संगीताच्या तालावर रंगांची बरसात करणारा कलाकार हरपला

पद्मभूषण लक्ष्मण पै यांचं निधन; पार्थिवावर बुधवारी अंत्यसंस्कार

Goan Varta Live | प्रतिनिधी

मडगाव: आंतरराष्ट्रीय कीर्तीचे गोमंतकीय कलाकार पद्मभूषण लक्ष्मण पंढरीनाथ पै फोंडेकर (९५) यांचं रविवारी सायंकाळी वृद्धापकाळाने निधन झालं. अमेरिकेत राहणारा त्यांचा पुत्र आकाश गोव्यात आल्यानंतर बुधवारी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.

कौटुंबिक तसंच शैक्षणिक पार्श्वभूमी

लक्ष्मण पै यांचा जन्म पै फोंडेकर कुटुंबात २१ जानेवारी १९२६ रोजी मडगावात झाला. मडगावातील मावजो फोटो स्टुडिओ येथून त्यांनी कला क्षेत्रात पदार्पण केलं. रामनाथ मावजो यांच्याकडे त्यांनी कलेचे धडे घेतले. वयाच्या अकराव्या वर्षी त्यांनी ललित कलेतील त्यांच्यातील चुणूक दाखवून दिली. लक्ष्मण पै यांनी गोवा मुक्तीसंग्रामातही सहभाग दर्शवला होता. राम मनोहर लोहिया यांनी १९४६ साली ज्यावेळी लोहिया मैदानावरून क्रांतीची ज्योत पेटवली होती, त्याचवर्षी लक्ष्मण पै यांनी मडगाव पोलिस स्थानकाबाहेर सत्याग्रह केला होता. पोर्तुगीज पोलिसांनी तीनवेळा त्यांना पोर्तुगीज कॉलनीतून अटकही केली होती. एकदा पोर्तुगीज पोलिसांनी त्यांना मारल्यानंतर लक्ष्मण पै यांच्या पालकांनी त्यांना पुढील शिक्षणासाठी मुंबई येथे पाठवलं.

विविध पुरस्काराने सन्मानित

लक्ष्मण पै यांना १९८५ साली पद्मश्री पुरस्कार तर २०१८ मध्ये पद्मभूषण पुरस्काराने भारत सरकारने गौरवलं होतं. १९६१, १९६३ व १९७२ यावर्षी त्यांना ललित कला अकादमीचा पुरस्कार मिळाला होता. याशिवाय राज्य सरकारचा पुरस्कार ‘नेहरू अवॉर्ड’ १९८७ साली प्राप्त झाला. गोव्यातील सर्वोच्च नागरी पुरस्कार असलेल्या गोमंत विभूषण पुरस्कारानेही त्यांना २०१६ साली सन्मानित करण्यात आलं होतं.

विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी व्यक्त केला शोक

आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रसिद्ध गोमंतकीय कलाकार लक्ष्मण पै यांच्या जाण्यानं कलेच्या दुनियेत खूप मोठी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांच्या आत्म्याला सद्गती लाभो.

थोडक्यात परिचय…

  • पै यांनी १९४३ ते १९४७ या कालावधीत मुंबईतील सर जे. जे. स्कूल ऑफ आर्ट येथे शिक्षण घेतलं. १९४७ मध्ये त्यांना प्रतिष्ठेचे मायो मेडलही प्राप्त झालं होतं. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी जे. जे. स्कूलमध्ये शिकवण्याचं कामही केलं.
  • पै यांनी दहा वर्षं पॅरिसमध्ये कलेची साधना केली. त्यांनी फ्रेस्को व इचिंगचं शिक्षण घेतलं. या कालावधीत त्यांनी लंडन, म्युनिच, न्यूयॉर्कसह विविध देशांतील शहरांत दहा प्रदर्शनेही भरवली होती.
  • विदेशातून गोव्यात परतल्यानंतर पै यांनी गोवा कॉलेज ऑफ आर्ट शिक्षण संस्थेच्या प्राचार्य पदावर १९७७ ते १९८७ या कालावधीत काम केलं. पै यांच्या चित्रकलेत गोव्याची झलकही दिसून येत असे.
  • त्यांनी स्वतःच्या चित्रकलेत गोमंतकीयांचं जीवन तसंच भारतीय लघुचित्रांचा समावेश केला होता. इजिप्तच्या प्राचीन मूर्तिकलेतूनही त्यांनी प्रेरणा घेतली होती.
  • चित्र काढत असताना त्यांना संगीत ऐकण्याचा छंद होता. यात कुमार गंधर्व, भीमसेन जोशी, किशोरी आमोणकर यांच्या गाण्यांचा समावेश असायचा.
  • भारतीय शास्त्रीय संगीतातील विविध रागांनाही त्यांनी त्यांच्या चित्रकलेतून साकारण्याचा प्रयत्न केला होता. यातूनच म्युझिकल मूडस ही चित्रशृंखला १९६५ साली तयार केली होती.
  • ते बासरी व सितार चांगल्याप्रकारे वाजवत असत. भारतातही विविध शहरांतून त्यांच्या चित्रकलेचं प्रदर्शन भरवण्यात आलं होतं.
  • ते ललित कला अकादमीच्या कार्यकारी समिती व जनरल कौन्सिल फॉर ललित कला अकादमी व संगीत नाटक अकादमीचे सदस्य होते.
पद्मभूषण लक्ष्मण पै यांचे पेंटिंग

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!