या स्थानी

केंद्रीय गृहनिर्माण आणि नगरविकास मंत्रालयाने सर्वोत्कृष्ट नगरपालिकांसाठीची यादीही दहा लाखांपेक्षा जास्त आणि दहा लाखांपेक्षा कमी लोकसंख्येच्या शहरांप्रमाणेच जाहीर केली आहे. यामधील दहा लाखांपेक्षा कमी लोकसंख्येच्या यादीत पणजी महानगरपालिका ६० शहरांत २८ व्या स्थानी आहे. यासाठी सेवा, अर्थव्यवस्था, तंत्रज्ञान, नियोजन आणि कारभार अशा चार गोष्टी विचारात घेण्यात आल्या होत्या. त्यात पणजी मनपा सेवांमध्ये १७ व्या, अर्थव्यवस्थेत २९ व्या, तंत्रज्ञानात ३१ व्या, नियोजनात ४५ व्या आणि कारभारात ३३ व्या क्रमांकावर आहे.

प्रामाणिक प्रयत्नांमुळेच फळ : महापौर

गेल्या दोन वर्षांत राजधानी पणजीचा सर्वांगिण विकास साधण्यासाठी आम्ही दिवसरात्र काम केलं. पणजीतील जनता मूलभूत गरजांपासून दूर राहू नये, याची पूर्णपणे काळजी घेतली. तळागाळातील नागरिकांपर्यंत सेवासुविधा, योजना पोहोचवल्या. जगभरातील पर्यटक पणजीला भेट देत असतात. त्यामुळे पणजीतील स्वच्छतेवर भर दिला. कचरा समस्येवर काही प्रमाणात मात केली. पणजीवासीयांच्या गरजा ओळखून त्या पूर्ण करण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न केले. त्याची पावती म्हणूनच केंद्रीय गृहनिर्माण आणि नगरविकास मंत्रालयाच्या यादीत पणजीचं नाव वरच्या स्थानी झळकले, अशी प्रतिक्रिया महापौर उदय मडकईकर यांनी ‘गोवन वार्ता’शी बोलताना दिली.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!